माघ फाल्गुन... शिशिर ऋतू

'हलके हलके हसते गळते तरुचे पान न् पान 

बाई, तरुचे पान न् पान

पानझडीत या ऐकून घ्या गं शिशिर ऋतूचं गान 

बाई, शिशिर ऋतूचं गान!' 

वा. रा. कांतांची ही कविता शिशिर ऋतूचं वर्णन किती छान करते! शिशिर ऋतूचं गान हा शब्दप्रयोग फार आवडला मला. गान शब्दामुळं काय वाटलं माहितेय… पुढे येणाऱ्या कोवळ्या पालवीसाठी शिशिर ऋतू डोहाळे गीत गात असेल का? पण शिशिर ऋतूतली पानगळ अनुभवणं ही एक सुंदर गोष्ट आहे. आपण कायम वसंताचं, त्याच्या सौंदर्याचं कौतुक करतो, पण शिशिर देखील तितकाच सुंदर आहे. भले उघड्या बोडक्या झाडांकडे बघून भकास वाटलं तरी त्यातही वेगळं सौंदर्य आहे. मला ना प्रत्येक ऋतूतलं जंगलाचं सौंदर्य अनुभवायची खूप इच्छा आहे. जंगलातला शिशिर ऋतू कसा दिसत असेल ना… पानांचे दागिने काढून ठेवलेली झाडं… त्याखाली वाळलेल्या पानांचा अस्ताव्यस्त पसरलेला पसारा… आणि वातावरणात त्यामुळंच आलेली एक स्तब्धता. श्वासाकडेही दुर्लक्ष करुन ही स्तब्धता अनुभवता यायला हवी. एखाद्या झाडाच्या खरबरीत बुंध्याला टेकून उभं राहावं आणि हा अनुभव घ्यावा… मला वाटतं मी कितीही वेळ या स्तब्धतेशी गुजगोष्टी करु शकेन. शिशिरामधली जंगलातल्या सगळ्या प्रहरांची वेगवेगळी रुपं तर काय सुरेख... सकाळच्या प्रहरी सूर्यकिरण धावतपळत येऊन कामावर आपला अंगठा उठवायच्या आधीचं जंगल धुक्यात हरवलेलं असतं. एरवी पानांमुळे फांद्यांशी मनमोकळेपणाने खेळता येत नाही म्हणून हे धुकं इतर वेळी खाली येतच नसावं बहुतेक. शिशिरात पानांची अडचण नसताना मात्र मुक्तपणे जंगलात फेरफटका मारताना त्यालाही किती मजा येत असेल ना... अशी सकाळ किती सुरेख! धुक्यात हरवलेली वाट आणि झाडांच्या अस्तित्वाला लपवून ठेवणारं धुकं… लांबून पाहिलं तर समोर धुक्याशिवाय काहीच दिसणार नाही. पण जसंजसं पुढं जात जाऊ तसं एकेक झाड हळूच आपल्याला हाक मारत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करुन द्यायला लागतं. किती छान आहे ना हा लपाछपीचा खेळ! पण त्यासाठी आधी शिशिरातल्या थंडीत उबदार पांघरुणातून बाहेर पडावं लागतं. सूर्यकिरणांचा जंगलात प्रवेश झाला की मात्र हे धुकं तिथून काढता पाय घेतं. फांदी फांदीवर पक्ष्यांची लगबग सुरु होते. सकाळी एकूण शांत वातावरणात पक्ष्यांची भूपाळी ऐकायला किती छान वाटतं! ऊन जसं चढत जाईल तशी याच पक्ष्यांची सावली जमिनीवर पडलेली दिसायला लागते. एरवी पानांच्या गर्दीमुळे ही सावली हरवून गेलेली असते… मग दुपार जरा सुस्त होऊन जाते आणि संध्याकाळी मावळतीच्या किरणांची शिडी करुन गारवा हळूहळू खाली उतरायला लागतो. दिवसभराचं निळंभोर आकाश काळया रंगानं रंगून जातं आणि या काळया पार्श्वभूमीवर आपली चमचमती रांगोळी रेखायला चांदण्या उत्साहात बाहेर येतात. हे दोन्हीवेळचं आकाश बघायला मला फार आवडतं. निष्पर्ण झाडांच्या फांद्यामुळं आकारास आलेलं चित्र या निळ्याभोर रंगावर मस्त खुलून दिसतं. दिवसरात्रीच्या या चक्रात झोंबणारा वारा मात्र आपली उपस्थिती जाणवून देत असतो आणि सोबत उन्हाचा चटका जाणवून देणार नाही याचीही खबरदारी घेत असतो. 

शिशिर ऋतूतला वारा म्हटल्यावर एक सुंदर गोष्ट आठवली. मी फिरायला जाते त्या वाटेवर मधे एक आमराई लागते. इतर झाडांनी आपली पानांची वस्त्र त्यागलेली असली तरी आंबा, फणसासारखी झाडं मात्र पानं राखून असतात यावेळी. त्यासोबत आंब्याच्या फांद्यांवर मोहोर दिमाखात मिरवत असतो. वाटेत जी आमराई लागते ती ही मोहोराने नटलेली असते. संध्याकाळी तिच्या शेजारुन जाताना या मोहोराचा इतका सुंदर सुगंध येतो की वेडावून जायला होतं. आंब्याच्या झाडाचं आणि वाऱ्याचं कौतुक वाटतं मला… काही राखून ठेवत नाहीत स्वतःकडे. आमराईच्या अंगावरुन वाहत येणारा वारा या सुगंधाला नाजूकपणे आपल्याबरोबर घेऊन जात असतो. आंब्याचं झाडही संक्रांतीचं वाण लुटल्यासारखं आपल्या मोहोराचा हा सुगंध लुटत असतं. हा वारा असाच वाहता रहावा आणि आपणही त्या परिसरातच घुटमळत रहावं असं वाटायला लागतं. निसर्गानं फुलांना दिलेलं हे सुगंधाचं दान किती गोड आहे ना! पण हा वारा काही फार साधा, सोज्वळ नाही बरं का… खोड्या काढायची हुक्की येतेच त्याला. सुगंध पसरवणारा हाच वारा धुळीलाही नाचवत असतो याकाळात. धुळीनं माखलेली झाडं बघायला कसंतरीच वाटतं. पण पावसाशिवाय त्यांना स्वच्छ करणारं दुसरं कोणी नाही. धुळीला उडवत नेणाऱ्या वाऱ्यापेक्षा झाडाच्या फांद्यांवरुन पानांना अलग करणारा आणि त्यांना अलगद, हलके हलके जमिनीवर उतरायला मदत करणारा वारा किती छान वाटतो ना! पानांचा आकार कसा असेल त्याप्रमाणे त्यांचं खाली गळून पडणं वेगळं होतं. लांबट, सडपातळ पानं असतील तर ती वाऱ्याबरोबर मस्ती करत भिरभिरत खाली येतात, तेच जर सागासारखं मोठं पान असेल तर ते बदक्कन् पडतं. वाऱ्याला त्याचं ओझं होतं की काय जाणे तेव्हा. पण काही म्हणा… शिशिरातही एक वेगळं सौंदर्य आहेच. त्यादृष्टीने त्याच्याकडे बघता आलं पाहिजे, तेव्हाची स्तब्धता अनुभवता आली पाहिजे, तिच्या प्रेमात पडता आलं पाहिजे. 

शिशिरात झाडं निष्पर्ण होत असली तरी काही झाडं मात्र स्वतःकडे लक्ष वेधून घेतात. पानं नसली म्हणून काय झालं… फुलं तर आहेत आमची… असं म्हणत लांबूनही आपलं लक्ष वेधून घेतात. पळस आणि काटेसावर… या फुलांचे रंग काय भडक असतात. या फुलांच्या फुलण्यावरुन पुढचं हवामान कसं असेल हे ठरवता येतं. पळस लवकर फुललेला दिसला की पुढं येणारा उन्हाळा लवकर आणि तीव्र येऊ शकतो.. असे काही ठोकताळे असतात. निसर्ग खूप काही सांगत असतो आपल्याला; फक्त ते कळून घेण्याची कुवत पाहिजे आपल्याकडे. तर ही फुलं म्हणजे मजा… भरपूर प्रमाणात पळस फुलला तर त्याचा रंग म्हणजे आग लागल्यासारखा दिसतो. म्हणून फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणतात ना त्याला! ही फुलं फुलली की इवल्या इवल्या पक्ष्यांची चंगळ सुरु होते. संपूर्ण झाड चैतन्यानं भरुन जातं. सनबर्डस्, पोपट, मैना, लिफबर्डस् याभोवती घुटमळायला लागतात. त्यात पोपटांचं हे आवडतं झाड. बघा शिशिर काही अगदीच भकास, रंगहीन नाही बरं का. 

शिशिर ऋतूचा काळ म्हणजे माघ फाल्गुन महिना… माघ महिन्यात रात्रीच्या आकाशात मघा नक्षत्र रात्रभर दिसत असतं. या नक्षत्रांवरुनच मराठी महिन्यांची नावं ठेवली आहेत. मघाच्या जोडीला फाल्गुन महिन्यात पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिसतात. या पूर्वा फाल्गुनीचा आराध्यवृक्ष आहे हा पळस. आपल्या पूर्वजांचा अभ्यास किती सखोल होता बघा ना. त्यांनी सत्तावीस नक्षत्रांना सत्तावीस झाडं नेमली आहेत. जेव्हा ते नक्षत्र आकाशात असतं तेव्हाच पृथ्वीवर त्याचा आराध्यवृक्ष फुललेला किंवा फळलेला असतो. फक्त एवढंच नाही तर साधारण त्या त्या काळात होणाऱ्या आजारांवर तो वृक्ष औषध म्हणून उपयोगी पडणारा असतो. किती कमाल आहे ना आपल्या पूर्वजांची! आकाशदर्शन करायला हा काळ उत्तम. स्वच्छ, नितळ आकाशात मृग, कृत्तिका, पुष्य, शर्मिष्ठा आणि इतर तारकापुंज बघताना कसला अडथळा येत नाही. एकूण काय थंडीला फार भाव देत नसाल तर शिशिराची ओळख करुन घ्यायला, त्याचा आनंद घ्यायला बाहेर पडायला हरकत नाही. 

शिशिर हा सहा ऋतूतला शेवटचा ऋतू. पण ऋतुचक्राला कायम फिरता ठेवणारा ऋतू. शिशिर आहे म्हणूनच आपल्याला वसंताचं कौतुक आहे. 

वा.रा. कांत म्हणतात ते खरंच आहे…

‘पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंतस्वप्न महान

पानझडीत या ऐकून घ्या गं शिशिर ऋतूचं गान 

बाई, शिशिर ऋतूचं गान!' 


जस्मिन जोगळेकर 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक