स्पर्श होता तुझा....
स्पर्श होता तुझा…. “काय गं, अशी खो खो खेळायला बसल्यासारखी का बसली आहेस तिथं? काय बघणं चालू आहे खाली?” “काही नाही अरे, फिरता फिरता ही लाजाळूची फुलं दिसली, त्यांना बघता बघता या पानांशी बसले आपली खेळत. सगळी पानं मिटवली आहेत मी माझ्या बोटाच्या अलवार स्पर्शाने. आता ती परत कधी उघडतील याची वाट बघतेय. मिटताना जशी पटकन मिटतात; तशीच उघडताना पटकन उघडतात की हळूहळू ते बघायचंय. हसू नकोस… तू काय म्हणणार आहेस ते कळलंय मला. हेच ना की गुगलवर लगेच कळेल म्हणून. यामागचं शास्त्र माहीत आहे रे मलाही. पण तुला सांगू… अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, मला जाणूनबुजून परत परत अज्ञानी व्हायला आवडतं. प्रत्येकवेळी हे झाड निरखताना वेगळाच आनंद मिळत जातो. आता हेच बघ की… आपल्याला चंद्रावरचे दऱ्या डोंगर, त्यांची नाव माहित असली तरी त्याच्यावरचा तो कल्पनेतला ससा बघण्यातच मजा वाटते की नई. म्हणून सगळं माहित असूनदेखील मी लाजाळूला स्पर्श करुन लाजायला लावते...