अश्विन कार्तिक... शरद ऋतू

#अश्विन_कार्तिक_शरद_ऋतू 

भाद्रपदात बाप्पांचा सहवास काही काळापुरताच असतो खरंतर…पण त्यांना निरोप देऊन आल्यावर थोडं उदासीचं सावट असतं आसपास. नंतर पितरांचं स्मरण करुन झाल्यावर लगेच शरदाच्या चांदण्यानं खुलूनच येतात ते अश्विन कार्तिक. श्रावणातल्या अवखळ वातावरणात खूप सारा बदल होऊन ते आता समंजस, प्रौढ झालेलं जाणवतं. या वातावरणात एक ठेहराव आलेला दिसतो… पाऊसही आपला पसारा आवरुन परतीच्या तयारीला लागतो. काळया ढगांचं रुपपरिवर्तन होऊन ते पांढऱ्या रंगाला आपलंसं करतात. कौलावरून दणदण पडणाऱ्या पागोळ्या आता आपलं अंग आक्रसून घेतात आणि गारव्याची शाल हळूहळू पसरायला लागते. आसपासची हिरवाईसुद्धा आता वयानं प्रौढ होते. हिरव्या रंगाकडून पिवळ्या रंगाकडे तिचा प्रवास सुरु झालेला दिसायला लागतो. पुढचे ऋतू आपली चुणूक हलकेच दाखवायला लागतात. पण तरी भोवताल शरदाच्या येण्यानं नक्कीच आनंदित झालेला दिसतो. पाऊस, ऊन आणि थंडीच्या सीमारेषेवरचा हा शरद ऋतू. 

याची सुरुवातच नवरात्रीच्या आगमनानं एकदम प्रसन्न, भक्तिमय होते. नऊ दिवस आदिशक्तीची विविध रुप, अष्टमीचा जागर, घागरीची फुंकर, सवाष्ण, गोडाधोडाचं जेवण याबरोबरच दसऱ्याला झेंडूच्या तोरणानं सजलेली दारं पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जातं. कोजागिरीचं मोहक चांदणं तर शरद ऋतूचं अनोखं वैभव. या दोघांचं नातं काही औरच! किती शांत, नितळ रात्र असते ती! 'को जागरति' म्हणत येणारी लक्ष्मी या रात्रीच्या मोहात पडत असेल… कोजागिरी म्हटलं की, मला आठवतात त्या वेंगुर्ल्याच्या रात्री. नितांत सुंदर समुद्र किनारा आणि निसर्गाचं भरभरुन सौंदर्य मिळालेलं गाव…माझ्या लहानपणीच्या तिथल्या आठवणी फार गोड आहेत. त्यातलीच कोजागिरीची. रात्री आम्ही घरी आईनं केलेला खाऊ आणि मसाला दूध घेऊन चालत बाहेर पडायचो. वेंगुर्ला बंदराजवळ दीपगृहाच्या पुढं छोट्या टेकडीवर जायचो. किती सुरेख असायची ती रात्र! समोर समुद्राची अथांगता, वर आकाशातून पाझरणारी कोजागिरीच्या पूर्ण चंद्राची शीतलता आणि भोवताली गाज सोडली तर नीरव शांतता…अहाहा! आत्ता आठवलं तरी लहान होऊन त्या काळात परत फिरुन यावं वाटतंय. लाटांवर बागडणारी चंद्रकिरणांची ती चंदेरी चमचम बघताना भान हरपून जायचं. ही रात्र कधी संपूच नये किंवा प्रत्येक रात्र अशीच असावी असं वाटायचं तेव्हा. अशा रात्री गूढ असल्या तरी त्यांची भीती वाटत नाही. रस्त्यावर पथारी पसरुन हाताच्या घडीत पायांना पोटाशी विसावू देत किती वेळ बसून राहिलं तरी कंटाळा यायचा नाही. मधेच कधीतरी आडवं पडून आकाशातलं सौंदर्य पाहायचं…समोर पाहू की वर पाहू अशा द्विधेत मन असायचं. तोवर सोबत नेलेल्या भेळेचा वास मनाला आपल्याकडे ओढून घ्यायचा. भेळ आणि मसाला दूधाचा अशा मोहक वातावरणात आस्वाद घ्यायचा. तोवर बारा वाजायला आलेले असायचे. मग निघायची तयारी करायची आणि मनाला तिथंच सोडून घराच्या दिशेनं पावलं वळायची. सुंदर काळ होता तो…आताचा काळ बघता मनात येतं, आमच्या आधीच्या पिढ्या आणि आमची पिढी किती समाधानी होती! अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद, सुख मिळवायची वृत्ती होती. असो…

शरद ऋतू म्हणजे हवामानात बदल घडवून आणणारा ऋतू. पुढे येणाऱ्या थंडीची चाहूल तर लागतेच पण सोबत उष्णतेची एक लाट ही धडकते…ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. पण थंडीची ही चाहूल दिवाळीचे वेध लावते. दिवाळीची तयारी आमच्याकडे अंगण चोपून सुरु व्हायची… पावसाळ्यात अंगणात पाऊस उभा आडवा नाचून गेलेला असायचा. अंगणाची अवस्था वाईट झालेली असायची. त्यामुळं आधी सगळं अंगण कुदळीनं खणून काढायचं, मग त्यावर ओणव्यानं चोपण्यानं मारुन ते सपाट चोपून घ्यायचं, अशा चोपायच्या दोन तीन फेऱ्या व्हायच्या, मग तसं घट्ट झालेलं अंगण शेणानं छान सारवून घ्यायचं. सारवणं हे तर माझ्या आवडीचं काम. घरात सारवणं आणि अंगण सारवणं यात फरक असायचा. घरात शेण घट्ट कालवून हाताने छानपैकी नक्षी काढून सारवायचं आणि अंगणात बादलीत जास्त पाण्यात शेण कालवून झाडूनं सारवायचं. दोन्हीत मजा असायची. मग ते वाळलं की त्यावर ठिपक्यांची रांगोळी काढायची. ही सगळी प्रक्रिया म्हणजे ध्यानाचाच एक प्रकार असायचा. दरवर्षी अंगण बाबा करायचे. अजूनही डोळ्यापुढं सगळं चित्र उभं राहतंय. दिवाळीची मजा तर तेव्हा काही औरच होती. पहाटेच्या थंडीत कुडकुडत उटणं लावून गरमागरम पाण्यानं केलेले अभ्यंगस्नान, फराळ, नवीन कपडे…किती अप्रूप असायचं प्रत्येक गोष्टीचं. अश्विन कार्तिक म्हणजे मोठ्या सणांचे, तेजाचे, उत्साहाचे, गुलाबी थंडीचे सळसळणारे दिवस….

या दिवसांत झेंडू आणि शेवंतीच्या फुलांनी देव्हारा सजलेला असतो. आंब्याच्या पानांसोबत केलेली झेंडूची तोरणं दाराला आणि घराला सुशोभित करतात. दसरा दिवाळीत झेंडूला मान असतो फार. पण यावेळीच सृष्टीला सुशोभित करणारी आणि वातावरणाला सुगंधित करणारी फुलं उंच झाडांवर चमकत असतात, ती म्हणजे बुचाची फुलं…उंचच उंच झाडांवर जमिनीकडं आशेनं बघणारी ही पांढरी फुलं वेड लावतात. एक लक्षात येतंय का…पांढऱ्या रंगाच्या फुलांना देवानं सुगंधाचं देणं दिलं आहे. लांब देठाची बुचाची ही पांढरी फुलं झाडावर उलटी लटकताना मान पूर्ण वर करून बघताना कधी मान दुखलेली जाणवत नाही. वाऱ्याच्या मंद झुळुकेबरोबर त्यांचा सुगंध हवेत पसरला की प्रफुल्लित वाटतं एकदम. रात्री झाडाखाली पडलेला फुलांचा सडा मातीला आपल्या अत्तरदाणीतून सुगंध लावत असतो. या दोघांचं नातं किती अलवार! मातीला कधी या फुलांचं ओझं होत नाही आणि फुलं कधी मातीवर आपला भार टाकत नाहीत. बुचाची देठं लांब…गुलबक्षीच्या फुलांची कशी देठं विणून छान वेणी करतात ना…तशी वेणी बुचाच्या फुलांचीही छान दिसते. फक्त समोर कितीही फुलं असली तरी वेणी मोठी करता येत नाही या फुलांची. फुलांच्या वजनानं ती विस्कटते. पण त्यांचं सौंदर्य मोहकच. कोकणापेक्षा घाटावर राहायला या झाडांना जास्त आवडतं बहुतेक. पण बकुळीची फुलं वेचताना जो आनंद मिळतो ना तोच आनंद ही फुलं वेचतानाही मिळतो. 

शरद ऋतूतल्या रात्री लोभस असतात फार. हवेतल्या गारव्यासोबत आकाशातले लुकलुकणारे तारे बघत अंगणात पहुडलं की भान हरपून जातं. आपली मराठी महिन्यांची नावं त्या काळात दिसणाऱ्या नक्षत्रांवरुन ठेवली गेली आहेत. त्यामुळं अश्विन महिन्यात अश्विनी आणि कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्र आकाशात हजर असतातच. सोबत नभांगण खुलवणारे इतर अनेक तारे…ध्रुवाकडे जाणारा मार्ग दाखवणारे सप्तर्षी आणि शर्मिष्ठा हे दोन तारकासमूह आळीपाळीने ड्यूटी वर असतात. या काळात सप्तर्षी आपली पाळी संपवून घरी जायला निघतात तेव्हाच दुसऱ्या दारानं शर्मिष्ठा ड्यूटी वर हजर होत असतात. साधारणपणे बारा राशीतल्या शेवटच्या राशी, सत्तावीस नक्षत्रातली शेवटची नक्षत्र यावेळी आकाशात बागडत असतात. कोजागिरीच्या चंद्राचं जरी कौतुक होत असलं तरी चंद्राच्या गैरहजेरीतलं आकाश भुरळ पाडणारं असतं. शरद ऋतूचं हे एक विशेष…म्हणूनच कवी, गीतकारांनाही याची भूल पडते. 

शरद ऋतू हवामानात जसा बदल घडवून आणतो, तसा पक्ष्यांच्या जीवनावरही परिणाम करतो. शरद ऋतू आला की काही पक्षांची स्थलांतर करायची लगबग सुरू होते. कोणी उबदार हवेसाठी प्रवास करतात, तर कोणी वसंतात प्रजननासाठी गेलेले परत येत असतात. यांच्याकडे ना कॅलेंडर ना घड्याळ…तरी ठरलेली कामं ठरलेल्या काळात, ठरलेल्या वेळी होता असतात. अर्थात सूर्य असतोच यांना मार्गदर्शन करायला…किती कळतं ना या छोट्या जीवांना! 

वर्षा ऋतूत गढूळलेल्या पाण्याला निवळशंख बनवणारा हा शरद ऋतू,  अल्लड, अवखळ हिरवाईला समंजस, प्रौढ बनवणारा हा शरद ऋतू, पावसाळी सर्द हवेला उष्म्याचा धाक दाखवत गारव्याकडे घेऊन जाणारा हा शरद ऋतू, काळया मेघांवर पांढऱ्या रंगाची जादू करणारा हा शरद ऋतू, 
अवघ्या सृष्टीला एक ठेहराव देणारा हा शरद ऋतू, सर्वत्र शांतता आणि प्रसन्नतेची उधळण करणारा हा शरद ऋतू…
अशा ऋतूला शब्दात गुंफायला आवडणारच ना… कवी अनिल यांनी शरदागम या त्यांच्या दशपदीत शरदाचं सुंदर वर्णन केलं आहे.

“आभाळ निळे नि ढग पांढरे हवेत आलेला थोडा गारवा
कोवळी सकाळ मनमोकळी धरा तळी रंग एक हिरवा

साचून राहिल्या गढूळ पाण्याची हळूहळू जाली निर्मळ जळें
काठावर उभ्या राहून बाभळी वाकून पाहती रूप सावळे”

असा हा तेजोमय ऋतू …पुढं येणाऱ्या ऋतूंचा सोहळा पाहण्यासाठी आतुरलेला ऋतू. 

जस्मिन जोगळेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक