भाग चार

भाग चार

'अगं अगं इरा…. ती काकडी आधी धुवून तरी घे की गं. प्रचंड आवडते म्हणून काय न धुता खायची का?' आईचा एकदम तार सप्तकात गेलेला आवाज ऐकून इरा बिचारी थबकलीच. काल आईबरोबर मंडईत गेल्यावर इराला कोवळी, लुसलुशीत काकडी दिसली. काकडी दिसल्यावर ती न घेताच इरा थोडीच येणार…. कच्चं खावं या विचाराची तिची आई असल्यामुळं ती ही नेहमी अशा गोष्टी आवर्जून घेत असतेच. काकडी तर इराची अगदी जीव की प्राण. आई नसती तर इरा तेव्हाच रस्त्याने चालता चालता काकडी खात आली असती. पण सगळ्या गोष्टींना संयम पाहिजे ही आईची शिकवण. घरी आल्यावर आजोबांशी प्लास्टिक संदर्भात गप्पा मारण्यात इरा व्यग्र झाली आणि काकडीचा विषय विसरून गेली. तरी बाहेरून आल्या आल्या हात पाय धुवायची आठवण केली म्हणून बरं, नाहीतर आजोबांना सगळं सांगायच्या उत्साहात ते ही ती विसरून गेली असती. 

तर आज सकाळी उठल्यावर इराने फ्रिज उघडला तेव्हा तिला समोर काकडी दिसली आणि इतका वेळ हिला न खाता आपण कसं ठेऊन दिलं या विचाराच्या भरात ती तशीच न धुता तोंडाच्या दिशेने जाऊ लागली होती. पण… पण आईने वेळीच पाहिलं आणि ती इराला ओरडली. 'अगं आई, एवढं काय बिघडलं गं न धुता खाल्लं तर? किती जोरात ओरडलीस. तो शेजारचा वेदांत पण घाबरला असेल बघ.' 'गप्प बस हा... उगाच आचरटपणा करू नकोस.' आई हळूच हसत इराला दटावत म्हणाली. आज इराची आजी येणार म्हणून आई गडबडीत होती. त्यामुळं इराच्या प्रश्नाचं उत्तर मग देते म्हणाली. पण इरा… तिला राहवतंय होय इतका वेळ. ती आपली आईपाशी भुणभुण करायला लागली. आता यापुढे दोघींचे 'प्रेमळ' संवाद सुरू होऊ नयेत याची काळजी इराच्या बाबांनी घेतली. आज रविवार असल्यामुळे ते निवांत घरीच होते. त्यांनी इराला बाहेर हाक मारली. 

'काय झालं इरा? काय हवंय तुला? मला सांग ये. आज आईची आई येणार आहे ना… मग आज काय आई आपल्याला भाव देणार नाही. तू ये आपली माझ्याकडे. आपण गरीब बिचारे दोघं बसून राहूया कोपऱ्यात.' इराच्या आईची जरा खेचत बाबा म्हणाले. त्यावर मान झटकावून आईने दुर्लक्ष केलं आणि इरा पळतच बाबांपाशी गेली. 'हे बघ इरा, ती हातातली काकडी आधी धुवून आण आणि मग गप्पा मारता मारता खात बस.' 'बाबा….. त्यावरूनच तर माझे आणि आईचे तुमच्या भाषेतले 'प्रेमळ' संवाद सुरू झाले होते ना आणि तुम्हीही तेच सांगताय. न धुता खाल्लं तर काय होईल हा माझा प्रश्न आहे बाबा.' 'तेच तर तुला मी सांगणार आहे. पण काकडी धुवून घेऊन आलीस की.' बरं बाबा म्हणत इरा एकदाची ती काकडी धुवायला घेऊन गेली. 'कसं असतं ना इरा… आता पूर्वीसारखा काळ राहिला नाहीये. पूर्वी कुठल्याच प्रकारचं प्रदूषण नव्हतं त्यामुळं सगळं स्वच्छ, सुंदर होतं. आता त्या भाजीवाल्या काकांनी या काकडीवर कुठलं पाणी मारलं आहे ते आपल्याला माहीत आहे का? भाज्या ताज्या, टवटवीत राहाव्यात म्हणून पाणी मारतातच ना ते. जर ते पाणी दूषित असेल आणि तसं पाणी मारलेली काकडी तू न धुता खाल्लीस तर त्यावरचे जिवाणू तुझ्या पोटात जाऊन पोट बिघडेल तुझं. आणखी एक… ज्या शेतकऱ्याने ही काकडी त्याच्या शेतात लावली होती, त्याने यावर कोणत्या कीटकनाशकांची फवारणी केली आहे हे ही आपल्याला माहीत नाही. पीक चांगलं यावं म्हणून हल्ली भरमसाठ औषधं मारली जातात. माहितेय का तुला? आता औषधं मारून बरेच दिवस जरी झाले असले तरी त्याचे अवशेष तर यावर राहतातच ना. तेच अवशेष आपल्या शरीरासाठी विषारी असतात. म्हणून मंडईतून आणलेली प्रत्येक गोष्ट मग ती भाजी असेल वा फळं… नीट धुवून खायची. कळलं?' 'हो कळतंय बाबा. पण मला एक सांगा, आत्ता थोड्या वेळापूर्वी तर तुम्ही केळं न धुता खाल्लंत.' 'अगं त्याचं साल आपण काढून टाकून देतो ना! तसं न धुता एकवेळ केळं खाल्लं तर चालेल, कारण त्याच्या गराला आपला हात लागत नाही. पण संत्री किंवा मोसंबी मात्र धुवायला हवीत बरं का. कारण त्याचंही साल जरी आपण काढत असलो तरी तेच हात आपण फोडींना लावणार. मग सालीवरचे जिवाणू हातांना लागून फोडींद्वारे आपल्या पोटात जाणार. आणि एक महत्त्वाचं… ह्या गोष्टी धुवायच्या म्हणजे पाण्याखाली पटकन धरलं म्हणजे धुतलं गेलं असं नाही बरं का. तर त्या साधारण पंधरा-वीस मिनिटं पाण्यात बुडवून ठेवायला हव्यात. तरच त्याच्यावरचे औषधांचे किंवा दूषित पाण्याचे अवशेष निघून जातील.'

आई आपल्याला जोरात का ओरडली ते आता इराला समजून चुकलं. परवा तिच्या शाळेतल्या मैत्रिणीचं… राधाचं पोट बिघडलं होतं म्हणून ती शाळेत आली नव्हती. कदाचित राधानेही असंच काही न धुता खाल्लं असेल हा विचारही इराच्या मनात डोकावून गेला. सध्याच्या या प्रदूषित जगात जगायचं म्हणजे किती बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो हे इराला कळून आलं. हे प्रदूषित जग वगैरे तिने आई बाबांच्या बोलण्यात ऐकलं होतं. म्हणजे नक्की काय हे तिला माहीत नव्हतं, पण जे काही आहे ते चांगले नव्हे एवढं तिला कळलं. इराच्या डोक्यात पिकांना दिल्या जाणाऱ्या औषधांविषयी चक्र फिरतच होतं. पीक चांगलं यावं म्हणून शेतकरी औषधं वापरतो, जी माणसासाठी अपायकारक असू शकतात. म्हणजेच एक जीव वाचवताना दुसऱ्या जीवाला त्रास होऊ शकतो एवढं तिच्या लक्षात आलं. यावर उपाय काय असेल जो दोन्हींसाठी फायद्याचा ठरू शकेल असा प्रश्न तिला पडला आणि याचं उत्तर कोणाकडून मिळू शकेल या विचारात असतानाच बाहेर गाडीचा आवाज ऐकू आला. 'आजी आली, आजी आली'…. म्हणत पळतच इरा घराबाहेर गेली तो डोक्यातला प्रश्न मागे सोफ्यावर ठेऊनच. 

(क्रमशः)

जस्मिन जोगळेकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक