मध्यरात्र



          बघ… तुझ्याबद्दल वाटणारी ही ओढ अजिबात स्वस्थ बसू देत नव्हती मला. हल्ली तर प्रत्येक प्रहर, प्रहरातले प्रत्येक क्षण तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायचे. अगदी आत्ताही बघ ना… मध्यरात्र झाली तरी डोळ्यांवर काही नीज दाटून येत नव्हती. पश्चिमेची गंभीर गाज निवळून आता हळूहळू पूर्वेकडून भूपाळी ऐकू येईल, सप्तर्षींची जागा आता हळूहळू शर्मिष्ठा घ्यायला लागतील; पण माझ्या डोळ्यातली टक्क जाग काही झोपेचं नाव घ्यायला तयार नव्हती. का? तर तू येशील… तू नक्कीच येशील असं वाटायला लावणारी तुझी ओढ. या माझ्या खात्रीला… का?… का म्हणून तडा दिलास रे तू? अर्ध्या तासापूर्वी तुझ्याकडून आलेला मेसेज वाचला आणि… आणि अक्षरशः हादरुन गेले रे. असं का वागलास माझ्याबरोबर सांग ना? झोप येत नव्हती म्हणून गच्चीत बसायला आले होते. पश्चिमेच्या खाऱ्या वाऱ्यासोबत मनाला शांत करणारे सूर ऐकू असं ठरवून वर आले होते रे आणि आता तू सांगतोयस मला की माझं तुझ्याबरोबर नसणं आता स्वीकार. स्वीकार… असं टाईप करण्याएवढं सहज शक्य आहे का ते? अरे, इतके दिवस तुझं अस्तित्व, तुझे श्वास मालकंसच्या सुरांसारखे वाटायचे मला; कारण तू नुसता समोर दिसलास तरी शांत व्हायचे मी… आणि आता त्याच मालकंसच्या ऋषभ आणि पंचम सारखं तुझं अस्तित्व मी माझ्यातून वर्ज्य करावं असं सांगतोयस तू मला? तो ऋषभ आणि पंचम वर्ज्य करुन मालकंस रंगतदार होतो रे… पण माझं काय? तुला माझ्या जीवनातून वजा केलं की हे जीवन एकदम बेसूर होऊन जाईल. कसं समजत नाहीये तुला! तुझं नसणं स्वीकारणं इतकं सोपं वाटतंय का? 

          हा समुद्रावरुन येणारा खारा वारा… काय करु याचं? तुझी एकेक आठवण अगदी अलगद सोडून जातोय माझ्यापाशी. तो तरी काय करणार म्हणा… इतके दिवस तू जवळ नसताना तुझ्या आठवणींच्या लडी त्याच्यासोबतच तर उलगडत होते. पण आता त्याला कसं सांगू की तुझं नसणं स्वीकार तू ही. स्वीकारु शकेल का तो हे सहज? धक्का बसून एकदम थबकून गेला तर? नको… नकोच सांगायला त्याला. आता त्याचीच तर मला सोबत. तोच थबकला तर माझा श्वास कोंडून जाईल… नकोच ते. तुझा तानपुरा… तो तर तू इथून गेल्यापासून तुझ्या स्पर्शाला भुकेजला आहे रे. त्याला काय सांगू? तुझा षड्ज ऐकायला त्याच्या तारा उत्सुक असतील. त्यांना कळलं की तू आता येणार नाहीयेस परत; तर तुझा हा निर्णय त्या स्वीकारतील? का सगळ्यांचं आयुष्य तू बेसूर करायला निघाला आहेस? मला माहितेय, “असल्या निर्जीव वस्तूंची भूल घातलीस तरी मी अडकणार नाही” असं म्हणत असशील तू. पण निर्जीव समजू नकोस रे यांना. त्यांनाही स्पर्शाची जाणीव होत असेल कदाचित. पण मुळात हा तानपुरा न्यायला तरी तुला यावं वाटत नाहीये का इथे? इतका कसा अलिप्ततेचा स्वीकार करुन दूर होऊ शकतोस तू आपल्या गोष्टींपासून? हा… आता थोडं लक्षात येतंय… तुझं वागणं, बोलणं बघून अधून मधून वाटायचं मला की तू इथल्या कशात फार गुंतलेला नाहियेस… अगदी माझाही मनापासून स्वीकार केला होतास का नाही काय माहित. पण खरं सांगू… तेव्हा माझं मन हे स्वीकारायला तयार नव्हतं. तेव्हाच जर मी मनावर ताबा ठेऊन हे स्वीकारलं असतं तर… असो, या जर तर ला आता काही अर्थ नाही. पण तुला अजूनही खरंच वाटतंय का की मी हे स्वीकारावं? 

          तुला आठवतंय? एकदा मी रांगोळी काढताना तू मला विचारलं होतंस… त्या चौकोनातले मधले ठिपके… त्यांचा तर काहीच उपयोग नाहीये या रांगोळीत. तेव्हाच मला लक्षात यायला हवं होतं खरंतर. पण अरे… त्या ठिपक्यांचा असा बघताना उपयोग दिसला नाही तरी त्या पूर्ण रांगोळीने त्यांना स्वीकारुन आपल्यात सामावून घेतलं होतंच की. कुठल्याही रेषेशी त्यांचं नातं जोडलं गेलं नसलं तरी त्यांच्यामुळेच त्या रेषांना पुढं जायची योग्य दिशा सापडली होती, त्यांचं तिथलं अस्तित्व रांगोळीने आनंदानं स्वीकारलं होतं आणि त्यामुळंच ती रांगोळी उठावदार झाली होती. आपली दृष्टी जशी असेल तसं आपल्याला जग दिसतं. तुझी दृष्टी कायम साफ ठेवायचा प्रयत्न करुन बघ ना एकदा. अर्थात आता मला त्याचा काही उपयोग नाही म्हणा. कारण मी सत्य स्वीकारण्याच्या दिशेनं पाऊल पुढं पुढं टाकायला सुरुवात केलेय. नक्की सांग… हे स्वीकारुन जाऊ पुढं? जमेल का मला? “जमेल का मला?” हा प्रश्न तुला नाही बरं का, मीच मला विचारतेय. 

          इतके दिवस मला वाटत होतं की… फुलों में कलियों में सपनों की गलियों में तेरे बिना कुछ कही ना… पण आता मात्र तेरे बिना जीना स्वीकारायला हवं मला. आठवणींच्या तलावातून तू जोरात वल्ही मारत, आठवणींना कापत पार पुढं जाऊन पलिकडच्या किनाऱ्याला लागला आहेस हे स्वीकारते मी. मागची काळजी करु नकोस… करणार नाहीसच हे कळतंय आता. जाशील तिथं आनंदात राहा… फक्त एकदा दृष्टी साफ करुन पाहा… भूतकाळात नाही, वर्तमानात आणि भविष्यकाळात… कारण मी आता स्वीकारलंय तुझं नसणं… मनोमन. 



जस्मिन जोगळेकर 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

भाग एक