लहानपण दे गा देवा



     पुणे मेडिकल कॉलेजमधून माझं MBBS पूर्ण झालं आणि आता 6 महिने इंटर्नशिप साठी कुठलं छोटं गाव मिळणार हा विचार करतच मी माझ्या रुमवर आले. पुण्यातलं हे चार वर्षाचं वास्तव्य अगदी मस्त गेलं होतं. घरापासून कॉलेज लांब होतं. तरी पहिलं वर्षं घरुनच जाऊन-येऊन केलं. पण नंतर अभ्यास वाढला आणि जा-ये जमेना झाली म्हणून मग शेवटी मैत्रिणीबरोबर एक रुम शेअर केली. तिथलीच जवळची एक मेस लावली. आता आईच्या हातची सर त्या जेवणाला नसली तरी बाकी त्रास वाचला म्हणून खुश होते. अभ्यास, मित्र-मैत्रिणीबरोबर दंगा, कॉलेजच्या कल्चरल प्रोग्रॅम्समध्ये सहभाग असं करता करता चार वर्षं कधी संपली कळलंच नाही. आणि आता इंटर्नशिपची वेळ येऊन ठेपली. 
     दोन दिवसातच कळलं की, मला शिरुरला जायचं आहे. हे गाव सिनियर्सकडून ऐकून होतेच. पण कधी लहान गावात राहिले नव्हते म्हणून थोडी धाकधूक वाटत होती.
      पुढच्या आठवड्यात जायचं होतं म्हणून हळूहळू तयारी सुरु केली. अर्थात काय बाहेरच रहात असल्यानं सगळं सामान आहे तसं उचलून नेलं की चालणार होतं. पण छोट्या गावात मिळेल न मिळेल म्हणून जास्तीचं सामान घेऊन ठेवणार होते एवढंच. अशी तयारी करता करताच जायचा दिवस उजाडला. घरच्यांना, मित्र मंडळींना अच्छा करुन स्वारगेटवर आले.
      स्टॅण्डवर शिरुरला जाणारी बस कुठून निघते ते पाहून तिथं जाऊन टेकले. तिथली तोबा गर्दी बघून बसमध्ये शिरता तरी येईल का अशी शंका आली. पण बघू पुढचं पुढे असं म्हणून आजूबाजूची गर्दी न्याहाळत बसले. पान-तंबाखू खाऊन गप्पा मारणारी लोकं, नऊवारी साडी आणि डोक्यावर पदर अशा बायका, हातभर चुडा घातलेल्या लेकुरवाळ्या बायका, शहरातून गावाला विक्रीसाठी खाऊ घेऊन जाणारे लोक असे तऱ्हेतऱ्हेचे ग्रुप तिथं निवांत बसले होते. त्यातच एक बाई तिच्या दोन मुलांना घेऊन आली. त्यातली मुलगी असेल आठ-नऊ वर्षाची आणि मुलगा तिच्याहून धाकटा तरी साधारण सहा-सात वर्षांचा. बसायला जागा नव्हतीच. त्या बाईनं आणलेलं बोचकं खाली टाकलं आणि बसली त्यावरच. शेजारी मुलगी उभी आणि मुलाला काखोटीला तसंच धरलेलं. असाच जरा वेळ गेला. मग मात्र त्या मुलानं चुळबुळ सुरु केली. लहानच ते, काय स्वस्थ बसणार थोडीच. ती बाई आधीच थोडी वैतागलेली दिसत होती आणि त्यात या मुलानं वळवळ सुरु केल्यावर चिडलीच. पाठीत एक धपाटा घालून दिला त्याला सोडून. सोडून दिल्याच्या आनंदात त्या धपाट्याचं दुःख विरुन गेलं होतं. एकदम खुश होऊन ते पोरगं इकडं तिकडं बागडू लागलं. सुरुवातीला मी पण कुतुहलानं तो काय काय करतोय ते बघत बसले. पण थोड्याच वेळात त्या बाईंची चिडचिड का झाली असेल ते मला समजून चुकलं. तो मुलगा इतका इतका कडमड्या होता की बस्स. भीती नामक प्रकार त्याच्या चेहऱ्यावर कुठेसुद्धा नव्हता आणि अखंड काहीतरी बडबड चालू. या गर्दीत तो कुठेतरी हरवेल अशी मलाच भीती वाटू लागली. मीच आपलं डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे लक्ष ठेऊन बसले होते. त्याची आई आणि बहीण मात्र एकदम निवांत होत्या. त्या बिच्चाऱ्या तरी काय करणार. त्यांना हा रोजचाच प्रकार असणार. तो मुलगा मात्र एकदम खुशीत होता. बसलेल्या लोकांकडे जाऊन गप्पा मारणं, त्यांच्या सामानावर चढून उड्या मारणं गोळ्या-वेफर्स विकणाऱ्याच्या मागं फिरणं असे त्याचे उद्योग सुरु होते. मला तर कधी एकदा बस येऊन लागतेय असं झालं. बस आल्यावर तरी निदान याचे चाळे बंद होतील असं वाटलं. पण बस यायचा पत्ता नव्हता आणि याचे चाळे बंद व्हायचा पण. इतका वेळ मी बहुतेक त्याला दिसले नव्हते. आता त्यानं माझ्याकडे मोर्चा वळवला. त्याच्या समोरुन एक ढोला माणूस गेला होता, त्याची चालण्याची नक्कल करत हा आला माझ्याकडं. आधी माझ्याकडे त्यानं पाहून घेतलं. मग माझ्या सामानाकडं. सगळं निरीक्षण झाल्यावर मग याची वटवट सुरु झाली. प्रश्नांचा भडिमार नुसता. तू कोण? कुठे निघालीस? नाव काय? राहणार कुठे? इ. इ. काहीही आणि कितीही सांगितलं तरी त्याचं समाधान होईना आणि बस पण येईना. शेवटी कंटाळून त्याला सांगितलं, 'मी डॉक्टर आहे आणि माझ्या पिशवीत एक मोठं इंजेक्शन आहे. देऊ का तुला?' वाटलं आतातरी इतर लहान मुलांसारखा घाबरेल. कुठलं काय..सामान तपासायला सुरुवात केली पठ्ठ्यानं. वर म्हणाला, केवढं आहे तुझ्याकडं इंजेक्शन? माझ्याकडं तर हम्माला द्यायचं मोठ्ठ इंजेक्शन आहे. आता यापुढं काय बोलणार.. कप्पाळ. तेवढ्यात त्याच्या समोरुन एक बाई तिच्या बाळाला बाबागाडीतून घेऊन गेली. तो प्रकार त्यानं बहुतेक पूर्वी पाहिला नसावा. त्याचं लक्ष माझ्याकडून दुसरीकडं वळलं म्हणून मी आपलं हुश्श केलं. तर स्वारी थोड्यावेळानं आली की परत माझ्याकडेच. पण आता प्रश्नांचा विषय बदलला होता. बाबागाडीबद्दल चौकशी करुन झाल्यावर पाहिलं तर याचा चेहरा गोंधळलेला. मला म्हणाला, 'याचं नाव बाबागाडी का? त्यात तर बाळ बसलंय. मग त्याला बाळगाडी म्हणायला हवं ना?' त्याचं हे निरागस बोलणं ऐकून मला हसूच आलं आणि शंका बरोबर आहे असं मला पण वाटलं. याच्या दंग्याबरोबरच मेंदूत पण असाच दंगा सुरु असणार हे लक्षात आलं. पण आता पुढं काही घडायच्या आत आमची बस आली आणि सगळा गोंधळ उडून गेला. त्यातच त्या मुलाला त्याची आई बखोटीला मारुन कधी गेली ते कळलंच नाही.
      बसमध्ये घुसून जागा मिळून स्थिरस्थावर होईपर्यंत बस स्वारगेट सोडून बरीच पुढे गेली होती. बस उशिरा आल्यानं आधीच सगळे वैतागले होते. आता बाहेरुन आत येणाऱ्या झुळुकेनं थोडे शांतावले. फक्त कंडक्टरचा आवाज येत होता. मी आपली तिकीट काढायची वाट बघत इकडं तिकडं बघत होते. तेव्हढ्यात पुढचे दोन बाक सोडून तिसऱ्या बाकावरुन दोन छोटे डोळे चमकले आणि मग हळूहळू पूर्ण चेहरा उगवला. ते तेच पोरगं तिथं बसलं होतं. काही अवधीतच जागा सोडून तो बसमध्ये फिरायला लागला. आईचा डोळा चुकवून बरा आला असं वाटलं. तर त्याची आई स्वारगेट सोडल्याबरोबर घोरायला लागली होती. बहीण आपली शांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसली होती. पूर्ण बसमध्ये कोण कुठे बसलंय हे त्यानं तपासून घेतलं. तोपर्यंत तिकीटं काढून कंडक्टर जागेवर जाऊन बसले होते. तर ह्यानं आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला. आता त्यांच्यावर भडिमार. अगदी मशीनमधून तिकीट बाहेर कसं येतं इथपासून ते धूम्रपान म्हणजे काय? ग्राईप वॉटरचा रंग कसा असतो? खिसेकापू म्हणजे कोण? हम दो हमारे दो काय असतं? इथपर्यंतचे नाही नाही ते प्रश्न तो त्यांना विचारत राहिला. मुलांना असे प्रश्न पडणं चांगलंच हो. पण त्याला काही अंत असावा की नाही. शेवटी ते कंडक्टर काका वैतागून त्याला म्हणाले आता बडबड बंद कर नाहीतर बसमधून खाली उतरवेन. ही मात्रा मात्र लागू पडली आणि तो मुलगा थोडावेळ का होईना जागेवर जाऊन बसला. तो जागेवर जाऊन बसल्यावर त्याच्या आईची झोपमोड झाली आणि तिनं त्याला उगीचच धपाटा घातला. त्याला बहुतेक या धपाट्यांची सवय असणार. तो आपला आता त्याच्या बहिणीशी बोलू लागला. 
   असं करता करता शिरुर आलं. परत सगळ्यांची गडबड सुरु झाली. खाली उतरण्याच्या गोंधळात त्याची आई त्याला घेऊन कधी उतरुन गेली कळलंच नाही. पण त्या मुलामुळं मला प्रवास कधी संपला ते कळलं नाही. 
   शिरुर स्टॅन्डवर उतरल्यावर रिक्षातून मी माझ्या पत्त्यावर गेले. ती एक छोटी रुम होती आणि तिच्या आजूबाजूला तशीच छोटी छोटी घरं होती. सभोवार नजर टाकून मी मालकांकडे ओळख करुन घ्यायला आणि रुमची किल्ली आणायला गेले. त्यांच्याकडे सगळी चौकशी करुन किल्ली घेऊन आले. थोडी झटपट करुन कुलूप काढलं आणि आत शिरले. सामान लावण्यासाठी माझ्याकडे एकच दिवस होता. उद्यापासून दवाखान्यात जायचं होतं. म्हणून सामानाची कुठे कशी मांडणी करायची हे मनात योजत उभी होते. तर एकदम पाठीमागून येऊन कोणीतरी भो केल्यामुळं दचकून गर्रकन मागं वळले आणि त्याबरोब्बर माझे डोळे आणि तोंड अजूनच मोठं झालं. तोच तो मुलगा मागे उभा होता. त्यानंच बोलून मला त्या धक्क्यातून बाहेर काढलं. सरबत्ती सुरु..तू इथंच राहणार आहेस का, किती दिवस राहणार या प्रश्नांबरोबर स्वतःची पण माहिती दिली. तो चार घरं सोडून पलीकडेच रहात होता. त्याचं नाव परेश आणि बहिणीचं अनुपमा. स्वतःच्या माहितीबरोबर सगळ्या शेजाऱ्यांची पण माहिती त्यानं एका दमात देऊन टाकली. नवीन शेजारी आल्यावर शेजारधर्म म्हणून तो आला असावा बहुतेक. हा आता आपल्याला काम करु देईल का नाही या विचारात असतानाच त्याची ती अनुपमा ताई येऊन त्याला ओढत घेऊन गेली. तात्पुरती तरी माझी सुटका झाली असं वाटलं. पण आता सहा महिने त्याची सोबत सहन करावी लागणार होती. मनाची तशी तयारी करुन मी पुढच्या कामाला लागले.
      दोन-तीन दिवसातच शिरुरमधलं माझं रुटीन ठरुन गेलं. सकाळी 9 वाजता मी दवाखान्यात जायचे. दुपारी दोन वाजता लंच ब्रेक झाला की रुमवर येऊन थोरात काकूंकडून आलेला डबा खाऊन 10 मि विश्रांती घेऊन परत दवाखान्यात जायचे. मग परत यायची वेळ काही नक्की नसायची. पेशंट कधी संपतील त्यावर माझं घरी लवकर वा उशिरा येणं अवलंबून असायचं. शक्यतो आठवड्याचे पहिले तीन दिवस आणि शुक्रवारचा आठवडी बाजाराचा दिवस या दिवशी गर्दी असायची. रविवारी तर सुट्टीच असायची. सकाळी एक राऊंड मारला की बाकी रविवार मोकळाच असायचा. अशावेळी शेजाऱ्यांशी संपर्क होई. पण असं असलं तरी शेजाऱ्यांबद्दलची माझी माहिती अगदी अप टू डेट होती. याचं कारण तुम्ही ओळखलं असेलच. बरोब्बर.. याला कारण परेशच. माझं टाईम टेबल त्याला पाठच झालं होतं. त्यामुळे बरोबर त्यावेळा गाठून तो माझ्या दारात स्वागताला हजर असेच. मग कधी कधी माझ्या पंगतीला त्याचं जेवण पण होई. मी इथं असेपर्यंत त्याची साथ लाभणारच आहे अशी मी मनाची तयारी केल्यानं आताशी मी त्याचा वावर एन्जॉय करु लागले होते. 
    एका रविवारी सकाळी सकाळी तो आला होता माझ्याकडं. मी आळसात उठून चहा बिस्कीट खात बसले होते. आल्या आल्या हात पुढे केला म्हणून दोन बिस्कीटं ठेवली त्यावर. मग परत दोन...पण समाधान काही होईना. डॉक्टरच्या नात्यानं समजावून पाहिलं तरी परत हात पुढंच. म्हणून मग 'आता संपली हं', असं म्हटलं. तर स्वारी काही बोलायच्या आधी पळत रुमच्या मागच्या दारी गेला. गेला त्यापेक्षा जास्त स्पीडनं परत दाखल होऊन केला आपला हात पुढे. मला कळेना की हा पळत जाऊन काय पाहून आला? विचारलं तर पटकन म्हणाला, 'केराच्या बादलीत बिस्किटाचा कागद टाकलेला दिसत नाहीयेस. म्हणजे तुझ्या डब्यात बिस्कीटं आहेत. दे त्यातलं मला' एवढ्याशा मुलाला हे कळतंय पाहून मला एकदम आश्चर्य आणि कौतुक वाटलं. तर असा हा परेश. 
     मी एकटीच रहात असल्यानं माझी रुम म्हणजे शेजारच्या बायकांचं निवांत गप्पा मारण्याचं एक ठिकाणच झालं होतं. सुट्टीदिवशी तर हमखास कोण ना कोण येऊन बसणारच. असंच एका रविवारी दुपारी परेशची आई आणि तिच्या शेजारच्या फल्ले बाई येऊन बसल्या होत्या. अर्थात बरोबर परेश होताच. गप्पा मारता मारता शेजारच्या कुरतडकर काकूंचा विषय निघाला. त्यांच्याबद्दल काय बाय बोलताना दोघीनाही आपला आवाज वाढलेला कळला नाही. त्याची जाणीव करुन दिल्यावर मग परेशची आई म्हणालीच, 'अग्गोबाई..होय कि गं. हळू बोलायला पाहिजे. भिंतीला पण शेवटी कान असतात म्हटलं.' झालं..परेश त्याच्या उद्योगात असला तरी त्याचे कान या दोघींकडेच होते. तो आपला भिंत चाचपडून बारकाईनं बघत होता. काय चाललंय विचारलं तर म्हणाला, 'अगं ताई, भिंतीचे कान शोधतोय गं. एवढ्या मोठ्या भिंतीचे कान केवढे मोठ्ठे असतील नै आणि मग बाकी अवयव शोधायला हवेतच ना. तेच बघतोय'. मी कपाळावर हात मारुन घेतला. तेवढ्यात अनु आईला बोलवायला आली म्हणून मग त्या गप्पा तशाच अर्धवट राहिल्या.
        आता परेशची आणि माझी इतकी दोस्ती झाली होती की, कधी कधी तो माझ्याकडं मुक्कामाला येऊ लागला. पण पठ्ठ्या रात्री जागायला ताठ. कितीही गोष्टी सांगितल्या तरी झोपायचं नाव काढायचा नाही. असाच एका रात्री आला होता. आत्तापर्यंत त्याला राम, कृष्ण, पऱ्या, सिंड्रेला, बिरबल इ. गोष्टीच काय पण रचलेल्या कशाच्या पण गोष्टी सांगून झाल्या होत्या. आता काय सांगावं बरं या विचारात असतानाच श्रावणातल्या कहाण्या आठवल्या. सांगायला सुरुवात केली, 'एक आटपाट नगर होतं बरं का..' झालं...याची सरबत्ती सुरु झाली आणि गोष्ट तिथंच थांबली. आटपाट नगर म्हणजे काय? ते आपल्या शिरुर जवळ आहे का? तिथली लोकं कशी असतात? आटपाट नगरातली लोकं थाटमाटात राहतात का? प्रश्न काही संपेनात आणि गोष्ट त्या नगरात काही शिरेना. शेवटी मलाच झोप आली. त्याला घरी पाठवायची धमकी दिल्यावर मग तोंड बंद करुन निमूट झोपून गेला. तर असा हा परेश.
      तर अशा या परेशबरोबर माझे शिरुरमधले दिवस मजेत जात होते. बघता बघता सहा महिने पूर्ण होऊन माझा पुण्याला परत जायचा दिवस जवळ आला. परेशला तसं सांगितल्यावर बिचारा कावराबावरा झाला. पण तेव्हासुद्धा त्याच्या मेंदूत प्रश्न होतेच. तू का चाललीस? परत कधी येणार? एवढ्याच दिवसांसाठी का आली होतीस? आता मला गोष्टी कोण सांगणार? त्याच्या प्रत्येक प्रश्नाबरोबर माझ्या डोळ्यातून गरम आसवं टपकत होती. मला पण त्याची इतकी सवय झाली होती की, त्याला सोडून जाणं ही कल्पना नक्कीच सुखावह नव्हती. पण काही इलाज नव्हता. रविवारी तो त्याच्या बाबांबरोबर बाहेरगावी गेला होता ती वेळ साधून मी माझं सामान बांधलं. सगळ्या शेजाऱ्यांचा, मालकांचा, थोरात काकूंचा निरोप घेऊन निघाले. स्टँडवर आल्यावर राहून राहून मला सहा महिन्यांपूर्वी  दिसलेला परेश आठवत होता. कितीही बांध घातला तरी डोळ्याच्या कडा ओलावत होत्याच. तेव्हढ्यात एका बसवरची शिरुर-पुणे ही पाटी धुसरपणे दिसली आणि माझा परतीचा प्रवास सुरु झाला. पुढचे दोन बाक सोडून तिसऱ्या बाकावरुन परत तेच छोटे डोळे चमकतील या आशेनं मी त्या बाकाकडं टक लावून बघत बसले होते. तिथं काही ते डोळे चमकले नाहीत पण मनात मात्र 'लहानपण दे गा देवा' या गाण्याच्या ओळी चमकून गेल्या.

जस्मिन जोगळेकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक