मनातलं काही
सध्या आपण सगळेच किती कठीण परिस्थितीतून जात आहोत. कोविडने जगभर थैमान घातलंय. या परिस्थितीचा मानसिक त्रास होऊ नये म्हणून त्याचा विचार कितीही करायचा नाही ठरवलं, पेपरमधल्या बातम्या आणि टीव्हीवरच्या बातम्या वाचल्या ऐकल्या नाहीत तरी काही ना काही कारणामुळे हा विषय समोर येतोच आणि त्याला काही इलाजही नाही. मग कधीतरी मनातले विचार उसळी मारुन कोणत्या ना कोणत्या स्वरुपात बाहेर येतात.
मग याच काळात एकदा 'तुला सोडून जाताना' ही ओळ लिहिण्यासाठी म्हणून समोर आली. आता ही ओळ पटकन वाचल्यावर कितीतरी कल्पना कवितेसाठी तरळून जातील. पण माझ्या मनातला कोविडचा विषय या ओळीमुळे असा बाहेर आला..
तुला सोडून जाताना
बघ...कळलंही नाही तुला
कधी, कसा शिरलो तुझ्या घरात..
एक अनाहूत पाहुणा म्हणून..
मांजरपावलाने..तुझ्या नकळत.
कळलं तुला ते ही तसं उशिराच..
मीच माझं अस्तित्त्व दाखवून दिल्यावर
किती तारांबळ उडाली ना तुझी!
सोबत तुझ्या घरच्यांचीही.
भय, काळजी, शंका..
सगळ्या संमिश्र भावना
दाटून आल्या होत्या एकाचवेळी.
पण सावरलंस लवकरच स्वतः ला
चालू केलीस धडपड लगेच..
उमटू नयेत घरभर तुझ्या,
माझ्या पाऊलखुणा म्हणून.
जोरदार मारा करत होतीस...
कोणाकोणाच्या सल्ल्याने.
झेपत नव्हता मलाही..
असा तुझा पाहुणचार.
पण मी ही चिवट..
तुझ्यासारखाच...
बघूया म्हटलं कोण हरतंय
आणि कोण जिंकतंय
या लढाईत!
निमूट गिळत राहिलो..
तू दिलेलं सगळं..आवडत नसलं तरी..
त्याला प्रत्युत्तर म्हणून..
काय काय केलं मी ही..
देता येईल तितका त्रास दिला,
एकटं पाडलं तुला सगळ्यांपासून..
पारखं केलं तुला मायेच्या स्पर्शापासून..
थोडथोडकं नव्हे..
तब्बल चौदा दिवस मोजून.
लढा चालूच होता आपला दोघांचा.
पण..पण किती फरक होता
तुझ्या माझ्या लढ्यात!
माझा लढा होता.. फक्त तुझ्याशी,
आणि तुझा..माझ्याशी तर होताच..
सोबत मनात येऊ पाहणाऱ्या नैराश्याशी!
हा दुसरा लढा जिंकलीस ना जेव्हा..
मात केलीस तू माझ्यावर तेव्हा.
कबूल करतो आता मी..
आहेस तू चिवट.
जेवढा आत्मविश्वास होता मला
तुझ्या घरात शिरताना..
गमावून बसलोय सर्वस्व माझं
तुला सोडून जाताना..
तुला सोडून जाताना.
मनातलं बोलून मन मोकळं होतं तसं हे लिहून माझंही थोडं मोकळं झालं. थोडं अशासाठी म्हणतेय कारण मूळ विषय तर संपला नव्हताच ना! उलट आणखी भयानक रुपात समोर आला. आपल्या देशात वर्षभरात वेगवेगळ्या कारणांनी कितीतरी लोकं मृत्यमुखी पडत असतात. पण यावेळची स्थिती खूपच कठीण आहे. अशावेळी स्वतःला सारखं कशात तरी गुंतवून घेणं फायद्याचं. डोक्यात कविता हाही विषय. मग परत तेच विचार असे व्यक्त झाले.
जगी काल सारे प्रवाहीच होते कसा ओघ आता
इथे थांबला
कळेना कसे चांदणे खिन्न झाले कसा काय वारा कुणी रोखला
अकस्मात आता उफाळून आला तमातून भेसूर हा गारवा
जिथे प्राक्तनाला नसे तोड काही तिथे संयमाचा किनारा हवा
अहंकार जागा मनाने भिकारी शहाणा असे 'मी' अशी वल्गना
जशा साहवे ना व्यथावेदना या गळू लागली बेगडी भावना
जगाला किती घोर लागून गेला करू जीवनातील वर्षे वजा
टळावे कसे भोग हे सांग देवा चुकीची मिळाली विखारी सजा
लपेटून सारा असा देह येता उरी भंगलेल्या मुखी शांतता
नसे लागले त्यास ते चार खांदे तरीही तिथे पेट घेते चिता
अशा काळराती न साथीस कोणी स्मशानी फुटे एकटा हुंदका
जशी रांग लागे अवेळी शवांची तसा होतसे प्राणवायू मुका
पुढे चालले हे विषाचेच प्यादे शरीरात ठेऊन मागे खुणा
कशाला हवी हाव मोठेपणाची जरा सोड ना हा तुझा 'मी'पणा
अशी व्यर्थ मी-तू पणाची विनाशी लढाई दुभंगून नेई मना
कळालेच नाही कधी अन कसा हा वसंतात झाला बहावा सुना
(सुमंदारमाला)
आता हे वाचल्यावर हा धीर सुटलेला विचार वाटूही शकेल. पण तसं काही नाही. दोन्ही बाजू कधी न कधी पुढे येत राहणारच. सगळ्या प्रसंगात सकारात्मक राहणं जमायला हवं हे खरं. पण विचारांची साखळी डोक्यात नकळत आणखी कड्या जोडत राहतच असते. मग वाटलं आधी जे मुक्तछंदात लिहिलं होतं तो विचार वृत्तात जमतंय का बघावं. म्हणून हा प्रयत्न..
कसे काय जाणे कळालेच नाही कधी हा अनाहूत आला घरी
खुणा पावलांच्या दिसू लागल्या त्या तशी जाहले कावरी बावरी
किती भ्यायले मी मनातून माझ्या तरी द्यायचा ठाम होता लढा
कसा घालवावा कळेना मलाही मनाच्या अघोरी भितीला तडा
किती ही निराशा छळे का उदासी कळेना मनी होत गेले द्विधा
अनाहूत त्या पाहुण्यानेच नेली घरातून ही सौख्य शांती क्षुधा
तरीही मनातून विश्वास जागा न शंका कधी घेतल्या मी उगा
उभारी सग्यांची तनाला मिळाली तसा आसरा ना दुजा हा उभा
किती संकटेही जरी येत गेली तरीही अबाधीत ठेऊ मती
कशाला उगा यातना या मनाला करू योग्य आत्ताच काही कृती
नवे साल येईल घेऊन आशा सुगंधीत वाहेल वारा नवा
नको संकटांची मनी फार भीती नवे वर्ष आणी सुखाची हवा
(सुमंदारमाला)
कितीही काहीही म्हटलं तरी या भयंकर परिस्थितीला आपल्याला तोंड द्यायचं आहेच. निराश न होता, धीर न सोडता जर सगळे नियम काटेकोरपणे पाळले, लस घेतली तर नक्कीच आपण यातून बाहेर पडू शकतो.
तेव्हा काळजी करु नका पण नीट काळजी घ्या.
जस्मिन जोगळेकर
खूप छान
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद!
हटवा