अपेक्षा

एक दिवस एका मित्राने fb वरच्या एका ग्रुप बद्दल माहिती दिली. बरेचजण छान लिहिणारे होते त्यात, सगळ्यांना लिहितं करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम तिथे admin कडून राबविले जायचे. हे सगळं ऐकल्यावर शिरले त्यात मी ही. जेव्हा जॉईन झाले तेव्हा 'काव्यपूर्ती' म्हणून उपक्रम सुरु होता. दोन गट होते त्यात. एक वृत्तबद्ध कविता आणि दुसरा मुक्तछंद. तेव्हा कवितेकडे फारसा कल नव्हता. म्हणजे कधीतरी लिहायचे तशी. पण ती म्हणजे ट ला ट टाईप. वृत्तबद्धची मनात साशंकता होती. त्याच्या नियमात बसेल असं लिहिता की येईल की नाही वाटायचं आणि परत आपण लिहिलेलं समोरच्याला वाचताना कसं वाटेल हा मुद्दाही होताच. त्यामुळे मी आपली मुक्तछंदासाठी दिलेली ओळ घेऊन माझी कल्पना मांडत होते. एकदोनदा माझ्या रचनेचं कौतुक झालं. एकदा तर नंबरही आला. मग काय..याड लागलं..उपक्रम देणाऱ्या admin ताई कडून सारख्या वेगवेगळ्या ओळी घेऊन लिहू लागले. मस्त मजा होती त्यात. डोक्याला खुराक..


मग परत एकदा त्याच मित्राकडून वृत्तबद्ध कवितेसंबंधी whatsapp वर एक ग्रुप आहे कळलं. पटकन त्यात जायचं धाडस झालं नाही. पण मग विचार करता असं वाटलं की, शिकायला काय हरकत आहे. जमलं तर उत्तम नाहीतर काय कोण फासावर तर लटकवणार नाही. म्हणून मग तोही ग्रुप जॉईन केला. 'गोदतीर्थ' नाव त्याचं. त्यात गेले आणि आता आधीच्या शंका विसरुन रमून गेले की. वेगवेगळी वृत्त, त्याची माहिती, उदाहरणं, इतरांच्या त्यातल्या सुंदर रचना वाचत मी ही लिहीत गेले. अर्थात त्यात खूप छान लिहिता येतंय असं मी कधीच म्हणणार नाही. पण ट ला ट वरुन तरी प्रगती झाली आहे. आणि आवडायलाही लागलं आहे ते सगळं. 


अधूनमधून मी लिहिलेल्या दोन्ही प्रकारातल्या कविता इथे शेअर करत जाईन. असा विचार तरी आहे. तुमचा अभिप्राय नक्की द्या. एवढीच अपेक्षा.. 🙏😊


वृत्त–लवंगलता ८ ८ ८ ४


नको दागिने नको कापडे सोस कशाचा नाही

बागेमधल्या चाफ्यावर बस फुले फुलावी काही

आस मनाची ही छोटीशी पुरेल माझ्या जेव्हा

विश्वामधली तृप्त मनाची असेन पहिली तेव्हा


पाट पंगती गोडधोडही नको वाटते काही

पोटापुरते मिळता सारे हाव कशाची नाही 

समृद्धीची ग्रंथसंपदा पडेल हाती जेव्हा

विश्वामधली ज्ञानपिपासू असेन पहिली तेव्हा


नोकर चाकर गाडी घोडे नको बंगला मोठा

हवा वाटतो कायम सोबत आप्तजनांचा साठा

अबोल असता गूज मनीचे कळेल त्यांना जेव्हा

विश्वामधली धनवंत अशी असेन पहिली तेव्हा


नाही मांडत गतकाळाचा समोर लेखाजोखा

कळला एकच मंत्र मला हा आयुष्याचा सोपा

पैश्यामागे नको धावणे अंती पाट्या कोऱ्या

समाधान हे शाश्वत असते विश्वामध्ये साऱ्या


धावपळीचा रहाट फिरता बंद करावा आता

खूप सोसल्या जीवनात या झंझावाती लाटा

तरून आले आज अशा या प्रसन्न टप्प्यावरती

सुखशांतीचा हाच वारसा देते पुढल्या हाती 


जस्मिन जोगळेकर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक