भाग सहा

भाग सहा 

तो लॉंग वीकेंड असल्यामुळे इराच्या शाळेला सुट्टी होती. त्याच दरम्यान तिची आजी आल्यामुळे इरा प्रचंड खुश होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती आजीभोवती पिंगा घालू शकत होती. गावातल्या नदीबद्दल, तिथल्या लोकांबद्दल ऐकत किंवा रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकत इरा आजीपाशीच झोपत होती. एरवी एक दिवस जरी सुट्टी असली तरी आईच्या मागे काय करू, कंटाळा आला म्हणत भुणभुण करणारी इरा यावेळी मात्र मजेत होती. त्यामुळे आईही खुश होती.

त्यातल्याच एके दिवशी इरा उठली ती आजीच्या अस्वस्थ आवाजामुळेच. खोली बाहेर येऊन बघते तर आजी आपली अखंड या खिडकीतून बघ, त्या खिडकीतून डोकाव करत हॉलमध्ये अस्वस्थ फेऱ्या मारत होती. इराची आई स्वयंपाक घरात नाश्त्याची तयारी करत होती, तर बाबा ऑफिसला जायच्या लगबगीत. त्यातच इराने पाहिलं आजी एकदमच गेट उघडून तरातरा बाहेर गेली. इराला आता प्रचंड उत्सुकता लागली होती. ती आपली आजी यायची वाट बघत खिडकीपाशी उभी राहिली. थोड्या वेळातच आजी परत आली आणि हॉलमध्ये सोफ्यावर टेकली. घरी आली तरी ती शांत मात्र झाली नव्हती. कधी नव्हे ते आई-बाबांना ओरडताना इराने आजीला पाहिलं. 'हे असं रोज रोज होतंय आणि तुम्ही दोघं इतक्या शांतपणे हे सगळं कसं बघू शकता? शेजारी जाऊन त्यांना समजावून, वेळप्रसंगी ठणकावून तुम्हाला सांगता आलं नाही? काय म्हणावं काय तुमच्या या गप्प बसण्याला?' इरा कोपऱ्यात उभी राहून सगळं शांतपणे ऐकत होती. आई-बाबाही यावर काही न बोलता गप्प उभे पाहून तिला जरा आश्चर्य वाटलं. हा प्रकार नक्की काय आहे हे तिला समजून घ्यायचं होतं, पण त्यासाठी आधी आजी शांत होणं गरजेचं होतं. अर्थात थोड्यावेळात ती झालीच शांत. तोवर इरानेही संयम धरला होता. 

नाश्ता, आंघोळी झाल्यावर इरा हळूच खोलीत आजीपाशी गेली. आजीचाही नुकताच दासबोधाचा अध्याय वाचून झाला होता आणि ती हात जोडून शांत बसली होती. कुठून सुरुवात करावी या विचारात पडल्यामुळे इरा आजीपाशी नुसतीच बसून राहिली. जेव्हा आजीने डोळे उघडले तेव्हा तिला समजलं इरा आपल्या शेजारी बसली आहे आणि तिच्या डोक्यात काहीतरी चक्र सुरू आहेत. सकाळचाच विषय घोळत असणार हे आजीच्याही लक्षात आलं. तिने इराला जवळ घेतलं आणि सकाळी काय काय झालं ते क्रमवार सांगू लागली. 'अगं इरा, सकाळी जेव्हा मी फुलं काढायला बागेत गेले, तेव्हा शेजारच्या दोन्ही अपार्टमेंटमधून जोरदार पाणी सुरू असल्याचे आवाज आले. फुलं काढून घरात परत आले तरी काही ते आवाज कमी झाले नाहीत. मग मात्र मला राहवलं नाही. खिडकीतून डोकावून पाहिलं तर एका अपार्टमेंटमध्ये वरची टाकी भरून वाहत होती, तर दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये तिथला वॉचमन पाण्याच्या फवाऱ्याने पार्किंग धुत होता. इतकी पाण्याची नासाडी बघवेना गं मला. तुझ्या आई-बाबांना म्हटलं तर ते म्हणाले हे असं रोजच होतं आणि कितीदा सांगितलं तरी ते लोक ऐकत नाहीत. मग मात्र मला संताप आला. तडक गेले शेजारी तर तिथला वॉचमन मोटार बंद करायची सोडून कोपऱ्यात तंबाखू मळत बसला होता. असं काही फायरिंग केलं त्याला की लगेच उठला आणि पंप बंद केला. मागे तर तिथला वॉचमन पार्किंग झाडायला नको म्हणून प्रेशरने पाणी मारून धुवून काढत होता. त्यालाही झापलं जरा. बिल्डिंग मधले काही लोक जमा झाले होते खाली. त्यांना चार गोष्टी समजावून सांगितल्या नि आले बघ घरी.'

आपल्याकडे पाणी भरपूर आहे म्हणून ते भरपूर वापरतात, अशी इराची समजूत होती. तीच मुळात चुकीची आहे हे इराला सांगणं महत्त्वाचं होतं. आजी तिला म्हणाली, 'हे बघ इरा, तुझ्या बाबांना दर महिन्याला भरपूर पगार मिळतो. पण म्हणून काय ते तो सगळा लगेच खर्च करून टाकतात का? भविष्यासाठी साठवून ठेवतात ना नीट. त्यापेक्षा हा पाणी प्रश्न खूप महत्त्वाचा आहे गं. पाण्यावरून महायुध्द पेटायची शक्यता असताना मुबलक मिळतंय म्हणून त्याची नासाडी करायची नसते इरा. भविष्याचा विचार करायलाच हवा. काही भागात तर पाणी नाही म्हणून हाल होताहेत लोकांचे. निसर्ग आत्ता भरभरून देतोय म्हणून त्याची नासाडी करणं योग्य नाही. त्यात शहरात तर पाणी जमिनीत मुरायलाही जागा नाही. काही झालं तरी पाणी जपूनच वापरायला हवं.' जपून म्हणजे नक्की कसं ते इराच्या लक्षात येईना. म्हणून आजीला विचारलं तिने. 'म्हणजे आता बघ, एक छोटा चमचा जरी आपल्याला धुवायचा असला तरी आपण सिंकचा नळ भसकन सोडतो. पाण्याच्या छोट्या धारेत होणाऱ्या कामासाठी जरुरीपेक्षा जास्त पाणी सोडतो आपण. म्हणजे उरलेलं वायाच ना? भांडी घासायला येणाऱ्या मावशी बादली भरून वाहायला लागली तरी आपला नळ चालूच ठेवतात. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या करायच्या टाळल्या की आपोआप पाण्याची बचत होऊ शकते. मी तर माझ्या घरी सिंकमधे छोटी पाण्याची बादली ठेवली आहे. तांदूळ धुतलेलं पाणी किंवा हात धुतलेलं पाणी त्यात गोळा झालं की बाहेर नेऊन झाडांना घालते. आजोबा वॉशिंग मशीन मधून बाहेर येणारं पाणी गोळा करून त्याने संडास धुतात. ही झाली पाण्याची बचत. सगळ्यांनी आपापल्या परीने अशी बचत केली ना तर पाण्याची टंचाई जाणवणार नाही असं मला वाटतं बघ.'

आजी काय सांगतेय ते इरा एकीकडे लक्षपूर्वक ऐकत तर होतीच, पण त्याच्या बरोबरीने पाणी बचतीसाठी आपणही काय करू शकतो याचा विचारही करत होती. शाळेतून आल्यावर वॉटर बॉटल मधलं उरलेलं पाणी सिंकमधे ओतून न देता ते झाडांना घालायचं किंवा दिवसभरात पिऊन संपवायचं ही गोष्ट तर तिने मनोमन पक्की केली. आजीला तसं सांगताच आपल्या बोलण्याचा नातीवर चांगला परिणाम झालाय हे पाहून ती खुश झाली. 

(क्रमशः)

जस्मिन जोगळेकर 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक