मुनिया
नवीन घराचं बांधकाम सुरु होतं तेव्हा कामावर सारख्या फेऱ्या व्हायच्या. तेव्हा एका पिटुकल्या जिवाने लक्ष वेधून घेतलं होतं. घराच्या पायऱ्या चढताना त्यावर रोज पाती पडलेली दिसायची. पहिले एक दोन दिवस त्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर उत्सुकता वाटायला लागली म्हणून नीट पाहिलं तर आमच्याच घराच्या एका खिडकीत ते दोन इटुकले जीव दिसले. त्या मुनियांची तेव्हा पहिली ओळख झाली. मग मात्र रोज आलं की आधी आवर्जून त्यांची दखल घेतली जायची. मग पुढची कामं..
त्या खिडकीत त्यांचा घरटं बांधायचा प्रयत्न सुरु होता. केवढासा तो जीव..पण चोचीतून लांबलचक पाती आणायची आणि ती खिडकीत व्यवस्थित बसवायचा खटाटोप चालू असायचा. ते तिथे नीट बसत नसेल तर चोचीने त्याचे दोन उभे भाग करायचे आणि परत उद्योग सुरु करायचा. असं किती दिवस चालू होतं. त्यातली बरीचशी पाती खाली पडून जायची. चुकून पडायची की उपयोग नाही म्हणून मुनिया मुद्दाम टाकायचा ते कळायला काही वाव नाही. पण बहुतेक निरुपयोगी म्हणूनच टाकत असावेत. कारण तिथे पडलेलीच पाती कधी त्यांनी परत उचलली नाहीत. तो समोर माळरानात जायचा आणि नवीन पातं घेऊन यायचा. कितीतरी दिवस हे चक्र सुरु होतं. आमच्या आधी हे तिथे रहायला येणार यात एक वेगळा आनंद वाटत होता. पण तो फार टिकला नाही. ती जागा काही त्यांना मानवली नाही. आमच्या खिडकीत घर बांधायचं त्यांनी मधेच सोडून दिलं आणि शेजारच्या खिडकीत बांधकाम सुरु केलं. आमच्या इथे नाही तरी त्यांचा शेजार चुकणार नाही पाहून बरं वाटलं.
हळूहळू घराचं बांधकाम पूर्ण झालं आणि आम्ही नवीन जागी रहायला आलो. तेव्हा मुनिया कुठे गायब होते. मुनियांचं पहिलं दर्शन होऊन तोवर वर्ष झालं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवीन वर्षाच्या त्याच महिन्यात परत त्या समोर माळरानात दिसायला लागल्या. हा निसर्गही किती कमाल आहे ना! या मुनियांकडे ना कॅलेंडर, ना घड्याळ तरी सिझन, वेळा कधी चुकल्या नाहीत त्यांच्या. कशावरुन त्यांना या गोष्टी कळतात काय जाणे. पण परत त्या दिसायला लागल्यावर मी खुश. आता तर त्यांच्या हालचाली कधीही टिपता येणार होत्या. रोज सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळी त्या दिसायला लागल्या. सकाळी त्यामानाने त्यांची संख्या कमी असायची. पण संध्याकाळी मात्र मस्त मोठा थवा असायचा. इटुकल्या पिटुकल्यांची नाजूक हालचाल, नाजूक आवाज बघताना ऐकताना बाकी सगळं विसरलं जायचं. कधी लवलवणाऱ्या पात्यावर, कधी विजेच्या तारेवर बसलेले दिसायचे. उडाले की एकदम थव्याने..किती छान दिसायचं ते!
तारेवर जर कधी जोडी बसली असली तर त्यांना बघताना वेगळीच मजा असायची. त्यांच्यात पण लटके रुसवे वगैरे असतं की काय जाणे. तारेवर बसलेल्या जोडीत एकजण सरकत राहिला तर दुसराही त्याच्या पाठोपाठ सरकत रहायचा, जवळ जाऊन नाजूक ढुशा द्यायचा, चोचीत चोच घालायला बघायचा, जोडीदाराने तोंड फिरवलं तर उडून त्या बाजूला जाऊन बसायचा..काय काय सुरु असायचं असं! पण एका जागी स्वस्थ बसलेले कधी दिसले नाहीत. अखंड वळवळ..😍
एकीकडे माझी कामं सुरु असताना त्यांना निरखण्यात अनोखी मजा असायची. हातातली कामं कधी संपून गेली ते कळायचंच नाही. हे सगळं बघताना, विचार करताना एक मात्र सतत जाणवत राहिलं.. निसर्गातले किती हे छोटे जीव..पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. घरासाठी चाललेले कष्ट..ते ही दुसऱ्या कोणाला त्रास न देता चाललेले..दुसरी गोष्ट म्हणजे गरजेइतकंच घर बांधणं.. माळरानावर आहेत भरपूर पाती म्हणून हे बंगला कधीच बांधत नाहीत. पिल्लं घालून ती उडून जाईपर्यंत जेवढी जागा लागेल तेवढंच त्यांचं घरटं. एरवी समुदायाबरोबर गोडीगुलाबीने मिळून मिसळून राहणारा हे जीव मला बरंच काही देऊन गेले..😍😊
आता त्यांची परत यायची वेळ जवळ येऊ लागलेय. त्याच प्रतिक्षेत मी..😊
जस्मिन जोगळेकर
(त्या पक्ष्यांप्रमाणेच माझ्या पोस्टही इकडे तिकडे उडवाव्या वाटल्या तर माझ्या नावासहित उडवाल याची खात्री बाळगते.😊)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा