पत्र लेखन २७
शांतता
“सोसवेना शांतता
कल्लोळ थोडा वाढवा”
असं गुरु ठाकूर जरी म्हणत असले ना तरी मला मात्र तूच जवळ हवी वाटायला लागलंय आता. तुझी किती आठवण येतेय म्हणून सांगू! माझ्या इतकं कोणी तुला मिस करत नसेल कदाचित. इतक्या वर्षांची तुझ्या सोबतीची सवय झालेय ना मनाला.. आसपासच्या कल्लोळाला म्यूट करुन फक्त तुझा हात धरुन वावरावं असं वाटतंय आता. पण कसं शक्य आहे ना ते…
अगदी मला आठवतंय तेव्हापासून तू माझ्या आसपास आहेसच. लहानपणीचे दिवस तर आपण कोकणातच किती आनंदात घालवले ना! आठवत असेलच तुलाही. तेव्हाचं कोकण तर एकदमच शांत. तिथे सकाळी तू असायचीस तेव्हा तुझ्या बरोबर प्रसन्नताही असायची. दुपारी मात्र वातावरणाप्रमाणं वेगवेगळ्या कोणाला तू सोबत घेऊन यायचीस. बाहेर पाऊस असला तर तुझ्या बरोबर आळस असायचा. ऊन असेल तर तगमग असायची. पण वातावरण कसंही असो तू हवीच. रात्री मात्र…. निरवतेला सोबत घेऊन आलीस की कधी कधी भीती वाटायची अगं. विशेषतः पावसाळ्यात. बाहेर अखंड पाऊस बरसत असायचा, अशा पावसाचं आणि लाईटचं तर भांडणच….मग अंधारात भीती वाटायची. कधी एकदा उजाडतेय असं वाटायचं. पण तेव्हापासून तुझ्या असण्याची सवय झालेय गं.
कोकणात असताना किंवा आताही तुझा वावर जास्त कुठं आवडतो माहितेय? समुद्र किनाऱ्यावर. समोर अथांग समुद्र आणि पाण्यानं नक्षी काढलेल्या ओल्या वाळूवर पाय उमटवत चालताना तुझी सोबत असतेच कायम…तेव्हा मनही किती शांत असतं! मग भोवतालचा विसर पडतो कधीकधी…. बऱ्याचदा. चालता फिरता आपोआप घडून येणारं ध्यानच की ते…समुद्रासमोर सोबत तू असताना खूपदा…खूपदा का नेहमीच वाटतं आता काहीतरी लिहायला सुचेल…पण कधीच जमलं नाही ते. का माहीत नाही पण मन एकदम कोरं होऊन जातं तुमच्यासोबत आणि ते आवडतंच मला. काय जादू असते एकेकाची काय जाणे! तशीच तुमच्या जोडीची. तिथून पाय निघत नाही अशावेळी. मग कधी वाळूचा छोटासा कण होऊन तिथंच पडावं वाटतं, कधी पाण्याचा थेंब होऊन त्या अथांगतेत मिसळावं वाटतं तर कधी खेकड्याच्या चालीनं भिरभिरावं वाटतं. आता तुमचा दोघांचा विचार करायला गेलं की आठवतात त्या कोजागिरीच्या रात्री. समोर समुद्र, त्याची गाज, वर चंद्राचा पाझरणारा प्रकाश आणि सोबत अर्थातच तू…किती सुंदर क्षण असायचे ते…तुझं महत्त्व अधोरेखित करणारे आणि कधीच न विसरता येणारे.
काही काळ आपण कायम सोबत होतो. पण त्यानंतर आपल्या वाटा वेगळ्या झाल्या. म्हणजे मी वेगळ्या वाटेकडे गेले म्हण हवं तर. पण त्या वाटेवरही मी तुला कायम शोधत राहिले. तशी अधून मधून भेटत होतीसही मला, पण वेगळ्या रुपात. कधी एखाद्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात, तर कधी एखाद्या कला दालनात. पण तिथली तू जास्त कुठली आठवतेस मला सांगू? अगदी गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या एका दत्त मंदिरातली तू. गर्दीतून मंदिराचा उंबरा ओलांडून आत गेलं की एकदम शांत, प्रसन्न होऊन जायचं मन. देवासमोर हात जोडले जायचेच असं नाही, पण मन मात्र कुठंतरी वेगळ्या ठिकाणी पोहोचलेलं असायचं. ते क्षणही असेच…न विसरता येण्यासारखे. अर्थात तू सोबत असलेले सगळेच क्षण असे…न विसरता येण्यासारखे.
त्यानंतर परत मीच वाट बदलली. या वाटेवर तू ही सोबत होतीस माझ्या. ठिकाण, वेळ, काळ बदललं तरी तू मात्र कधी बदलली नाहीस. हे ठिकाण असं की शांततेबरोबर समाधानही नांदत होतं मनात…आसपास. सकाळी न लावलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाच्या गजरानं जाग आली की पुढचा दिवस प्रसन्नतेनं सरत जायचा आपोआप. असे आवाज भोवताली असले तरी त्यांचा कधी कल्लोळ वाटत नाही नई. माणसांपेक्षा आसपास पक्षी, गायी, म्हशी, शेळ्या यांचाच वावर जास्त. ह्या बिचाऱ्या मुक्या जीवांनी कधीच तुला त्रास दिला नाही नई का. पक्ष्यांचं बागडणं म्हणजे तर तुझंच दुसरं रुप. कदाचित माझ्या तिथल्या वावरण्यात त्यांनाही तुझं रुप दिसलं असावं, म्हणून आमची छान मैत्री झाली…अगदी तुझ्या माझ्या सारखी. असे कसे गं तुम्ही सगळे!...जीव लावण्यासारखे. इथल्या रात्री ना कधी कधी मला कोकणातल्या रात्रींची आठवण करून द्यायचा, म्हणजे त्या भीतीदायक म्हणत नाहीये हा… कुंदाच्या मंद सुगंधानं भारलेल्या रात्री म्हणतेय. कोकणातल्या त्या रात्री कशा होत्या आठवतात ना तुला? अंगणात कॉटवर पहुडलेल्या अवस्थेत आपण, शेजारी भरगच्च बहरलेला कुंद आणि वरती ताऱ्यांच्या गर्दीनं फुललेलं आकाश…इथं यात थोडा बदल असला तरी तू मात्र तशीच…तिथं असायचीस तशीच. खूप आठवण येतेय तुझी!
आणि आता परत मी वाट बदलली तर तू ही वाट बदलून माझ्याबरोबर का गं नाही आलीस? माहितेय मला काही काळासाठीच आपली ताटातूट झालेय. तू अशी साथ सोडणार नाहीस हे ही माहितेय. पण आता तुला सारख्याच उचक्या लागत असतील ना? क्षणोक्षणी, पदोपदी तुझी आठवण येतेय. तू आसपास नसलीस तरी मनाला शांत ठेवायचा प्रयत्न करतेय मी आणि आता बऱ्यापैकी जमायलाही लागलंय ते मला. सगळ्या गोष्टींची सवय हवी ना… पण सूर्याभोवतीच्या आपल्या फेऱ्या जशा वाढत जातात ना तसं बदलांना पटकन जवळ करणं जमत नाही गं. असो…
तर सांगायचा मुद्दा काय…मी तुला खूप मिस करतेय, तुला विसरणं तर कधीच शक्य नाही. तू ही विसरु नकोस मला. आपल्यावर मनापासून प्रेम करणारी कोणी एक वेडी आहे हे लक्षात ठेव. बाकी भेटू लवकरच…
कायम तुझीच…
जस्मिन जोगळेकर
२८/०९/२०२५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा