पुस्तक परिचय... ज्ञानसूर्याची सावली
“मुक्ते, अगं हे भलतंच काय करते आहेस. दही-साखर त्याच्या हातावर घालतात, ज्यानं लवकर यावं असं वाटतं. मुक्ते, मी समाधी घ्यायला चाललोय, सरपण आणायला नाही. हे दही-साखर माझ्या हातावर घालायला कशाला आणलंस? वेडी कुठली.” मुक्ता हातात दह्याची वाटी घेऊन तशीच उभी होती. डोळ्यातून ओघळणारं पाणी तसंच वाहू देत मुक्ता म्हणाली, “सोपानदादा, दही-साखर मी आणलंय तुझ्यासाठी हे खरं! पण ते तुझ्या हातावर घालण्यासाठी नाही. दादा, तू संजीवन समाधी घेण्यासाठी निघाला आहेस, हे मला माहित आहे. हे दही-साखर तू माझ्या हातावर घालायचं आहेस. म्हणजे मी… मी लवकर तुमच्याकडे, म्हणजे ज्ञानादादाकडे आणि तुझ्याकडे लवकर येईन. त्यासाठी हे दही-साखर तू माझ्या हातावर घालायचं आहेस. घालतोस ना?”
डोळ्यात अक्षरशः पाणी उभं करणारा हा प्रसंग. पण हे पाणी काही फक्त दुःखाचं नाही. तर त्यावेळी मनात उमटणाऱ्या वेगवेगळ्या भावनांचं मिश्रण आहे. खरंतर संपूर्ण पुस्तक वाचतानाच दुःख, यातना, कौतुक, आश्चर्य, भक्ती, आदर अशा अनेक भावना वेळोवेळी मनात दाटून येतात. असं हे अप्रतिम पुस्तक कोणतं सांगू? शब्द प्रभुत्वाची साक्ष असलेल्या ज्ञानाच्या सोपानाची जीवनगाथा सांगणारं “ज्ञानसूर्याची सावली”, लेखिका अर्थात तुकयाची आवली, जोहार मायबाप जोहार, ओंकाराची रेख जना अशा एकसे एक अप्रतिम पुस्तकांचा खजिना वाचकांच्या हाती सोपवणाऱ्या मंजुश्री गोखले. गोखले मॅडमनी लिहिलेलं प्रत्येक पुस्तक आपल्या मनात खोल रुतून बसतं. त्यांची सहज सोपी भाषा, प्रत्येक प्रसंगाचा बारकाईने विचार करुन त्याला न्याय देत चितारलेला तो प्रसंग… वाचताना नक्कीच ‘हे कसं काय सुचलं असेल लिहायला’ असंच वाटायला लागतं. आता याच पुस्तकातला एक प्रसंग सांगायचा झाला तर… “हवेतला गारठा वाढायला लागला. रुक्मिणीबाईंनी आधीच लपेटून घेतलेला पदर आणखी घट्ट लपेटून घेतला. मग मात्र त्यांचं त्यांनाच हसू आलं. किती ही देहाची आसक्ती! आता काही क्षणातच हा देह नष्ट होणार आहे. तरीसुद्धा थंडी वाजली म्हणून आपण पदर लपेटून घेतला.” पहाटे नदीतीराकडे जाताना वातावरण कसं असेल, त्याचा देहावर काय परिणाम होईल आणि देहाकडून काय प्रतिक्षिप्त क्रिया घडेल याचा किती बारकाईने विचार केला आहे. असं संपूर्ण पुस्तक वाचताना जाणवत राहतं. मग एकही ओळ नजरेतून सुटू नये म्हणून दृष्टीची धडपड सुरु राहते.
या पुस्तकाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या प्रसंगाने होते. माऊलींच्या समाधीमुळे सोपानदेवांची झालेली भावावस्था आणि एकूणच त्या प्रसंगाचा भवतालावर झालेला परिणाम याच्या वर्णनानं पहिल्या प्रकरणाची सुरुवात झाली आहे. वर्णन वाचून आपणही भावूक होऊन जातो. हे आणि पुढं पूर्ण पुस्तकातलं वर्णन, सगळे प्रसंग साध्या सोप्या भाषेत इतके छान नटले आहेत की हळूहळू ते जिवंत होत आपल्या आसपास रेंगाळायला लागतात. आपल्याला त्या काळात नेऊन पोहोचवतात. आपल्या नकळतच आपण त्यात इतके गुंगून जातो की भोवताल विसरुन जातो. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या भावना आपल्या मनावर राज्य करायला लागतात. मग सुरुवातीच्या काही प्रकरणात विठ्ठलपंत रुक्मिणीबाई आणि त्यांचे देहान्त प्रायश्चित्त किंवा या चार छोट्या भावंडांचे कष्टप्रद आयुष्य वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. त्यांना असं आयुष्य भोगायला लावणाऱ्यांबद्दल मनात रागही उफाळून येतो. पुढं या चारही भावंडाचं कर्तृत्त्व वाचून भारावून जायला होतं. वेगवेगळ्या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत आपण या पुस्तकाच्या शेवटाकडे येऊन पोहोचतो. प्रसंगानुरुप वर्णन करताना यात दशक्रिया विधी आणि संजीवन समाधी याबद्दलही सविस्तर माहिती वाचायला मिळते.
गीतेवर भाष्य करणारी ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली. पण सामान्यजनांना समजण्यास ती तशी अवघडच. हे जाणून सोपानदेवांनी निवृत्तीनाथांच्या परवानगीने अधिक सुलभ, सुबोध भाषेत “सोपानदेवी” लिहिली आणि खऱ्या अर्थानं सर्वांसाठी ज्ञानाची कवाडं उघडली. “सोपानदेवी” लिहितानाच्या वर्णनाची काही प्रकरणं या पुस्तकात आहेत. गीतेतले सातशे श्लोक आणि सोपानदेवांनी नागर मराठीत त्याचे जसेच्या तसे केलेले भाषांतर वाचून त्यांच्या असामान्य प्रतिभेची कल्पना येते. पुस्तकातली ही प्रकरणं वाचताना सोपानदेवांचं कर्तृत्त्व, त्यांची बुद्धिमत्ता पाहून थक्क व्हायला होतं. ते ही सगळं इतक्या लहान वयात… सोपानदेवी लिहित असताना सोपानदेवांना साक्षात देवी शारदेने दिलेला दृष्टांत आणि त्याचं वर्णन पुस्तकात वाचताना काय वाटतं ते शब्दात सांगणं कठीण आहे. खरंतर संपूर्ण पुस्तकाबद्दल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही; इतकं अप्रतिम आहे पुस्तक.
मनोगतात लेखिका म्हणतात तसं ज्ञानदेवांपासून सोपानदेवांना वेगळं काढणं शक्य नाही. ज्ञानदेव ज्ञानसूर्य तर सोपानदेव त्याची सावली… म्हणून पुस्तकाचं नाव “ज्ञानसूर्याची सावली”. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्यापुढं सोपानदेवांची अलौकिकता थोडी अलक्षित राहिली, त्यांच्या कर्तृत्त्वाबद्दल फार काही उल्लेखलं गेलं नाही असं वाटून लेखिकेने हा विषय हाती घेतला. पण हे पुस्तक सोपानदेवांवर लिहिलं असलं तरी ते या चारही भावंडांचे आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत ते एकत्र राहिले; त्यामुळं त्यांचं अस्तित्व वेगळं दाखवणं तसं कठीण. संपूर्ण पुस्तकातले प्रसंग, त्याचे वर्णन लेखिकेच्या शब्दसामर्थ्यामुळे तेजाळून गेले आहेत. “या जगाच्या अंतापर्यंत तो ज्ञानसूर्य आपल्या तेजानं तळपणार होता आणि त्याचबरोबर त्या ज्ञानसूर्याची सावलीसुद्धा! होय! ज्ञानसूर्याची सावलीसुद्धा!”... पुस्तकातलं हे शेवटचं वाक्य वाचून आपण पुस्तक जरी बाजूला ठेऊन दिलं तरी मन मात्र त्यातून बाहेर यायला तयार होत नाही. या लेखनाचा इतका खोल परिणाम आपल्या मनावर होतो हे नक्की.
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा