भाग पाच
भाग ५
आजीला बघून इरा प्रचंड खुष झाली होती आणि त्या नादात ती काकडीचा विषयही तात्पुरता विसरून गेली. एका हातात आजीची पर्स आणि दुसऱ्या हाताने आजीला आधार देत इरा तिला आत घेऊन आली.
हाश्य हुश्य करत आजी सोफ्यावर टेकली आणि इराने तिचा ताबाच घेतला. तिच्या मांडीवर हाताची कोपरं टेकवत इराच्या तोंडाची टकळी सुपरफास्ट वेगाने सुरू झाली. इतकी की तिची बडबड ऐकून आजीलाच श्वास घ्यायला दम लागायला लागला. त्यातूनच आजीला तिच्या लेकीची, जावयाची चौकशी करायची होती. पण इरा तिला बोलू देईल तर शप्पथ. पण आजीही शेवटी इराचीच आजी होती. इराशी बोलता बोलता इतरांशीही ती लवकरच गप्पा मारू लागली.
इकडची तिकडची ख्याली खुशाली बद्दल बोलून झाल्यावर एकदमच आजी इराच्या आईला म्हणाली, 'काय गं तुमच्या शहरातल्या नदीची अवस्था! नदी म्हणण्यापेक्षा तिला आता गटार गंगाच म्हणायला हवं बघ. या दोन पाच वर्षात फारच प्रदूषित झालेय की.' आई बाबांच्या बोलण्यातून इरा प्रदूषण, प्रदूषित शब्द ऐकत होतीच. आता आजीही तेच म्हणतेय म्हटल्यावर हे काही भयंकर प्रकरण दिसतंय याची इराला खात्री पटू लागली. आजीला याबद्दल विचारलंच पाहिजे असा ती विचारच करत होती तोवर आईने जेवायला हाक मारली आणि इराला भुकेची जाणीव होऊन ती मुंग्या जशा गुळाकडे आकृष्ट होतात तशी डायनिंग टेबलाच्या दिशेने खेचली गेली.
पोटात भुकेने कावळे ओरडत होते तरी आई, बाबा आणि आजीच्या बोलण्याकडे इराचं बारीक लक्ष होतंच. तरी मगाचं आजीचं नदीबद्दल बोलणं तिच्या डोक्यातून गेलं नव्हतं. तिच्या लहानपणापासून इरा तशीच नदी बघत आली होती. त्यामुळं खरी नदी कशी असते तिला फारसं माहीत नव्हतं. आजीच्या गावी घरामागे नदी आहे एवढं आठवत होतं तिला, पण नदी लक्षात राहण्याएवढी इरा तेव्हा मोठी नव्हती. मग आजीकडून सगळी माहिती घ्यायची तिने ठरवून टाकलं.
एकदा ठरवल्यावर इराला कुठला धीर धरवणार. दुपारी वामकुक्षीसाठी आजी आडवी पडताच आजी, मला तुझ्या नदीबद्दल सांग ना म्हणत ही शिरलीच तिच्या कुशीत. नदी हा आजीचाही जिवाभावाचा विषय. तिने लगेच इराला जवळ घेतलं. 'इरा, तुला आठवत नसेल ना आपली नदी. इतकी नितळ, निर्मल आहे की बस. मुळात सगळ्या नद्या तशाच असतात. पण आपल्या गावातल्या लोकांनी तिला तसंच ठेवलंय ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे. तिच्या खडकांवर बसून पाण्यात पाय सोडलेस ना की छोटे छोटे मासे येतात पायाला गुदगुल्या करायला. दुपारच्या उन्हात जर नदीवर गेलीस तर सूर्यकिरण अगदी तळाशी जाऊन तिथल्या दगडांशी खेळत असतात. आजूबाजूचे डोंगर, झाडी तिच्या पाण्यात आपलं रूप अगदी वाकून वाकून बघत असतात. निळ्याभोर आकाशात जेव्हा कापसासारखे ढग पळापळी करत असतात ना तेव्हा खाली पाण्यात त्यांच्यासारखाच दिसणाऱ्या ढगांशी ते दोस्ती करू पाहतात. लहान मुलं पाण्यात पोहण्यासाठी उतरली की तर नदी खुश होऊन जाते. तेव्हा त्यांची आई होऊन सगळ्यांचा सांभाळ करते.' आजी काय सांगतेय ते इरा मन लावून ऐकत होती. आजीला तर तिच्या लाडक्या नदीबद्दल किती आणि काय काय सांगू असं होऊन ती तिच्या आठवणीत गुंग झाली होती. 'आजी, खरी नदी अशी असते?' इराच्या या प्रश्नाने ती भानावर आली. 'हो इरा... खरी नदी अशीच असते. तुमच्या इथली नदीही पूर्वी अशीच होती. पण आता तिची रया पार गेली गं. नदीभोवती जशी वस्ती वाढत जाते ना तेव्हा पुढे कधी ना कधी तिचं रूपांतर गटारात होऊन जातं बघ. आपण माणसंच याला जबाबदार. आधी पैसा मिळवण्यासाठी शहरात राहायला यायचं. पैसा मिळू लागला की तो अजून कसा वाढेल यावर लक्ष देऊन नवनवीन व्यवसाय, कारखाने सुरू करायचे. कारखान्यातून जेवढ्या प्रमाणात उत्पादन सुरु होतं तेवढ्याच त्यातून टाकाऊ, हानिकारक गोष्टीही तयार होतात. मग त्या नको असलेल्या गोष्टी करायच्या काय? द्या नदीत सोडून. घरं वाढली की सांडपाण्याचं प्रमाणही तेवढंच वाढणार. त्याचं करायचं काय? द्या परत नदीत सोडून. अरेच्या…. नदी काय फक्त अशा गोष्टींसाठीच आहे का? जीवनदायिनी म्हणतो आपण तिला. तिचंच जीवन ही लोकं उध्वस्त करायला लागली आहेत. त्यामुळं एक परिसंस्था नष्ट होतेय हे यांच्या लक्षातच येत नाही. लक्षात येत असेल पण पैशाच्या हव्यासापायी दुर्लक्ष करतात हे खरं. आता तर काय म्हणे नदी काठावर चौपाटीचं फॅड वाढलंय. किती अंत पाहणार आहेत नद्यांचा काय जाणे!' आजी अगदी पोटतिडिकेनं बोलत होती आणि इरा लक्ष देऊन ऐकत होती. हे जे काय चाललंय ते फक्त आणि फक्त माणसांमुळे हे तिच्या हळूहळू लक्षात यायला लागलं होतं. ते परिसंस्था म्हणजे काय वगैरे इराला कळलं नाही. पण आजी सांगतेय म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असणार एवढं तरी तिला नक्की कळलं.
आजीच्या गावातल्यासारखी नदी इराने पाहिली नव्हती. त्यामुळं तिला अजून माहिती करून घ्यायची खूप उत्सुकता होती. आजी तिला नदीबद्दल खूप गोष्टी सांगतही होती. पण एकवेळ अशी आली की प्रवासाने शिणून आलेली आजी झोपी गेली, पण इराच्या डोक्यातले विचार मात्र जोरदार फिरू लागले एखाद्या खळाळत वाहणाऱ्या नदीच्या पाण्यासारखे.
(क्रमशः)
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा