स्पर्श होता तुझा....
स्पर्श होता तुझा….
“काय गं, अशी खो खो खेळायला बसल्यासारखी का बसली आहेस तिथं? काय बघणं चालू आहे खाली?”
“काही नाही अरे, फिरता फिरता ही लाजाळूची फुलं दिसली, त्यांना बघता बघता या पानांशी बसले आपली खेळत. सगळी पानं मिटवली आहेत मी माझ्या बोटाच्या अलवार स्पर्शाने. आता ती परत कधी उघडतील याची वाट बघतेय. मिटताना जशी पटकन मिटतात; तशीच उघडताना पटकन उघडतात की हळूहळू ते बघायचंय. हसू नकोस… तू काय म्हणणार आहेस ते कळलंय मला. हेच ना की गुगलवर लगेच कळेल म्हणून. यामागचं शास्त्र माहीत आहे रे मलाही. पण तुला सांगू… अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, मला जाणूनबुजून परत परत अज्ञानी व्हायला आवडतं. प्रत्येकवेळी हे झाड निरखताना वेगळाच आनंद मिळत जातो. आता हेच बघ की… आपल्याला चंद्रावरचे दऱ्या डोंगर, त्यांची नाव माहित असली तरी त्याच्यावरचा तो कल्पनेतला ससा बघण्यातच मजा वाटते की नई. म्हणून सगळं माहित असूनदेखील मी लाजाळूला स्पर्श करुन लाजायला लावते.”
“मग मी ही अज्ञानी होऊन बघू का तुला स्पर्श केल्यावर तू कशी लाजतेस ते?”
तुझ्या या बोलण्यानं, स्पर्शाच्या कल्पनेनं हुरळून गेले खरी; पण लगेच विषय बदलत म्हटलं… “निसर्ग कसला भारी आहे ना रे! एकदम नाटकी… लाजाळूच बघ ना, स्पर्श झाला की स्वतःला मिटवून घेते. म्हणजे ती खाणाऱ्या प्राण्याला वाटावं की हिच्यात काही जीवच नाही, नको खायला हिला. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ही युक्ती. त्या ‘बी ऑर्किड’ने तरी किती नाटकी असावं रे… बिचाऱ्या माश्या! फसतात ना त्या फुलांच्या जाळ्यात. आपल्या एका पाकळीला चक्क मादी माशीसारखं रुप घ्यायला लावतात ती फुलं. मग नर त्या फसव्या माशीला स्पर्श करतात, त्यांच्याशी झटतात आणि आपण फसले गेलोय समजल्यावर दुसऱ्या फुलाला स्पर्श करुन परत फसायला जातात. तोवर त्या झाडानं ठरवलेलं परागीभवनाचं काम होऊन जातं ना. किती आतुर असेल ना नर माशी त्या मादीच्या स्पर्शासाठी! आणि या अशा स्पर्शासाठी किती विचारपूर्वक काम करायला लागलं असेल ना निसर्गाला! कमाल वाटते खरंच!”
“खरंय तू म्हणतेस ते… पण माझ्याकडेही लक्ष दे ना जरा. तुझ्या हाताच्या उबदार स्पर्शासाठी मी ही आतुर आहे गं…”
आताही तुझं हे वाक्य ऐकून, गालातल्या गालात हसत मी लाजाळूकडे बघत बसले. तेवढ्यात वाऱ्याची मंद झुळूक आली आणि पानांची सळसळ ऐकू आली. त्या आवाजानं एकदम वेगळ्या विश्वात नेलं मला. स्वतःशीच संवाद साधत असल्यासारखं पण तुला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाले… “स्पर्शात जादू आहे खरी आणि त्या स्पर्शातून निर्माण होणाऱ्या नादात सुख. बघ ना… या वाऱ्याचा पानांना स्पर्श झाला की होणारी सळसळ, नदीच्या प्रवाहाची झुळझुळ, फुंकरीचा बासरीला स्पर्श झाला की त्यातून निघणारे सुरेल सूर, टाळांच्या स्पर्शाने होणारा भक्तिमय नाद, देवघरातल्या घंटीतून येणारी किणकिण… हे असे स्पर्श आणि नाद किती मोहक असतात ना! आपल्या सगळ्या व्यथा, वेदना क्षणात मिटवून टाकणारे हे तरल स्पर्श आणि त्यामुळं निर्माण होणारे नाद दैवी म्हणावेत असेच आहेत.”
“असे कितीतरी दैवी स्पर्श असतील; पण आत्ता आठवायला लागलो तर रात्र इथेच होऊन जाईल. पाहिलंस का… क्षितिजाला निसटता स्पर्श करुन सूर्य कधीच पुढच्या प्रवासाला निघून गेलाय आणि आपण इथेच. तुझी लाजाळूही परत उघडलेय. वातावरणाला किट्ट अंधाराचा स्पर्श होण्याआधी घरी पोहोचलेलं बरं ना? निघायचं का आता?”
निघायचं का आता म्हणून तू तुझा हात पुढं केलास आणि तो धरुन मी तुझ्यासोबत चालायला लागले. किती आश्वासक होता तुझ्या हाताचा स्पर्श! सप्तपदीच्या वेळी झालेला तो स्पर्श आणि आताचा हा… तसूभरही फरक नव्हता त्यात. तसेच हात हातात गुंफून आपण घरी आलो आणि फाटक उघडताच नुकत्याच फुलू लागलेल्या जुईने आपलं स्वागत केलं. आपल्या आवारातल्या हवेनं जणू तिच्या अंगाभोवती जुईचा गंध लपेटून घेतला होता. त्या गंधाच्या स्पर्शानं तन-मन एकदम प्रफुल्लित होऊन गेलं.
दुसऱ्या दिवशी पहाटे तीच जुई हलकेच खुडून आणली. त्या नाजूक फुलांचा स्पर्श आणि त्यांचा सुगंध… मी न मागताही त्या फुलांच्या स्पर्शाने त्यांचा गंध माझ्या हातावर अलवार विराजमान झाला. नंतरही कितीवेळ मी त्या गंधात रमून गेले होते. बाकी कशाचाच स्पर्श होऊन तो गंध निसटून जाऊ नये म्हणून मी हाताला जपत होते. आता माझी वेणीही त्या गंधाच्या स्पर्शासाठी आसुसलेली जाणवली म्हणून जुईचा गजरा करायला घेतला. तेवढ्यात तू ही उठून आलास ते ‘गंध फुलांचा गेला सांगून’ गाणं गुणगुणतच. ‘सखया जवळ येता ढळे पापणी, गेले लाजून…’ या ओळी म्हणत माझी हनुवटी हलकेच वर केलीस. हे असे निसटते स्पर्शही खूप काही सांगून जातात असं जाणवलं मला परत. पण तेव्हाच सुई बोटात घुसली. ऊई... म्हणताना लक्षात आलं, या नाजूक फुलांनाही सुईच्या टोकदार स्पर्शाचा त्रास होत असेल का? एक क्षण नको वाटलं; पण गजऱ्याचा मोह काही सुटला नाही.
तेवढ्यात कोवळ्या किरणांनी वृंदावनाला स्पर्श करत तुळशीला वंदन केलेलं दिसलं आणि मन अजूनच टवटवीत झालं. तुझं लक्षही तिकडेच आहे पाहिल्यावर म्हटलं, “कसं असतं ना आपलं मन… ज्या भावनेचा स्पर्श होईल त्या भावनेत लगेच गुंतून जातं. बघ ना आत्ताच कसं… फुलाला सुई टोचण्याच्या कल्पनेनं हळवं झालं, फुलाच्या सुगंधानं प्रफुल्लित झालं, हनुवटीला झालेल्या तुझ्या हलक्या स्पर्शानं शहारलं तोवर सूर्यकिरण पाहून टवटवीत झालं. जेव्हा तू इथे नसतोस तेव्हा तुझा स्पर्श झालेली प्रत्येक वस्तू बघून ते तुझ्या आठवणीत उदास होतं. तू परत आलास की आनंदानं थुईथुई नाचायला लागतं. काय ना या भावनांच्या स्पर्शाची दादागिरी!”
“बाईसाहेब, तुमच्या मनात आणि डोक्यात विचारांनी कालपासून जे ठाण मांडलं आहे ते जरा तुमच्या हाताच्या स्पर्शानं हळुवार बाजूला सारा आणि पुढच्या कामांना स्पर्श करा आता.” असं म्हणत हसत हसत माझ्या खांद्यांना स्पर्श करत तू आत गेलास. तुझा तो स्पर्श किती काय काय सांगून गेला… वेगवेगळ्या भावनांच्या स्पर्शानं मनाला एकदम गुदगुल्याच झाल्या. सांगेन तुला कधीतरी.
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा