कथा... मायेचा ओलावा

मायेचा ओलावा...   

       मिनूच्या बाबांची कोकणात बदली झाली आणि एक दिवस मिनू तिच्या आई बाबांसह सामानाच्या ट्रकबरोबर बदलीच्या गावी... वेंगुर्ल्याला येऊन पोहोचली.  कोकण कधी न पाहिलेली मिनू समुद्राच्या गावात राहायला मिळणार म्हणून कधीपासून उड्या मारत होती. त्यात राहणार असलेलं घर पाहून तर ती हुरळूनच गेली. मोठ्ठं आवार, आजूबाजूला थोडी नारळ पोफळीची बाग, अंगणात बरीचशी फुलझाडं, एका बाजूला मालकांचा चौसोपी वाडा आणि त्याला काटकोनात असलेली ही दोन छोटी घरं... या दोन घरांच्या समोर थोडं अंतर राखून असलेली मोठी छान बांधीव विहीर, विहिरीला कायम आपल्या सावलीत ठेवणारं एक ऐसपैस पसरलेलं उंबराचं झाड आणि त्याभोवती बांधलेला पार... या सगळ्यांचं दर्शन होताच मिनू एकदम खुश झाली. मिनूला हे घर आणि परिसर आवडणारच अशी तिच्या बाबांना खात्रीच होती. कारण मिनू अतिशय संवेदनशील मुलगी होती. अगदी लहानपणापासून ती या गोष्टींमध्ये रमत होती. झाडं, पक्षी, फुलपाखरं सगळ्यांबरोबर ती छान गप्पा मारायची. त्यांना कोणी त्रास दिला तर हिला दुखायचं. एकदा शाळेत कोणीतरी पतंगाच्या शेपटीला दोरी बांधून खेळ केला तर मिनूची किती दुखावली गेली होती. काही न जेवताच ती झोपून गेली होती आणि झोपेतसुद्धा ती अस्वस्थ होती. अशा या मिनूला वेंगुर्ल्यासारखा निसर्गरम्य परिसर न आवडला तरच नवल...
     तर अशी ही मिनू आणि तिचे आईबाबा वेंगुर्ल्याला येऊन पोहोचले. ट्रकमधून सामान उतरवून होतंय न होतंय तोवर शेजारच्या घराचं दार उघडलं आणि आतून एक सात्त्विक सौंदर्य बाहेर आलं. वयाचा अंदाज न येणाऱ्या पण डोक्यावरच्या पांढऱ्या केसांचा मानेवर... त्या मानेला झेपेल की नाही असं वाटणारा मोठाच्या मोठा आंबाडा घातलेल्या, कपाळाचा निम्मा भाग भरेल असं ठसठशीत कुंकू लावलेल्या, अंगाला चापूनचोपून नऊवारी नेसलेल्या बाई एका हातात पाण्याचा तांब्या आणि एका हातात गुळाची वाटी घेऊन बाहेर आल्या. मिनू आणि मिनूची आई त्यांच्याकडे बघतच राहिल्या. त्या बाई मिनूच्या आईजवळ आल्यावर तिची आई एकदम भानावर आली. त्या बाई खरंच एवढ्या सात्त्विक होत्या की आपोआपच मिनूची आई त्यांच्यापुढं नमस्काराला वाकली. मंद हसत त्यांनी पाणी पुढं केलं. जुजबी गप्पा झाल्या आणि त्या परत घरी जायला निघाल्या. निघताना त्यांची नजर मिनूवर पडली. मिनूला पाहताच त्यांच्या नजरेत पटकन एक दुःखाची छटा येऊन मग त्यात मायेचा ओलावा आलेला तिच्या आईला जाणवला.  काही कारण असेल तर नंतर कळेलच असा विचार करुन त्या बाईंचा निरोप घेतला आणि त्या सामान लावायला लागल्या. मिनूला पण त्या पटकन आवडून गेल्या. त्यांचं नाव माहीत नसलं तरी तिने त्यांना मनोमन आज्जी करुन टाकलं. 
    मिनूची पाचवीची शाळा अगदी तिच्या घराला लागून होती. शाळेचं आणि घराचं कंपाउंड एकच होतं म्हटलं तरी चालेल. वर्गाच्या खिडकीतून कोण घराकडे जातंय, कोण येतंय हे सगळं तिला दिसायचं. मधल्या सुट्टीत याच कंपाउंडवरुन उडी मारुन ती जेवायला घरी यायची. एवढी जवळ शाळा त्यामुळं मिनू आणि तिची आईसुद्धा खुश होती.  इथं येऊन दहा-बारा दिवस होतात न होतात तोवर तो परिसर, आजूबाजूची लोकं मिनूला ओळखू लागली. मिनू होतीच तशी बोलकी आणि लाघवी.
     या नवीन ठिकाणी, नवीन घरी मिनू लगेच रुळली. तिची आईही आता घर लागल्यावर मंडई, डेअरी, वाणी या अशा जीवनावश्यक गोष्टींच्या शोधाला लागली. शेजारच्या आठल्ये काकूंची... म्हणजेच मिनूच्या त्या आज्जीची याबाबतीत मदत मिळेल म्हणून एक दिवस मिनूच्या आईने त्यांचा कायम बंद दरवाजा ठोठावला. काकूंनी दार उघडलं; पण मिनूच्या आईला दारात बघून त्यांच्या मनात थोडी चलबिचल झाली. मिनूच्या आईला त्यांनी दारातच उभं केलं. तिला काय माहिती हवी ती त्यांनी दारातूनच सांगितली. पण 'आत या' असं काही त्या शेवटपर्यंत म्हणाल्या नाहीत. मिनूच्या आईला याचं आश्चर्य वाटलं. पण असतील गडबडीत म्हणून नसेल बोलावलं असा विचार करत त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा शोधत ती निघाली. 
    पण एकंदरीत असे एक दोनदा अनुभव आल्यावर मिनूच्या आईला काही समजेना. घराबाहेर भेटल्या तर छान गप्पा मारणाऱ्या काकू घरात का येऊ देत नाही? हा प्रश्न तिला पडला. आता आठल्ये काकांची आणि तिची ओळख झाली. काका एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांना रिटायर होऊनही आता दहा वर्षं झाली होती. वेंगुर्ल्याजवळचंच आरवली त्यांचं मूळ गाव. त्या गावातल्या शाळेतच ते नोकरी करायचे. पण नंतर काही कारणानं त्यांना ते गाव सोडावं लागलं. हे सांगताना काकांना कुठंतरी दुःख बोचतंय हे मिनूच्या आईला जाणवलं. काकांच्या बोलण्यातून कधी काकूंच्या अशा वागण्यामागचं कारण तर कळलं नाहीच, पण दोघंही काहीतरी वेदना जवळ बाळगून आला दिवस ढकलताहेत हे मात्र तिला नक्की कळलं. 
    असेच दिवस जात होते. आठल्ये आज्जी आजोबांची मिनू आता एकदम लाडकी झाली होती. आजोबा कुठं बाहेर गेले की मिनूसाठी हमखास काहीतरी खेळ, पुस्तक, अगदी काही नाही तर चॉकलेट तरी आणत. घरात आज्जींनी काही वेगळा पदार्थ केला तर पहिला नैवेद्य मिनूलाच दाखवला जाई. पण हे सगळं मिनू आणि ती दोघं त्यांच्या घराबाहेर असताना किंवा मिनूच्या घरात. त्यांच्या घरात कोणाला प्रवेश नव्हता. 
     एक दिवस मिनूच्या आईने काकूंच्या सांगण्यावरुन सांदणं केली होती. नमुना म्हणून काकूंसाठी तिने थोडी बाजूला काढून ठेवली आणि नेहमीप्रमाणे विहिरीवर जाणाऱ्या काकू दिसतील म्हणून ती वाट बघत होती. पण काकू काही घराबाहेर दिसल्या नाहीत. शेवटी ती प्लेट घेऊन तिने मिनूला काकूंच्या घरी पिटाळलं. दारातून मिनूने आज्जींना हाका मारल्या. पण त्या ओ देईनात म्हणून ही दार उघडून आत गेली. दोन खोल्या ओलांडून आत गेली तरी तिला कोणाची चाहूल लागेना. तेवढ्यात तिचं लक्ष एका बंद दाराकडे गेलं. आज्जी तिथं आहे का ते बघायला तिनं दार ढकललं. दार ढकलताच आत जे दृश्य तिला दिसलं, ते पाहताच ती घाबरुन पळत सुटली.
     घरी येऊन मिनूने आईला घट्ट मिठी मारली. तिचा एवढा भेदरलेला चेहरा पाहताच आई पण घाबरली. थोडी शांत झाल्यावर नक्की काय झालं ते सांगेल म्हणून तिची आई मिनूला शांतवत राहिली. पण तेवढ्यातच काकूंच्या घरातून भांडी पडल्याचा आवाज आणि एक कसलातरी विचित्र आवाज ऐकू येऊ लागला. त्यातच काकूंचा मोठा आणि घाबरलेला आवाज भर घालायला लागला. आत्तापर्यंत कधीही त्यांच्या बोलण्याचा सुद्धा आवाज शेजारी ऐकू आला नव्हता. तो आता त्यांचा हा तार स्वर ऐकून आईला काय झालं कळेना. तिने मिनूला तिथंच सोडलं आणि पळत काकूंना मदत करायला त्यांच्या घराकडे धावली. दार उघडंच होतं. पहिल्या खोलीतून ती आत गेली आणि एकदम थबकलीच. आत एक मुलगा आणि काकू यांची झटापट चालली होती. त्या मुलाला बघताच मिनूच्या आईच्या सगळं लक्षात आलं. एरवी घरात येऊ न देणाऱ्या काकूंना... आज मिनूच्या आईला समोर बघून हुश्श झालं. नजरेनेच त्यांनी तिला मदत करण्याची विनवणी केली. ते दृश्य पाहून बसलेल्या धक्क्यातून पटकन सावरत मिनूची आई काकू सांगतील तसं करत गेली. तो मुलगा देखील वेगळा चेहरा समोर दिसताच थोडा मवाळ झाला. त्यामुळं काकूंचं पुढचं काम जरा सोपं झालं. शेवटी एकदाचं त्यांनी त्या मुलाला खोलीत दोरीनं बांधलं आणि खोलीच्या दाराला कडी लावून त्या बाहेर आल्या. बाहेर आल्या ते एका डोळ्यात निराशेचे आणि दुसऱ्यात हताशीचे अश्रू घेऊनच. मिनूची आई हे सगळं भांबावून बघत होती. तिने पटकन पुढं होऊन काकूंना आधार दिला आणि सरळ आपल्या घरी घेऊन आली. आज्जीला बघताच मिनूने तिला घट्ट मिठी मारली, तिला सॉरी म्हटलं. पण दोघीही अस्वस्थ होऊन बराच वेळ रडत राहिल्या.
      झालं असं होतं की... घरात आज्जी दिसेनात म्हणून मिनूने बंद खोलीचं ते दार उघडलं. तर आत तिला एक मजबूत शरिरयष्टीचा मुलगा पायाला दोरीने बांधून ठेवलेला दिसला. त्याचं डोकं त्याच्या शरीराला शोभणार नाही असं लहानसंच आणि थोडं वेडंवाकडं होतं. तिरळे डोळे, पुढचे दात खूप मोठे आणि ओठाबाहेर आलेले, तोंडातून सतत लाळ गळत होती आणि मुख्य म्हणजे तेव्हाचा त्याचा भावनाहीन चेहरा बघून मिनू घाबरली. सांदणाची प्लेट तिच्या हातून तिथंच पडली आणि ती पळत घरी गेली. या नादात दार उघडंच राहिलं. उघडं दार दिसताच त्या मुलाने जोर लावून पायाला बांधलेली दोरी तोडून टाकली आणि तो बाहेर आला. परसदारी असलेल्या काकू आत येईपर्यंत त्यानं सगळी भांडी पाडायला सुरुवात केली आणि पुढचा सगळा गोंधळ मिनूच्या आईने पाहिलाच होता. 
    काही न बोलता मिनूची आई काकू शांत होण्याची वाट बघू लागली. तिच्या कुशीत शिरुन एखाद्या लहान मुलासारखं त्या रडत होत्या. हे असं मनाला मोकळं करणारं रडू त्यांना याआधी कधी आलं होतं कोण जाणे... म्हणून मिनूची आई त्यांना थांबवत नव्हती.
    थोड्यावेळानं शांत झाल्यावर काकू आपणहून सांगायला लागल्या. 'लग्न झाल्यावर बरीच वर्षं त्यांना मुलबाळ झालं नाही. घरात सासूबाई यावरुन खूप बोलायच्या. शेजारी पाजारी तर काय... विषयच शोधत असतात. आधीच मूल नाही म्हणून खंतावलेल्या मनाला हा त्रास सहन होईनासा झाला. वैद्य, हकीम, देवधर्म सगळं करुन झालं. पण वयाची चाळीशी जवळ आली तरी या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही. आता आपल्या नशीबातच मूल नाही हे दोघांनीही मनाला समजावून टाकलं.' काकू सांगत होत्या. 'ह्यांचा वेळ शाळेत जायचा. आजूबाजूच्या मुलात ते आपलं मूल बघायचे. पण माझं काय... घरात किती आणि कशात गुंतवून घेणार ना मी.. मनातून कितीही काढायचं म्हटलं तरी ते सहज शक्य होईल का सांग बरं? पण मग अचानकच अनपेक्षितपणे आम्हाला बाळाची चाहूल लागली.' हे संगतानासुद्धा काकूंचा चेहरा इतका फुलला की त्यावेळी त्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पना मिनूच्या आईला आली. काकू पुढं सांगू लागल्या. 'एवढ्या उशिरा बाळाची चाहूल लागली तरी आम्ही खुश झालो. त्या खुशीच्या नादात बाकी काही विचार केला नाही. पण डॉ. ला दाखवल्यावर त्यांनी एक शंका बोलून दाखवली. ते म्हणाले होते आम्हाला की वयाच्या चाळिशीतलं मूल सुदृढ जन्मलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण कधी कधी मतिमंद बाळ पण जन्माला येऊ शकतं. तेव्हा नीट सगळ्याचा विचार करा आणि काय ते ठरवा. पण आम्ही बाळ होणार यातच हरखून गेलो आणि त्याला जन्माला घालायचंच असं ठरवून मोकळे झालो. पण नऊ महिने पूर्ण व्हायच्या आधीच बाळाचा जन्म झाला. जन्मल्यावर तर त्याला बघितल्याबरोबर डॉ. ना त्यांची शंका खरी होणार असं वाटलं. पण आम्ही डोळ्यावर पट्टी बांधूनच वावरत होतो. कौतुकानं त्याचं नाव श्रीहरी ठेवलं. श्री जसजसा मोठा होऊ लागला तशी आमच्या डोळ्यावरची पट्टी निसटून पडली. त्याची शारीरिक वाढ नीट होत होती. पण ज्या ज्या वयात जे जे त्यानं करायला हवं ते तो करत नव्हता. जिथं ठेऊ तिथं आपण उचलेपर्यंत आहे तस्सा पडून राहायचा. सासूबाईंना आणि लोकांना बोलायला आणखी एक कारणच मिळालं.' आता परत काकूंचा आवाज कातर होऊ लागला होता. मिनू शेजारी बसून सगळं ऐकत होती. 'डॉ. नी यावर काही इलाज नाही म्हटल्यावर आम्ही हे सत्य जड मनानं स्वीकारलं. काय करणार... दुसरा पर्याय तरी काय होता. सुरुवातीला हे शाळेतून आल्यावर बाळाचं आवरण्यात मला मदत करायचे. पण हे मनाने फार हळवे. ह्या सगळ्याचा त्रास होऊ लागल्यावर मीच त्यांना शाळा, शिकवणीत गुंतवून दिलं. श्री अजून लहान होता त्यामुळं एकटी पुरी पडत होते. तो थोडा मोठा झाल्यावर बाहेर इतर मुलात रमेल म्हणून मी त्याला बाहेरही घेऊन जायचे. पण नंतर नंतर ती मुलं.. मुलंच काय... मोठी माणसंही त्याला त्रास देऊ लागली. वेडा आला, वेडा आला म्हणून चिडवू लागली. अर्थात त्याला हे काहीच कळायचं नाही. मुलं बघितली की तो खुश व्हायचा. पण माझ्या मनाचं काय... फार त्रास सहन केला मी एकटीनं. तेव्हापासून आम्ही दोघं जी घरात बंद झालो ती आजतागायतपर्यंत.' काकूंची कहाणी ऐकताना मिनूच्या आईचे डोळे पण पाणावले.
     श्रीबद्दल काकू बहुतेक पहिल्यांदाच एवढ्या मोकळेपणी कोणाशीतरी बोलल्या असतील. ही परिस्थिती बदलवणं कोणाच्या हातात नसलं तरी काकूंना बोलायला आणि त्यांना समजून घेणारी एक छोटी मैत्रीण मिनूच्या आईच्या रुपानं मिळाली. मिनू आणि तिच्या आईला काकूंच्या घरात प्रवेश मिळाला. कधी जाता येता खोलीचं दार उघडं असलं तर त्यांना श्री दिसायचा. तसाच दोरीने बांधलेला,लाळ गाळत विचित्र आवाज काढणारा. मिनूला अजूनसुद्धा त्याची थोडी भीती वाटत होती. पण बरोबर त्याची तिला फार दया येत होती. पतंगाच्या शेपटीला दोरी बांधल्यावर दुःखी होणारी मिनू इथं एका मुलाला बांधून ठेवलंय म्हटल्यावर अस्वस्थ होणारच ना. पण तिच्यापुढं दुसरा काही इलाजच नव्हता. श्रीला आवरणं आज्जीला किती कष्टाचं जातं हे तिनं पाहिलं होतं. जसा तिचा त्या घरात वावर वाढला तशी तिची श्री बद्दलची भीती कमी झाली आणि श्रीलाही ती ओळखीची घरातली वाटू लागली. तो हे बोलून सांगू शकत नसला तरी ती दिसल्यावर त्याच्या त्या विचित्र आवाज काढण्यातला तिला  फरक जाणवला होता. शाळेतून आली की ती आता जास्तीतजास्त वेळ त्या घरात काढू लागली. आज्जीकडून ती हळूहळू त्याच्याशी संवाद साधायला शिकू लागली. तिला त्याचं आवरण्यात थोडीफार मदत करु लागली. आता श्रीलाही तिची एवढी सवय झाली की तिच्याकडून तो सगळं शांतपणे करुन घेऊ लागला. कधी कधी तो काकूंचं अजिबात ऐकत नसे. तेव्हा तर हमखास काकू मिनूला बोलवू लागल्या. ती नुसती समोर जरी दिसली तरी तो लगेच खुश होऊन काकू करतील ते नीट करुन घेऊ लागला. दोघांची अशी छान गट्टी जमली होती. मिनू मुळातच संवेदनशील असल्यामुळं हे सगळं उमजून ती मनापासून त्याला जपत होती. साहजिकच काकूही खुश होत्या. सगळं काही सुरळीत सुरू होतं. या सगळ्यात काकांचा वाटा फार कमी होता. श्रीला त्यांचा एवढा लळा नव्हता. अर्थात कसा असणार? ते त्याच्यापासून लांबच तर असायचे कायम. काकूंचं दुःख, त्यांना होणारा त्रास समजत होता त्यांना. पण.... तरी मिनूमुळे काकूंचा भार थोडातरी कमी झाला होता. त्यामुळं त्या आज्जीची ही अगदी लाडकी नात झाली होती. 
   पण एकदा नियतीनं कोणाकडं पाठ फिरवली की, तिच्यापुढं कोणाचं काही चालत नाही. इतकी वर्षं काकूंनी श्रीचं करण्यात घालवली, आपली सगळी हौसमौज बाजूला ठेवली. सगळं मनातल्या मनात दाबून ठेवलं त्याचा त्रास कधीतरी होणारच ना. एक दिवस काकू श्रीला भरवत असतानाच खाली कोसळल्या. घरात नेहमीप्रमाणे काका नव्हतेच. त्या बिचाऱ्या जीवाला बाकी काहीच कळत नसलं तरी आईला काहीतरी झालंय हे कळलं. तो मोठमोठ्याने त्याच्या त्या आवाजात ओरडू लागला. मिनूचे आईबाबा ते ऐकून धावतपळत त्यांच्या घरात गेले. पण तोवर काकूंचा जीव अलगद निघून गेला होता. सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता. पण त्यापेक्षा आता पुढं काय ही काळजी जास्त होती.
    काकू गेल्याचं दुःख लगेच विसरुन जाण्याशिवाय काकांकडे काही पर्यायच नव्हता. पण पुढं तर सगळा अंधार दिसत होता. श्रीची सगळी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. ज्याची त्यांना अजिबातच सवय नव्हती आणि श्रीलाही त्यांची सवय नव्हती. दोघांच्या जेवणाखाण्याची सोय मिनूच्या आईने केली. पण श्री काकांकडून काही करुन घ्यायला तयार होत नसे. ते जवळ यायला लागले तरी याचा दंगा सुरु होई. त्याला कसं शांत करावं या संभ्रमात काका पडत आणि मग त्याचं आवरणं बाजूलाच राही. काकू असताना तो जितका व्यवस्थित असे त्याच्या विरुद्ध आता त्याची अवस्था होऊ लागली. तो काकांकडून भरवून पण घेत नसे. त्याचे ते भावनाहीन डोळे घरात सतत आईला शोधत भिरभिरत असत. काकांनासुद्धा आता आपल्या बायकोनं किती त्रास सहन केला... शारीरिक आणि मानसिक पण याची जाणीव व्हायला लागली. ते तसं वारंवार मिनूच्या आईपुढं म्हणू लागले. श्रीला कसं समजावं आणि सांभाळावं त्यांना कोडं पडलं. पण मग मिनू त्यांच्या मदतीला गेली. आज्जी नसताना त्या घरात जायचा तिचा जीव व्हायचा नाही. पण श्रीची अवस्था बघता ती गेलीच. मिनूला बघताच श्री एकदम खुश झाला. त्याची स्वच्छता करायला तिने काकांना जमेल तशी मदत केली. मिनुकडून श्रीने व्यवस्थित भरवून पण घेतलं. रोज दंगा करणारा श्री मिनू आल्यावर सगळं कसं शहाण्यासारखं करवून घेतोय हे बघून काकांना नवल वाटलं. ती श्रीशी, त्याला काही कळत नसलं तरी प्रेमाने बोलायची. अचल अशा झाडावेलींशी तिच्या गप्पा चालायच्या, तर इथे श्रीची काय बात... त्यालासुद्धा तिची माया कळायची म्हणूनच तर तो तिचं ऐकायचा. केवढीशी ही पोर... पण तिला एवढी समज कुठून आली काकांना कळेना. अक्षरशः डोळ्यातून पाणी काढत त्यांनी तिला गोंजारलं. हळूहळू श्रीला काकांची सवय होऊ लागली आणि त्यानं त्यांना त्रास देणं कमी केलं.
     या अशा मुलांना वाढवणं हे किती चिकाटीचं आणि सहनशीलतेचं काम आहे, हे काकांना आता समजलं. तरी मिनू, तिची आई जवळ असल्यामुळं त्यांचं काम तसं खूप हलकं झालं होतं. पण आता त्यांचं घराबाहेर पडणं पूर्ण बंद झालं होतं. त्यांचं विश्व आता पूर्णपणे श्रीभोवती केंद्रित झालं होतं. अशा या श्रीला डोळ्यात तेल घालून सांभाळणं जरुरीचं होतं. तो कुठं धडपडला किंवा आजारी पडला तर ते दुखणं अजून त्रासदायक झालं असतं, श्रीला आणि काकांना... दोघांनाही... पण त्यांच्या वयाचा विचार करता दिवसेंदिवस त्याचं सगळं करणं त्यांना जड जात होतं. काकू गेल्यापासून तीन चार महिन्यातच काका तीन चार वर्षांनी म्हातारे दिसू लागले होते. पण त्यांच्या रोजच्या दिनमानात काही बदल न होता दिवस पुढे पुढे सरकत होते. 
    पण नियतीने तरी एखाद्याची किती परीक्षा बघावी. एक दिवस एकदमच श्रीला ताप भरला. याआधी त्याची छोटी आजारपणं झाली होती. पण तेव्हा ते सगळं काकू निपटायच्या. ते कसं हे काकांना माहीत नव्हतं. त्यांनी डॉ. ना बोलवून आणलं. श्रीची केस त्यांना माहीत होती. त्यांनी काकूंना पूर्वीच सांगून ठेवलं होतं की, हा जगला तर चार पाच वर्षं जगेल नाहीतर चाळीस पन्नास. त्याचं करत राहण्याशिवाय आपल्या हातात दुसरं काही नाही.  त्याप्रमाणे काकू त्याचं करत राहिल्या आणि आता काकाही. पण श्रीचं यावेळचं आजारपण काहीतरी वेगळं होतं. औषधाला काही तो प्रतिसाद देत नव्हता. मिनू त्याच्या आजारपणात सारखी त्याच्याजवळ त्याची सेवा करत होती. काकांना तर ती छोटी देवदूतच वाटायला लागली होती. त्याचं हे आजारपण आठ दिवस झाले तरी तसंच होतं. शेवटी इलाज संपल्यावर डॉ काकांना म्हणाले, 'आता फक्त वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे.' हे ऐकून मिनू एकदम कोषात गेली. तो कसाही असला तरी त्याची मिनूला खूप सवय झाली होती. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त ती त्याला सोडून कुठं जाईनाशी झाली. आई, बाबा, काकांनी पण समजावलं तिला. पण कोणाचं काही पटलं नाही तिला. या सगळ्या परिस्थितीने ती एकदम मोठी झाली होती.
     आणि शेवटी तो दिवस उजाडलाच. मिनू शाळेत जायची तयारी करत होती. तेवढ्यात काकांची कातर हाक ऐकून सगळे तिकडं धावले. जाऊन पाहतात तर जे अपेक्षित होतं तेच घडलं होतं. गादीवर श्रीचा निष्प्राण देह पडला होता. काका स्फुंदून स्फुंदून रडत होते. मिनूचे बाबा त्यांचं सांत्वन करायला लागले. हे सगळं बघणं मिनूला अशक्य झालं. ती पळत पळत त्या विहिरीकडेच्या उंबराखाली पारावर जाऊन बसली. काकांच्या घरातून बाहेर पडता पडता तिला ऐकू आला तो काकांचा दीर्घ हुंकार आणि त्यापाठोपाठ आलेलं काकांचं वाक्य..'एकदाची सुटका झाली.' सुन्न मनानं मिनू त्या पारावर कितीतरी वेळ मूक अश्रू ढाळत बसून राहिली. तिच्या बालमनाने आवडत्या व्यक्तीचा प्रत्यक्ष पाहिलेला हा पहिलाच मृत्यू. 
     श्रीला जाऊन आता दोन तीन दिवस झाले होते. तरी त्यातून मिनू सावरत नव्हती. राहून राहून तिला काकांचं ते वाक्य आठवत होतं. 'एकदाची सुटका झाली'... पण कोणाची? त्याची की त्यांची? हा विचार मनात येताच, श्रीला जेव्हा पहिल्यांदा तिनं पाहिलं, आज्जीने त्याच्याबद्दल जे जे सांगितलं तेव्हापासून आजपर्यंतच सगळं तिच्या नजरेसमोरुन झर्रकन सरकून गेलं. तिच्या बालमनात अनेक प्रश्न काहूर माजवू लागले. देवानं जरी श्रीला असं केलं असलं तरी शेवटी तो माणूसच होता ना? मतिमंद असला तरी त्याच्याठिकाणी एक समज होती. त्याला भावना व्यक्त करता येत नसल्या तरी त्या त्याच्या ठायी नक्कीच होत्या. त्याच्यामुळेच तर तो त्याच्या आईला, मिनूला आपलं मानत होता. त्याला फक्त प्रेमाची, मायेची भूक होती. त्याची ती भूक जो भागवेल त्याला तो मायाच देत होता. त्याच्याजवळ असलेल्या माणुसकीचा प्रत्यय तिला पदोपदी आला होता. मग त्याच्या लहानपणी लोकांनी त्याला का त्रास दिला? त्यांच्या त्रासामुळं आज्जींनी श्रीला आणि स्वतःलाही कोंडून घेतलं. लोकांनीे जर त्याला स्वीकारलं असतं तर आज कदाचित चित्र वेगळं दिसू शकलं असतं. देवानं जेवढं आयुष्य दिलं होतं तेवढं तरी दोघांनी आनंदात घालवलं असतं. मग या लोकांमधे आणि श्रीमधे नक्की शहाणं कोण?आणि मंद बुद्धी कोण? तिच्या बुद्धीला जमेल तशी ती आपल्याच प्रश्नांची उत्तरं शोधत होती.  
    विचार करता करता तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं. पण तिचं तिलाच कळेना की, हे पाणी कशाचं? श्री गेला म्हणून झालेल्या दुःखाचं?? की या संवेदनाशून्य जगातून सुटका होऊन तो देवाच्या दयेच्या घरी गेला त्या आनंदाचं?

©जस्मिन जोगळेकर.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक