अलक

          'अगं या बागेतल्या झाडांना, फळाफुलांना आपल्याकडून काही अपेक्षा नसते गं. फक्त आपण त्यांना थोडा वेळ दिला, चांगलं खाऊ-पिऊ घातलं की खुश होतात आणि जास्त छान बहरतात.' 

          सोफ्यावर बसलेल्या तिच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांनी तिचं फोनवरचं हे बोलणं ऐकलं आणि एकमेकांना नजरेनेच विचारलं... हा समजूतदारपणा ही आपल्या बाबतीत का दाखवत नाही? 

*************

          राजकारणातली ती व्यक्ती स्वतःची प्रगती भराभर करत होती. पण इतर कोणी त्या व्यक्तीचा वर चढण्यासाठी आधार घ्यायचा प्रयत्न केला तर त्याची मूळं छाटून टाकत होती. 

          तेव्हाच त्या व्यक्तीच्या बागेतली पोफळी मात्र मिरवेलीला आपल्या अंगाखांद्यावर खेळवत होती. आपल्यातलं खतपाणी तिला देऊन वाढवत होती. मग खरं समजूतदार कोण? 

************

          जेवढी भूक असेल तेवढीच शिकार करायची. भुकेपेक्षा जास्त मोठी शिकार सापडली तर संपेपर्यंत तीच खायची. ती संपल्यावरच पुढची शिकार करायची. अधाशीपणा जसा वाढत जाईल तसं सुख, समाधान कमी होत जातं. इतका समजूतदारपणा जंगलातल्या प्राण्यांना कोणी शिकवला असेल? 

************ 

          सुरुवातीला ती त्याच्या बोलण्यावर तिचं मत व्यक्त करण्याचा, काही सांगण्याचा खूप प्रयत्न करायची. पण तो मात्र तिचं काही न ऐकता स्वतःचंच पालुपद सुरु ठेवायचा. नंतर नंतर त्याचा स्वभाव लक्षात आल्यावर तिने काही बोलणे सोडून दिले. ऐकण्याची कला प्रत्येकाला जमतेच असं नाही असा विचार करुन त्याच्या बोलण्यावर फक्त हं हं अशी प्रतिक्रिया ती द्यायला लागली. कारण आपलं बोलणं समोरच्याला महत्त्वाचं वाटत नसेल तर उगाच आपली शक्ती वाया घालवण्यात काय अर्थ आहे ना. 

************ 

          'सोशल मीडियावर हल्ली जो तो वाट्टेल तसा बोलायला लागला आहे. ज्याच्याशी आपला काडीचाही संबंध नाही, ज्याची काही माहिती नाही त्यावरही आपली मताची पिंक टाकायला लागला आहे...' त्या दोघांत सोशल मीडियाबद्दल अशा गप्पा सुरु होत्या. ज्या गोष्टीत बदल घडवून आणणं आपल्या हातात नाही त्याबद्दल फुकाची चर्चा करुन विषय वाढवण्यात काय अर्थ आहे ना… असा समजूतदारपणा सगळ्यांनी दाखवला तर? 

************ 

          त्यादिवशी त्या दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला. तो तिला अद्वातद्वा बोलत होता. तिच्याही रागाचा पारा चढला होता. ती ही पुढं काही बोलायला जाणार तेवढ्यात तिला तिच्या आईची वाक्यं आठवली. वादाच्या प्रसंगी एकाने पुढं पाऊल टाकलं तर दुसऱ्यानं एक पाऊल मागे येण्यात काहीही कमीपणा वाटून घेऊ नये. नातं टिकवायचं तर ताणली जाणारी गोष्ट एका बाजूने सोडून देणं यातच समजूतदारपणा आहे ना? आणि ती एक पाऊल मागे आली.

**************


जस्मिन जोगळेकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक