वाट पाहताना...
अगदी पूर्ण मान्य आहे मला की वसंत वैभवाची शान काही आगळीच! वसंताची वाट पाहणारा कोणी नाही असं होऊच शकणार नाही. जादू आहे ती निसर्गाची! रंगांची उधळण करणारा तेव्हाचा निसर्ग खूप साजिरा दिसतो… कोण प्रेमात पडणार नाही त्याच्या? फुलांनी बहरलेला, कीटकांना-पक्ष्यांना आकृष्ट करणारा, सृजनाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारा, एकूणच मोहात पाडणारा असा… असा भोवताल आवडेलच ना सगळ्यांना!… मी ही या भोवतालाच्या प्रेमात आहेच अरे. पण… पण फक्त त्याच प्रेमात अडकलेले नाहीये रे. म्हणूनच तुलाही अडकू देत नाहीये. तू कर ना या वसंतावर प्रेम… फक्त तेव्हा हातातून बाकी काही निसटू देऊ नकोस असं वाटतंय रे. कसं होतं ना कधी कधी… भविष्यातल्या एखाद्या क्षणाची वाट पाहताना वर्तमानातले क्षण हातातून कधी गळून पडतात कळत देखील नाही. म्हणून म्हणतेय…. अडकू नकोस ज्या क्षणाची वाट पाहतोयस फक्त त्या क्षणात… वर्तमानातला क्षण अन् क्षण जगून घे तुला अपेक्षित क्षणाची वाट पाहताना…
जरा या शिशिराकडेही बघ ना तेवढ्याच प्रेमानं. मी कायम म्हणते हा शिशिर आहे म्हणून वसंताचं कौतुक होतं. शिशिराच्या पानगळीतही एक वेगळं सौंदर्य आहे. कधी वाट पाहिली आहेस या सौंदर्याची? कधी अनुभवली आहेस तेव्हाची स्तब्धता? पानं गळलेल्या वेड्यावाकड्या फांद्या किती छान दिसतात निळ्या आकाशाच्या कॅनव्हासवर! पाहिल्या आहेस कधी? पौष, माघातलं पहाटेचं धुकं आणि ही निष्पर्ण झाडं… ते धुकं सुद्धा पानांचा अडथळा नाही म्हणून आनंदानं फांद्यांवरुन घरंगळत असेल… या दृश्यांची वाट पाहिली आहेस कधी? एकदा… फक्त एकदा मी म्हणतेय म्हणून शिशिरालाही आपलं म्हण आणि मग बघ… तुला वसंत अजून वेगळा, सुंदर भासेल. म्हणून म्हणतेय…. अडकू नकोस फक्त त्याच अपेक्षित क्षणात… त्या क्षणाची वाट पाहताना…
आठवतंय का तुला… आपल्या शेजारच्या बाभळीवर सुगरण घरटं करायला लागला होता ते? किती उत्सुकतेनं आपण रोज ते बघत होतो! घरटं पूर्ण व्हायची वाट बघत होतोच; पण पूर्ण झालं की बघू असं म्हणालो असतो तर? किती आनंदाचे, आश्चर्याचे क्षण गमावले असते आपण… रोज समोरच्या माडावर जाऊन धागे आणणं, ते सुबकतेनं गुंफणं, अधून मधून येणाऱ्या मादीचा तोरा, अचानक थोड्या काळासाठी दुसऱ्या सुगरणचा झालेला प्रवेश, मग त्यांच्यात झालेली भांडाभांडी, सिल्व्हरबिलने घरट्याला दिलेली भेट, त्यानं घरट्याचं आतून बाहेरुन केलेलं निरीक्षण, भारद्वाजचं घरट्याच्या आसपास वावरणं… आठवतंय ना? तेवढ्या काळात किती वेगवेगळ्या भावनांना सामोरं गेलो आपण. मी तर इतकी गुंतले होते त्यात की ही आपली शेजारीण तिच्या या घरात रहायला आली की तिला हळदी कुंकवालाही बोलावशील घरी म्हणून चिडवत होतास मला… पण… पण पावसानं पाणी फिरवलं ना बिचाऱ्याच्या कष्टावर. घरटं पूर्ण झालंच नाही ते. पूर्ण झालं की बघू या विचारानं पाहिलंच नसतं त्याकडं तर?... ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो तर पाहता आला नाही आपल्याला… पण तो पूर्ण होण्याच्या दिशेनं जो प्रवास चालू होता तो किती सुंदर होता! म्हणून म्हणतेय… वर्तमानातले असे क्षण निसटू देऊ नकोस. वाट नक्कीच बघ तुला अपेक्षित असलेल्या क्षणाची… पण अडकू नकोस फक्त त्याच एका क्षणात…
वाट पाहण्यातली मजा काही औरच! म्हणतोस ना तू… पटतंय मला. जगात पहिल्यांदाच येणाऱ्या नवीन श्वासाची वाट पाहणं, गोंडस कळीचं फूल होण्याची वाट पाहणं, एखाद्या शांत समुद्रकिनारी सूर्यास्ताची वाट पाहणं, बिजेच्या कोरीची किंवा पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहणं…. किती गोष्टी आहेत ना या जगात ज्या आपल्याला भाग पाडतात त्यांची वाट पहायला!…. एवढंच काय घरी आपली कोणी वाट पाहतंय ही भावनाही किती गोड आहे अरे! पण ती सगळी प्रक्रिया सहजतेने व्हायला हवी ना… मैफिलीत कशी समेवर आपोआपच आपली आनंदाने थाप पडते… तेव्हा आपण समेची वाट पाहत नसतो ना मुद्दाम… तशी सहजता हवी. कधी जमेल हे? मला वाटतं वर्तमानात आनंदाने जगत भविष्यातल्या त्या क्षणाची वाट पाहताना…
हे सगळं तुला सांगताना एकदम मनात काय विचार आला माहितेय… आपण आरंभाची तर मनापासून, उत्सुकतेनं वाट पाहत असतो; पण कधी अंताची वाट पाहतो का रे? निसर्गातल्या हिरवाईची वाट पाहतो; पण पुढे येणाऱ्या पिवळेपणाची कधी पाहतो का? कळ्यांनी भरलेली झाडं कशी दिसतील याची वाट पाहतो; पण फुलं गळून गेलेली झाडं तेवढ्याच उत्सुकतेनं पाहतो का? कसे आहोत ना आपण… आतुरतेने वाट पाहत आरंभाचे तर आनंदाने स्वागत करतो… पण अंताचे स्वागत करायला, त्याची वाट पाहायला मात्र घाबरतो. आरंभ आहे तर अंत असणारच हे माहित असूनसुद्धा… हा विचार एकदम का मनात आला कळलं असेलच ना तुला? हो… एक जीव आता बरा होणारच नाहीये कळल्यावर त्या जीवाचा अंत तरी लवकर व्हावा अशी प्रार्थना करतेय आणि त्या क्षणाची वाट पाहतेय मी… तो जीवही याची वाट पाहत असेल नई. बघ ना… वाट पाहणं या प्रक्रियेचा शेवट आनंदी असू शकतो तसा दुःखदही. असो….
मला तुला हे कधीपासून सांगायचं होतं खरंतर. पण योग्य शब्दांची वाट पाहत होते मी ही. माहीत नाही ती वाट पाहणं संपलंय का? ते योग्य शब्द सापडलेत का मला… पण आता जास्त वाट न पाहता सांगून मोकळी झालेय; समजतंय ना तुला मला काय म्हणायचंय ते?... आपली दोघांची, दोघांनी मिळून पाहिलेली खूप स्वप्नं आहेत; जी पूर्ण होण्याची आपण वाट पाहतोय, त्यासाठी धडपडतोय. वाट पाहण्याचा हा प्रवास सुखद झाला तर उत्तमच आहे; समजा जरी मनासारखं नाही झालं तरी वर्तमानातले बरेच क्षण आहेत असे की जे आपल्याला परत नक्कीच उभारी देतील. म्हणून म्हणतेय… भविष्याची वाट पाहूया… पण वर्तमानाचा हात धरुन… चालेल ना?
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा