भाग दोन
भाग दोन
दिवस भराभर पुढं सरकत होते. तसे इराच्या डोक्यातले विचारही सुपरफास्ट पुढं जात होते. त्या दिवशी बागेत झाड आणि झोपाळा यांच्यातलं बोलणं ऐकल्यावर इराच्या मेंदूत प्रश्नांची गर्दी व्हायला लागली होती. गळ्यात घालायची सोन्याची साखळी तर इराला माहीत होती, पण त्यादिवशी झाड म्हणत होतं ती पर्यावरणाची साखळी कोणती ते तिला माहित नव्हतं. आईकडून त्याची माहिती मिळवायची ठरवून त्या रात्री इरा झोपी गेली होती आणि त्याच वेळी पर्यावरण विषय हिला सोप्या भाषेत कसा समजावून सांगायचा या विचारात आई जागी होती.
बागेतल्या त्या प्रसंगानंतर एक दिवस इरा तिच्या घराभोवतालच्या बागेत खेळत होती. जास्वंद, जाई जुई, गुलाब, प्राजक्त, शेवंती अशा फुलझाडांबरोबरच इतरही दिखाव्याची झाडं इराच्या आजोबांनी आवडीने लावली होती. तिथे खेळता खेळता इरा जुईच्या वेलीपाशी गेली. अचानकच त्यातून एक इवलुशी चिमणी जोरजोरात ओरडत बाहेर आली आणि शेजारी कंपाऊंडच्या भिंतीवर बसून दंगा करायला लागली. आपल्याच तंद्रीत खेळत असलेली इरा चिमणीच्या अनपेक्षित दंग्याने घाबरून घरात पळत गेली. आपली काय चूक झाली हे न कळल्याने ती कावरी बावरी झाली होती. यात महत्त्वाचं हे होतं की अनवधानाने आपल्याकडून काहीतरी चुकलंय हे कळण्याइतकी इरा वय लहान असूनही संवेदनशील होती. इराला असं पळत येताना बघून आईला प्रश्न पडला. पण आज इरा लगेचच आईपाशी गेली आणि धापा टाकत बागेत घडलेला सगळा प्रसंग ती आईला सांगू लागली. तिच्याकडून सगळं ऐकल्यावर आईने मनात म्हटलंच, चला आता आज इराला पक्ष्यांच्या दुनियेत थोडं फिरवून आणूया.
त्या चिमणीच्या अशा वागण्याचा अर्थ समजून घ्यायला इरा उत्सुक होतीच. आता आईने तिला जवळ घेतलं आणि ती सांगू लागली. ‘हे बघ इरा, ती चिमणी इतका दंगा करत होती म्हणजे तिथं झाडात तिचं घरटं असणार. त्या चिमणीला वाटलं असेल की तू इतक्या जवळ येत आहेस म्हणजे घरट्याला, त्यातली अंडी किंवा पिल्लांना त्रास देशील. आता तुला कोणी उगाच त्रास द्यायला लागलं तर ते मी मुकाटपणे सहन करेन का?’ त्यावर इरा म्हणाली, ‘अगं पण आई मी कुठे चिमणीला त्रास द्यायला गेले होते. मी तर खेळत होते तिथं.’ ‘खरंय बाळा…पण त्या चिमणीला तसं वाटलं असणारच ना. तो एवढासा जीव विरोध म्हणून ओरडण्याशिवाय काय करू शकणार. पण तुला एक गंमत सांगू? हे इवले जीव फार लळा लावतात गं. तू जर प्रेमाने त्यांच्याशी बोलायला गेलीस ना तर ते ही आपल्याशी मैत्री करतात.’ त्यावर इरा म्हणाली, ‘पण आई… त्यांना आपलं बोलणं कसं कळणार? आणि त्यांनाही आपल्याशी मैत्री करायची आहे ते आपल्याला कसं कळणार?’ त्यावर आई हळूच हसली आणि इराला म्हणाली, ‘अगं, मैत्रीसाठी काय फक्त भाषाच यावी लागते असं नाही. न बोलताही मैत्री होऊ शकते. तू आता प्रयोगच करून बघ ना. ही चिमणी आज ओरडत होती. हो ना? आता उद्या परत त्या जागेवर जाताना अजिबात उड्या न मारता सावकाश आणि सहज चालत जा. ती चिमणी घरट्यातून बाहेर आली आणि जवळपास बसली की तिच्याशी तुझ्या भाषेत प्रेमाने गप्पा मार. तुझ्या घराला आणि पिल्लांना मी अजिबात त्रास देणार नाही, उलट मांजरापासून त्यांचं रक्षण करीन असं हळुवारपणे तिला सांग. मग बघ…ती चिमणी ओरडते का ते.’ आईच्या या बोलण्याची इराला गंमत वाटली. तिने दुसऱ्या दिवशी तसं करून बघायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या इरा बागेत गेली. अगदी सावकाशपणे ती जुईच्या वेलीकडे गेली. आजही ती चिमणी भर्रकन उडत बाहेर येऊन वरच्या तारेवर बसली. कालपेक्षा तिचा दंगा आज कमी आहे हे इराला जाणवलं. मग तिने चिमणीशी नाजूक आवाजात गप्पा मारायला सुरुवात केली. आईने सांगितलेलं सगळं इराने त्या चिमणीला सांगितलं. ती इटुकली चिमणीही मान मुरकत तिचं बोलणं ऐकतेय असं इराला वाटलं. मग किती वेळ ती गप्पाच मारत बसली. अखंड बडबड करणं तर इराचा हक्कच. या काळात ती चिमणी देखील आत बाहेर करत होती. एकदा तर चोचीतून ती काहीतरी घेऊन घरट्यात शिरलेली इराने पाहिली. थोड्या वेळाने इराच्या पोटात कावळे ओरडायला लागले तशी ती घरात गेली.
नाश्ता करताना इराचा मेंदू शंभरच्या वेगाने पळत होता. आईचं म्हणणं तिला पटलं होतं. आपण जीव लावला तर हे इवलेही जीव लावतात. किती छान ना! इराला जाणवलं की चिमणीचं ओरडणं नंतर अगदी बंद झालं होतं. चिवचिव सुरू होती पण आधीच्या ओरडण्याचा आवाजात आणि यात खूप फरक पडला होता. माझ्याकडून तिच्या घराला काही त्रास नाही म्हटल्यावर ती निर्धास्त झाली होती. आईने हटकल्यावर इराने तिला चिमणीशी झालेल्या मैत्रीबद्दल सांगितलं. चोचीतून तिला काहीतरी नेताना पाहिलं कळल्यावर आई खुश होऊन म्हणाली, ‘अगं म्हणजे तुझ्या त्या मैत्रिणीची पिल्लं त्या घरात असणार. तिची खूप काळजी घ्यावी लागणार बरं आता आपल्याला.’ ते ऐकून तर इरा घर डोक्यावर घेऊन नाचायलाच लागली. तिला आता पिल्लं बघायची उत्सुकता वाटू लागली. पण आईने तिच्या उत्सुकतेला वेळीच आवर घातला आणि लांबून बघायचा सल्ला दिला.
या सगळ्यातून इराला कळून आलं की आपण त्रास दिला नाही तर निसर्गातलं कोणीही आपल्याला त्रास देत नाही. प्रत्येकाला त्याच्या तऱ्हेने शांत जगू दिलं तर हे जग म्हणजे स्वर्गच बनेल जणू. नुसत्या या विचाराने देखील इरा मनोमन खुश होऊन गेली.
(क्रमशः )
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा