मार्गशीर्ष पौष... हेमंत ऋतू
शरद ऋतूमधला हवाहवासा वाटणारा गारवा हेमंतात जास्त जोर धरु लागतो आणि थंडीची खरी सुरुवात होते. हेमंत ऋतू… बाकीच्या ऋतूंच्या मानाने याची चर्चा तशी कमीच होते. तसं म्हटलं तर कोणताही बडेजाव न मिरवणारा हा ऋतू... एकदम शांत, साधा, सोज्वळ असा ऋतू… आरोग्यदायी असा ऋतू… खिडकीतून बाहेर दिसणारी धुक्याची दुलई बघत घरात उबदार दुलईत पडून रहावं वाटेल असा ऋतू.
हेमंतातले दिवस छोटे आणि रात्री मोठ्या. संध्याकाळी लवकरच अंधार उंबरा ओलांडून बाहेर पडतो आणि मग जसजशी संध्याकाळ होत जाईल तसा गारवा वाढत जातो. अशा हलक्या गारव्यात फिरायला बाहेर पडण्यात एक मजा असायची. पण या काळात रात्री एकदम थंडगार… रजईमधे अंगाची घडी करुन झोपणं हे सुख वाटायचं लहानपणी. आता थंडीही पूर्वीच्या मानाने कमी झाली आणि झोपही. झोप कमी झाल्याचा फायदा म्हणजे हेमंतातलं पहाटेचं सौंदर्य बघायला मिळतं. सगळीकडे धुकं, धुकं आणि धुकं… अंगात स्वेटर आणि हाताची घडी घालून गल्लीत शांतपणे मारलेल्या फेऱ्या… अहाहा! सगळा परिसर थंडीच्या अमलाखाली स्तब्ध असताना धुक्यातून असं फिरणं आवडतं मला. फिरताना चेहऱ्याला स्पर्श करुन जाणारे ते इटुकले ओलसर कण गोळा करता आले तर किती छान! असं वाटत राहतं. अशा हवेत पक्ष्यांचीही फार लगबग दिसत नाही. अधूनमधून जरा हालचाल जाणवते एवढंच. 'करु दे आराम सगळ्यांनाच' बहुतेक असा विचार करुन सूर्य सुद्धा जरा उशिराच उगवतो. सूर्यकिरणांना तापून चार्ज व्हायला वेळच लागतो या हवेत. पण धुक्याच्या राज्यात सूर्य आल्यावर मात्र हळूहळू धुकं काढता पाय घ्यायला लागतं. तेव्हाचं दृश्य किती छान, प्रसन्न असतं! एखाद्या चित्रातल्यासारखं. थंडीत उठून घराबाहेर पडल्याचं सार्थक होतं अगदी. अशा निवांत, सुंदर सकाळी फेऱ्या मारुन झाल्यावर अंगणात आलं की स्वागताला सज्ज असतात ते छोटे नाजूक दवबिंदू. कुंडीतल्या झाडाच्या पानांवर हे आपले सलामी द्यायला तयारीत असल्यासारखे रांगेत उभे असतात. एखादा कोणीतरी पानाच्या टोकावरुन घरंगळत मातीत मिसळायला बघत असतो. त्यात कण्हेरीचं पान असेल तर त्या दवबिंदूला सहज मार्ग सापडतो खाली घसरायचा. गवताच्या टोकावरचे दवबिंदू तर अगदीच नाजूक असतात. सूर्यकिरणांचे पण ते लाडके असावेत… एवढ्याशा नाजूक थेंबांना ते रंगांनी किती सुंदर सजवून टाकतात!… अगदी थोडा वेळ का होईना. या दवबिंदूंचं एक बरं असतं… हलकेच उतरायला पानच हवं, फूलच हवं अशी काही नाटकं नसतात यांची. अशातच जर झाडाच्या फांद्यांना आधार बनवून एखाद्या कोळ्यानं जाळं विणलं असेल तर त्यावर देखील हे मिरवतात. एरवी कधी एकदा ते जाळं काढून टाकतो अशी मनाला घाई असते, ते मन यावेळी दवांनी सजवलेलं जाळं बघत बसतं… कितीतरी वेळ. किती सुरेख दिसतं ते! नाजूक पण सहज तुटणार नाहीत असे कोळ्याचे धागे आणि त्यावर हे दवबिंदू… निसर्गातले अनमोल हिरे… इतकं नाजूक काम करणं जमणार नाही आपल्याला आणि अगदी केलं तरी यातलं सौंदर्य त्यात उतरणार नाही नक्कीच. फांद्यांना चिकटलेली जाळ्याची दोन टोकं काढावीत आणि ते जसंच्या तसं नाजूक हातानं गळ्यात घालावं वाटून जातं. असा हा हेमंत ऋतू… दिखावा नाही पण मनापासून अनुभवावा असा ऋतू…
या ऋतूमधल्या रात्री मोठ्या आणि थंडगार. मगाशी म्हटलं तसं उबदार पांघरुणात स्वतःला लपेटून घ्यावं वाटणाऱ्या… पण ही इच्छा मागे सारुन जर अंगणात गेलं तर निरभ्र आकाशातली चमचमती सजावट बघत राहण्यासारखी असते. लहान असताना, कोकणासारख्या प्रदूषण मुक्त ठिकाणी राहताना ही इच्छा मागे सारणं जमलं नव्हतं आणि तेव्हा इतक्या रात्री वर आकाशात असं काही सुंदर घडत असेल असं माहितही नव्हतं. पण नंतर पुण्यात आल्यावर आकाशाचं तेच सौंदर्य पाहायला शहरातल्या दिव्यांपासून पंचवीस-तीस किलोमीटर जेव्हा दूर जायला लागलो तेव्हापासून या सुंदरतेचं वेडच लागलं. रात्रभर थंडीत कुडकडत मान वर करुन नक्षत्रांची, ग्रहांची ओळख करुन घ्यायची, त्यांना दुर्बिणीतून जवळ आणून निरखायचं… वेगळीच मजा होती यात. रात्रभर आकाशात बागडणारं मृग नक्षत्र, त्याच्या जवळपासचे व्याध, कृत्तिका, रोहिणी, पुष्य… हे पुष्य, ओरायन नेब्युला आणि अशीच तेव्हा आकाशात दिसणारी आसपासची क्लस्टर्स, ज्यांना मेसियर ऑब्जेक्ट म्हणतात ती दुर्बिणीतून बघितली की आ वासायचा. एका चांगल्या अर्थानं 'दिसतं तसं नसतं' हे पटायचं. शेजारुन पसरलेला आपला आकाशगंगेचा पट्टा… तो पाहिला की तर काय काय कल्पना मनात यायच्या… आकाशाच्या काळया कापडाचा सुंदरसा फ्रॉक शिवावा, त्यावर चंदेरी चमचमत्या चांदण्या चिकटवाव्या आणि आकाशगंगेचा हा पट्टा कंबरेला बांधून सगळीकडे मिरवावं. या कल्पनेनं सुद्धा खुश होऊन जायचे मी. या रात्रींबद्दल, तेव्हा केलेल्या निरीक्षणांबद्दल लिहावं तेवढं कमी होईल. ताम्हिणी घाटातली थंडीसुद्धा तेव्हा हवीहवीशी वाटायची. तेव्हाच सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव बघायला जाणं तर पर्वणीच असायची. तो पाहून आनंद घेतानाच त्याचं निरीक्षण करुन नोंदी ठेवणं हे काम असायचं. सलग तीन चार दिवस रात्री आमचा मुक्काम तिथेच असायचा. पूर्ण रात्र जागून आकाशातलं नाट्य बघायचं आणि पुढचा दिवस पूर्ण जागून नुसती धम्माल करायची. खूप सुंदर दिवस होते ते. म्हणून म्हणते… अनुभवावा असा आहे हा हेमंत ऋतू.
याच काळात आणखी एक आकर्षण असायचं ते स्थलांतरित पक्ष्यांचं. त्यात फ्लेमिंगोना भेटायला जाणं जास्त लाडकं. या पक्ष्यांचं किंवा इवल्या इवल्या फुलपाखरांचं स्थलांतर हा माझ्यासाठी कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य मार्गानं ठराविक काळासाठी कशी काय जात असतील ही मंडळी!... या प्रवासात काय काय घडत असेल!... विचाराच्या पलीकडलं वाटतं हे सगळं. या ऋतूतलं झाडांचं वागणं तरी बघा ना… श्रावणात चढवलेला हिरवा साज हळूहळू उतरवून ठेवायची यांना गडबड होते. ही यांची शिशिर ऋतूच्या स्वागताची तयारी म्हणे… हे बरंय ना… शिशिरात लंकेची पार्वती होऊन वावरायचं आणि नंतर वसंताकडून परत सगळं नव्यानं मिळवायचं… ते ही दरवर्षी. म्हटलं ना… दिखावा नकोच असतो या ऋतूला. आपण साधं रहायचं आणि इतरांना संपन्न, समृद्ध, श्रीमंत करायचं… कसा आहे ना हा ऋतू!
मार्गशीर्ष पौष महिने याचे जोडीदार. चातुर्मासातल्या एकामागोमाग येणाऱ्या सणांनंतर जराशी उसंत घेणारा हा मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्यात सुरुवातीलाच येते देव दिवाळी. कोकणात हा सण जोरात साजरा केला जातो. घरातल्या गो धनाचं यावेळी औक्षण केलं जातं. घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे कोकणातला बैल पोळा… शेतातल्या कामातून शेतकऱ्यांना आणि बैलांना तशी उसंत मिळालेली असते यावेळी. रब्बी पिकं तयार होऊन पुढच्या प्रक्रियेच्या प्रतीक्षेत डोलत असतात शेतात. तसं निवांतपण असतं या काळात. शेतातून पिकं बाहेर पडली की सरवा गोळा करताना किंवा मोकळेपणी श्वास घेणाऱ्या शेतातून सहज चक्कर मारताना आणखी एक मोहक गोष्ट सापडते. मोरपिसं… मोरपिसांबद्दल, त्यावरच्या रंगांबद्दल न बोललेलचं बरं. काही काही गोष्टी अशा असतात ना… जिथं विचार, शब्द थबकून जातात. अशावेळी शांतपणे त्यांना निरखत रहायचं.
याच काळात आमच्या गावात पुढं येणाऱ्या दत्तजयंतीच्या तयारीत सगळे गुंतलेले असतात. पहाटेच्या काकड आरतीने दिवसाची सुरुवात भक्तिमय होते. देवांच्या मुखी लोणी लावून, त्यांची यथासांग पूजा करुन, फुलांची देखणी आरास करुन त्यांचं रुप खुलवलं जातं. ते बघताना इतकं प्रसन्न वाटतं की बस! अर्थात लहानपणी शाळेला सुट्टी नसायची त्यामुळं हा उत्सव प्रत्यक्ष बघायची वेळ खूपच कमी वेळा आली. पण एकंदरीत तिथलं उत्सवाचं वातावरण भारुन टाकणारं असतं. हे होतंय तोवर पुढं येणारी संक्रांत, काळी चंद्रकला, तिळगुळ, गुळपोळी, हळदीकुंकू याची तयारी सुरु होते. पण एकूणच या काळात सण ही जरा विश्रांती घेतात.
प्रत्येक ऋतूचं वेगळं सौंदर्य, वेगळा अनुभव. त्यातला हा हेमंत ऋतू… ताजी, स्वच्छ हवा श्वासाश्वासात भरुन घेऊन अंतरंगाला शांती देणारा ऋतू… धुक्यानं, दवानं सृष्टीला सजवणारा ऋतू… कुठल्याही मोहात न अडकणारा पण मोहात पाडणारा ऋतू… बाह्यांग नाही पण ज्याचं अंतरंग अनुभवावं असा ऋतू…
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा