शिस्त

शिस्त....

कधीकधी पसारा आवरायला घेतला की,
कपाटातल्या कप्प्यात सापडतं काय काय…

कुठल्याशा मंदिरातली अभिषेकाची पावती…
एखाद्या महिन्यातल्या किराणा मालाचं बिल…
तर कधी त्याच्याबरोबर गेलेल्या हॉटेलचं बिल…
त्या बिलावरचे आकडे पुसट दिसतात हळूहळू 
आणि तो ही आता सोबत नसतो… 
पण त्याच्या बरोबर घालवलेला सुखाचा काळ…
त्याच्या सोबतच्या गुजगोष्टी…
त्याच्या सोबत पाहिलेली स्वप्नं…
तो आणि त्याच्या आठवणी…
त्या तर पुसट होत नाहीत ना कधीच.
मग हात आपले शिस्तीत काम करत राहतात
पसारा आवरण्याचं…पण मनाचं काय? 
मनात पसरलेल्या आठवणींच्या पसाऱ्याचं काय? 
कळत नाही त्या आठवणींना शिस्तीत बांधावं,
की तसंच राहू द्यावं…पसरलेलं.

पुस्तकांचं आवरलेलंच कपाट आवरायला घेतलं की,
सापडतं काय काय त्याही कप्प्यात…

स्वतःच्या पैशातून घेतलेलं पहिलं पुस्तक…
'सस्नेह‘ लिहून कोणी भेट दिलेलं पुस्तक…
लेकीचं एखादं बडबडगीताचं इटुकलं पुस्तक…
त्यातच एका पुस्तकावर नजर गेली की,
मन हळवं हळवं होऊन जातं.
लाडका कवी, त्याचं ते पुस्तक, त्याच्या कविता…
पहिल्या पानावरची त्याची झोकदार सही…
त्यानं भेट म्हणून दिलेला बुकमार्क…
त्यावरचा त्याचा स्पर्श पुसला जाऊ नये म्हणून
त्या बुकमार्कला कधीही न केलेला स्पर्श.
किती किती आठवणी!
हाताला शिस्त…हात करत राहतात आपलं काम…
पण मनात पसरलेल्या आठवणींच्या या पसाऱ्याचं काय? 
कळत नाही त्या आठवणींना शिस्तीत बांधावं,
की तसंच राहू द्यावं…पसरलेलं.

जवळ नसणाऱ्या लेकीचं कपाट आवरायला घेतलं की,
बरंssच काही सापडतं त्यात…

फाईलमध्ये ठेवलेली सर्टिफिकेट्स…
याला अजिबात हात लावायचा नाही म्हणून ठेवलेला
एखादा दागिन्यांचा डबा…आणि तेव्हाच सापडतं...
एखाद्या बटव्यातली इवली इवली भातुकलीची भांडी…
नीट इस्त्री करून ठेवलेले इवलेसे कपडे…
एखाद्या पिशवीत जपून ठेवलेले सागरगोटे…
तर दुसऱ्या एखाद्या पिशवीतल्या भोपळ्याच्या बिया…
शेतात मिळालेलं आणि आईला द्यायला आणलेलं
एखादं छानसं, छोटंसं मोरपीस.
मग आठवणींचा महासागर उसळतो मनात.
हाताला शिस्त म्हणून काम होत राहतं अलिप्तपणे…
पण मनाला कुठं शिस्त हा लाडका पसारा आवरण्याची!
मग कळत नाही त्या आठवणींना शिस्तीत बांधावं,
की तसंच राहू द्यावं…पसरलेलं.

सांगा ना….काय करावं?


जस्मिन जोगळेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्यरात्र

भाग एक