श्रावण भाद्रपद.... वर्षा ऋतू

आषाढ घनांना, आषाढ सरींना शांतवत पुढं येतो तो श्रावण. श्रावण म्हटल्यावर कितीतरी आल्हाददायक गोष्टी डोळ्यासमोरुन पटकन सरकून गेल्या ना! अगदी 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' कसं होतं श्रावणात….तशा. उन्हाची क्षणिक ऊब आठवतेय तोवर पावसाच्या रिमझिम सरीत भिजायला झालं. मागोमाग इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात सूर मिसळतोय तोवर हिरवागार सभोवताल मिंड घ्यायला लावतो. आकाशातली वेगवेगळ्या रंगांची मस्ती बघतोय तोवर पायाला तृणपाती हळूच गुदगुल्या करून लक्ष वेधून घेतात. नजर कुठेही फिरवली तरी हिरवाईच्या छटा नजरेत भरणारच. काळे कबरे दगड देखील हिरव्या मऊशार शेवाळाने नटून मिरवायला लागतात. डोंगर बिंगर, दऱ्या खोऱ्या सगळं सगळं हिरवंगार…आणि अशा या नटलेल्या सृष्टीवर कधी सोनसळी उन्हाचा शेक तर क्षणात गुलाबदाणीतून शिंपडणारा पाऊस…हा श्रावणाचा अवखळपणाच म्हणायला हवा. पण श्रावणाचा साज काही निराळाच… मोहित करणारा.  

श्रावणाचं सौंदर्य खुलवणारा खरा दागिना कोणता माहितेय…..या काळात फुलणारी इवली इवली, विविधरंगी रानफुलं. श्रावणातल्या वर्षा ऋतूची ही ओळख. आषाढातल्या कोसळणाऱ्या पावसाला दबकून असणारी ही नाजूक फुलं श्रावणात पाऊस सरीवर आला की मनमोकळेपणानं त्याच्याशी मैत्री करतात. यांचा जीव तो केवढास्सा आणि आयुष्यही केवढं! पण बघणाऱ्याला केवढा मोठा आनंद देऊन जातात! आमचं कोकण आधीच सुंदर…श्रावणात तर ते अजूनच खुलतं…आणि त्यात ही रानफुलं फुलली की कोकण म्हणजे नंदनवनच. निळी, जांभळी, पिवळी, गुलाबी, पांढरी…रंगांच्या कित्ती कित्ती छटा दिसायला लागतात. उन्हाळ्यातले काळे कुळकुळीत कातळ सडे हेच का असा प्रश्न पडतो मग. वाऱ्यावर डुलणारी फुलं बघून मन वेडं होतं अक्षरशः. या फुलांना डोलताना पाहिल्यावर काय वाटतं सांगू…यांच्यासाठी कोणी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला किंवा असंच एखादं छानसं बालगीत म्हणतंय की काय! त्या कातळावरुन वाहणारा वारा म्हणत असेल का? नाहीतर बघा ना…आषाढघनांशी झुंजणारा तो वारा कुठं आणि या नाजूक फुलांना त्रास होऊ नये म्हणून हळूवार वाहणारा हा वारा कुठं. या रानफुलांची नावंही किती छान! विष्णुकांत, सीतेची आसवं वगैरे…नावं एकदम भारदस्त आणि जीव मात्र इवलुसा… प्रत्येक नावामागे काही न काही कहाणी. या छोट्या छोट्या फुलांत पिवळ्या रंगाची सोनकी मात्र आकारानं थोडी मोठी. जमिनीचा बराचसा भाग सोनकीनं व्यापलेला असला तरी त्यातच पांढऱ्या रंगाची भुई आमरी अधेमधे तोऱ्यात डोलत असते. बाकी काही रानफुलं इतकी छोटी आणि जमिनीलगत असतात की भिंग लावून त्यांच्याशी बातचीत करावी लागते. ती फुललेल्या वाटेवरुन चालून त्यांना इजा करावी वाटत नाही. अशावेळी पंख असते तर त्यांच्यावरुन हळुssवार उडत जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटून जातं. रानफुलांची आणि निसर्गाची ही किमया! शब्द तोकडे पडतील अशी. 

या रानफुलांबरोबरच परसबागेतली फुलं फुलत असतातच बरं का! याचवेळी फुलणारा पांढरा, पिवळा सोनटक्का म्हणजे मंद सुवासाची अत्तरदाणीच…यांना झाडावरुन खुडताना फूल थोडा विरोध करतं. पहिल्यांदा सासरी जाणाऱ्या मुलीची नाही का पावलं जड होतात, तसं असेल कदाचित. सोनटक्क्याचं फूल सहज निघायला तयार होत नाही. हलक्या हाताने पण जरासा जोर लावून खुडलं तरच ती नीट पूर्ण देठासह हातात येतात. भरपूर फुलं असली तर ती घरात फ्लॉवरपॉटमधे ठेवायला मला फार आवडतं. थोडावेळ जरी घर बंद करुन बाहेर गेलं तर हॉलभर सुगंधाची पखरण करुन ही आपली वाट बघत बसलेली असतात. किती छान वाटतं सांगू…ग्रीष्माला कुंद मोगरा सजवतात. यांच्यामागे जुई येते. आषाढाच्या पावसात जुईच्या फुलांचा काही निभाव लागत नाही. तोवर वर्षा ऋतूत सोनटक्का उमलायला लागतो. एकंदरीत काय…पावसाळ्याच्या जरा आळसावलेल्या संध्याकाळ ही फुलं ताज्या करुन टाकतात. शेवटी फुलं ती फुलंच…त्याची सर नाही कोणाला. 

श्रावणातल्या फुलांची ओढ माणसालाच नाही तर देवालाही असावी. म्हणूनच फुलांनी सजायची आस पूर्ण करायला एवढे सण येतात बहुतेक या महिन्यात. यातल्या मंगळागौरी म्हणजे तर पत्री फुलांची लयलूटच. मंगळागौर म्हटलं आणि किती काय काय आठवलं पूर्वीचं. कोकणात रात्र रात्र केलेले जागर, प्रत्येकीबरोबर घातलेल्या फुगड्या, न ठरवता पण नकळत झालेल्या बसफुगडीच्या चढाओढी…पहाटे पहाटे खेळणाऱ्यांची संख्या कमी होत गेली, दमायला झालं की लावलेल्या गाण्यांच्या भेंड्या आणि पहाटवाऱ्यात घराकडे ओढत नेणारी पावलं….किती न काय काय! ती मजा वेगळीच होती हे खरं. 

वेगवेगळ्या आणि भरपूर सणांनी सजलेल्या वाटेवरुन नंतर दिमाखात येतात ते गणपती. गणपतीचे दिवस म्हणजे तर भक्ती आणि उत्साहाची लाटच. परत गणपती म्हटलं की आठवतं ते कोकणच. बाप्पांचे आगमन, भरपूर तूप घालून खाल्ले जाणारे उकडीचे मोदक, रोज संध्याकाळी घरची आरती, ती झाली की आळीतल्या इतर घरात जाऊन तिथल्या बाप्पांचं दर्शन, स्वच्छ सारवलेल्या जमिनीवरची रेखीव पावलं, त्यावरुन गौरीचं आगमन, गौरी जेवण आणि नंतर बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या म्हणत दिला जाणारा निरोप….काय दिवस असायचे ते! बाप्पांचं एकत्रित होणारं विसर्जन आणि नंतर तिथंच नदी काठावरच्या काळया खडकांवर बसून खाल्लेले दही पोहे… त्याची चव अजून रेंगाळतेय जिभेवर. किती आनंदाचे आणि छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानण्याचे दिवस होते ते! श्रावण आणि गणपतीची मजाच न्यारी! 

या काळात तेरड्याची किंवा गौरीची फुलं बहरात असतात. फिक्कट गुलाबी, भडक्क लाल किंवा फिकट आणि गडद जांभळ्या रंगांची गौरीची फुलं परडीत दुर्वांच्या जुडीसोबत किती छान दिसतात! झाडावरुन खुडताना ते अगदी नाजूकपणे खुडावं लागतं. आदल्या दिवशीचं फूल असेल किंवा खुडण्याची जागा चुकली तर पाकळ्या विलग होऊन हातात येतात. दरवर्षी गौरीची झाडं आपली आपण इनामेइतबारे उगवून येतात. गौरीच्या जोडीलाच या काळात भरभरुन फुलते ती गुलबक्षी. गुलबक्षी म्हटलं की आठवते ती तिच्या लांब लांब देठांना एकमेकांत गुंफून केलेली वेणी. संध्याकाळच्या पूजेत बऱ्याचवेळा ही वेणी देवांच्या गळ्यात विराजमान झालेली दिसायची. पांढऱ्या आणि गुलाबी रंग जेव्हा एकाच फुलात दिसायचे तेव्हा खूप गमंत किंवा आश्चर्य वाटायचं लहानपणी. मग घरातल्या सगळ्यांना ते दाखवत बसायचं. नंतर याच्या काळया, खरखरीत बिया झाडावरुन गोळा करायच्या, त्या इतर ठिकाणी मातीत टाकून ठेवायच्या आणि झाड उगवून येतंय का हे बघत बसायचं. बी टाकल्यावर काय लगेच झाड उगवणार थोडंच…मग दिसत नाही म्हटल्यावर कंटाळून नाद सोडून द्यायचा. मग अचानक कधीतरी पिल्लू झाड उगवलेलं दिसलं की कोण आनंद व्हायचा! काय एकेक लहानपणच्या गमती जमती…..

आषाढातल्या पावसानंतर श्रावणात येणारा रिमझिम पाऊस सुरु झाला की पक्षीही जरा मोकळा श्वास घेत असावेत. या फांदीवरुन त्या फांदीवर उडण्याची त्यांची लगबग हळूहळू दिसायला लागते. काहीजण घरटी बांधणं, अंडी घालणं आणि मग पिल्लं जन्मली की ती घरट्यातून उडून जाईपर्यंत त्यांचं पालनपोषण करणं यात व्यग्र होतात. पावसाळ्यानंतर ॲशी प्रिनिया, बुलबुल यांची पुढची पिढी या जगात येते. आमच्या बागेत या काळातच प्रिनियाने कुंडीतल्या झाडाच्या आडोशाला घरटं केलं होतं. ते कळलं नव्हतं तेव्हा एकदा त्या झाडाजवळ गेले तर महाराज घरट्यातून जोरात उडून वरच्या तारेवर जाऊन अखंड ओरडत बसले होते. घरट्याची मी काळजी घेईन, त्रास देणार नाही असं मी सांगितलेलं बहुतेक त्याला कळलं असावं. परत कधीही मी तिथं गेले की तो घरट्यातून उडून वर शांत जाऊन बसायचा. किती उत्सुकतेनं मी पिल्लांची वाट बघत होते. तशी झालीही…त्यांना चोचीतून खाऊ घेऊन येताना दिसायची जोडी. पण नंतर कळलं नाही पिल्लं उडून कधी गेली. मांजरानं डल्ला मारला नसावा एवढंच म्हणत बसले नंतर. बुलबुल ही घरटी करायचे. कितीजणांच्या किती पिढ्या जन्माला आल्या बागेत. या सगळ्या प्रक्रियेत आपला सहभाग फक्त बघण्याचा…त्यात एक वेगळंच समाधान असतं पण.

एकंदरीत श्रावण म्हणजे निसर्गाची एक सुंदर निर्मिती. पृथ्वीवर फुललेली रंगबिरंगी फुलं पाहिली की वाटतं ही फुलांची एक मोठी परडीच! एकूण काय…. श्रावण भाद्रपद म्हणजे आनंदाचे, उत्साहाचे आणि सोहळ्याचे दिवस… माणसांचे आणि निसर्गाचेही. रंग-गंधांचा सोहळा, भक्तीचा सोहळा….हे दिवस सृजनाचे, मेघमालांना निरोप देण्याचे आणि हळूहळू पुढं येणाऱ्या थंडीचे स्वागत करण्याचे. 


जस्मिन जोगळेकर 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक