भाग तीन

भाग ३

त्यादिवशी इरा तिच्या आईबरोबर मंडईत भाजी आणायला चालली होती. रस्ताभर इराच्या अखंड गप्पा सुरू होत्या. तिच्या प्रत्येक वाक्याला आई नुसती हं हं म्हणत होती. घरापासून मंडई तशी जवळच होती. इराला भाजी मंडईत यायला फार आवडायचं. टोपलीतले भाज्यांचे ते वेगवेगळे रंग, त्यांचा ताजेपणा पाहताना ती हरखून जायची. त्याचबरोबर भाजी विकणारे काका, मावशी, आजी यांच्याबरोबर गप्पा मारायला तर ती कायम तयारच असायची. त्या सगळ्या मंडळींनाही इराचं फार कौतुक होतं. त्यामुळं ती मंडईत शिरताना दिसली की सगळी खुश व्हायची. 

तर त्यादिवशीही इरा मंडईत पोहोचली आणि मगच तिच्या गप्पांना ओहोटी लागली. नीट मांडून ठेवलेल्या भाज्यांकडे ती प्रेमाने पाहू लागली. सगळीकडे नजर टाकत टाकत इरा आईबरोबर तिच्या नेहमीच्या भाजीवाल्या काकांकडे गेली. आई तिला हव्या त्या भाज्या निवडत होती आणि इरा त्याकडे बघत आईशेजारी उभी होती. तिच्या आवडीची भाजी घेताना मात्र इरा उत्साहाने आईला मदत करत होती. सगळी भाजी मापून झाली आणि आईने "किती द्यायचे" विचारत पैसे आणि पिशवी काढायला पर्स उघडली. काकांनी सांगितलेले पैसे त्यांना दिल्यावरही आई पर्सचे कप्पे धुंडाळत असलेली इराला दिसली. काय शोधतेयस आई? या तिच्या प्रश्नाला आईकडून पिशवी असं उत्तर आलं. सगळं शोधूनही पिशवी मिळत नाही म्हटल्यावर आई स्वतःशीच बोलली, आज घरातून निघताना पिशवी घ्यायची विसरले की मगाशी पर्समधून फोन काढताना पडली काय जाणे. पण सोबत पिशवी नाहीये कळल्यावर ती काकांना म्हणाली, 'काका, माझी सगळी भाजी वेगळी ठेवाल का जरा? मी घरी जाऊन पिशवी घेऊन येते.' त्यावर काका म्हणाले, 'अहो वहिनी, एका पिशवी कुठे हेलपाटा मारताय. माझ्याकडे आहे ना कॅरीबॅग. त्यातून घेऊन जा भाजी.' खरंतर इराला देखील काकांचा तोडगा पटला होता. पण आई काही त्याला कबूल होईना म्हटल्यावर दोघींचा मोर्चा निघाला परत घराकडे.

वाटेत इराने आईला विचारलं, 'अगं आई, काका म्हणत होते तसं जर आपण कॅरीबॅग घेतली असती तर आपला हेलपाटा खरंच वाचला असता ना. आपलं घर अगदी दहा मिनिटांवर असलं तरी हा वेळ वाया गेला नसता आपला. कॅरीबॅगला तू ठाम नको का म्हणालीस?' मंडईतली इराची चुळबुळ पाहून हा प्रश्न कधी ना कधी आपल्यापर्यंत येणार याची चाहूल आईला तेव्हाच लागली होती. हलकेच हसत ती इराला म्हणाली, 'वेळ वाया गेला तरी हरकत नाही पण प्लास्टिक मात्र आपण अजिबात वापरायचं नाही. हे प्लास्टिक पर्यावरणाला अतिशय धोकादायक आहे.' तरी इराला प्रश्न पडलाच होता की, एवढीशी कॅरीबॅग पर्यावरणावर एवढा मोठा काय परिणाम करणार? तसं तिने आईला विचारलंही. आई म्हणाली, 'अगं हिच्या एवढ्याशा दिसण्यावर जाऊ नकोस. आज मी एक कॅरीबॅग घेतली, उद्या तू घेशील, ऑफिसमधून येताना काही आणायचं झालं तर बाबा घेतील, आपल्या शेजारच्या देविकाची आई, वेदांतची आई असं करत सगळ्यांनी जर कॅरीबॅग घेतली तर पुढे काय होईल याचा विचार कर बरं.' तरी प्रश्नाचा उलगडा इराला झाला नाही. कारण प्लास्टिकचे तोटे तिला माहित नव्हतेच ना. म्हणून आई पुढं काय सांगते ते ती नीट ऐकू लागली. 'हे बघ इरा, एखादा कागद किंवा त्या कागदाचे तुकडे करून जर तू टाकून दिलेस तर ते थोड्या दिवसांनी कुजून मातीत मिसळून जातात. मी भाज्यांची देठं नाही का बारीक चिरून खड्डयात टाकते, मग हळूहळू त्याचं खत होतं तसं. पण हे जे प्लास्टिक आहे ना ते मात्र काही केल्या कुजत नाही. अगदी वर्षानुवर्ष पडून राहिलं तरी. आता बऱ्याच लोकांची काय सवय असते... कॅरीबॅग मिळते तर पिशवी जवळ ठेवायची नाही आणि वापर झाला की ती कॅरीबॅग सरळ केरात टाकून द्यायची. आता मला सांग सगळ्यांनी फेकून दिलेल्या या कॅरीबॅग कुजून तर जाणार नाहीत. मग त्यांचं होईल काय? नुसता कचरा.. कचरा.. कचरा. वाऱ्यावर इकडे तिकडे उडत राहील, भटकी जनावरं काही खायला मिळालं नाही तर प्लास्टिक खातील. कळतंय का मी काय म्हणतेय ते? जी गोष्ट खायची नाहीये ती खाल्ल्यावर त्या जनावरांच्या पोटात काय होईल बरं?' आईचा मुद्दा आता कुठे इराच्या लक्षात यायला लागला. तेव्हाच इराला आठवले ते आपल्या शहराबाहेर पडल्यावर घाटात जागोजागी दिसणारे प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढीग. ते ढीग पाहून तिनं तिचं नकटं नाक मुरडलंही होतं. तेव्हा ती आईला म्हणालीही होती की, आपल्याकडे येणारा कोणी पाहुणा या अशा रस्त्याने आला तर हे ढीग बघून त्याला गावात शिरायची इच्छा तरी होईल का गं? खरं सांगू मला तरी होणार नाही बघ. आई पुढं सांगतच होती. 'प्लास्टिकचा हाच कचरा मग नदी नाल्यात, गटारात जाऊन साठतो. मग पावसाळ्यात गटारं तुंबली की सगळं सांडपाणी रस्त्यावर येतं आणि नुसती रोगराई पसरते. आठवतंय का तुला… आपण बीचवर फिरायला गेलो होतो तेव्हा प्लास्टिकचा किती कचरा तिथं पडला होता. पाच मिनिटं पण आपण तिथं थांबू शकलो नव्हतो.' आई सांगत होती आणि इरा त्यावर विचार करत होती. 

आईचं म्हणणं किती खरं होतं! प्लॅस्टिकच्या विळख्याने इराच्याच गावाला नव्हे तर संपूर्ण जगाला भेडसावलं होतं. आता तर जग प्लॅस्टिकच्या इतकं आहारी गेलं होतं की हे सगळं निस्तरणं फार फार अवघड होतं. इतक्या लहान वयातही इराला ही जाणीव झाली होती. त्यामुळेच आईने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिच्या मनाने पटकन ठाम तयार केलं होतं. आई विचारत होती….'आता सांग इरा, आपला दहा मिनिटांचा वेळ महत्त्वाचा की पर्यावरणाचे रक्षण महत्त्वाचे?'

(क्रमशः)

जस्मिन जोगळेकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक