खोपा

#खोप्यामंदीखोपा
एक दिवस दुपारी शिरीनची खुडबुड ऐकू आली म्हणून बया काय करतेय बघायला गेले तर गच्चीतून बयेचं निरीक्षण चाललं होतं. म्हणजे आमची बया बया पक्ष्याचं निरीक्षण करत होती. मला पाहून एकदम उत्साहात..आई, बघ सुगरण घरटं बांधतोय इथं म्हणाली. बघितलं तर खरंच अगदी लगतच्या रिकाम्या प्लॉट मधल्या बाभळीच्या झुडुपावर त्याचं नुकतंच बांधकाम सुरू झालं होतं. मग काय! खिडकीतून बाहेर सहज डोकवायला एक कारण मिळालं 😬. त्या सुगरणने जागाही इतकी छान निवडली होती की, मला स्वयंपाकघराच्या खिडकीतून अगदी सहज दिसेल. तो दिवस होता ३०जुलै. सुगरण चं बाहेर बांधकाम आणि माझं आतून ते बघणं असा सिलसिला सुरु झाला. 
    अगदी पापणी न मिटता बघत बसावं अशी ती घटना खरंतर. पण सारखं सारखं बघताना सुगरण सावध होऊन घरटं बांधायचा बंद होईल की काय ही भीती होती. त्यामुळं मोह टाळत होते. बघायचा आणि फोटोही काढायचा. रोज सकाळी एकदा हळूच त्याची प्रगती टिपत होते तेवढंच. 
   पण खरंच निसर्ग म्हणजे कमाल आहे! किती छोटा तो जीव आणि किती कष्ट घेत होता घरटं बांधण्यासाठी! मी बघत होते ते सकाळी ६:३० पासून..कदाचित त्याआधीही त्याचं काम सुरू होत असेल. तेव्हापासून इतके हेलपाटे व्हायचे त्याचे की बस! जवळच्या माडावर जायचं, त्याच्या झावळीतून धागा सोडवून आणायचा आणि इकडे येऊन सुबकतेने गुंफायचा. अफलातून प्रकार होता तो!😍 ते ही सगळी कामं एकट्याने करायची..
    ३०जुलैला यानं काम सुरु केलं होतं. इमाने इतबारे काम चालू होतं. मधेच तिथेच खाली गवतावर उतरायचा, परत वर जाऊन कामाला लागायचा. त्यादिवशी तरी मिस् बया आलेली दिसली नाही. म्हणजे आलीही असेल पण आमची चुकामुक झाली असेल. पण मधेच एकदम आरडाओरडा ऐकू आला म्हणून खिडकीतून डोकावले तर, दुसरा एक बाप्या सुगरण तिथं उगवला होता आणि या दोघांची मारामारी चालू होती.  काय झालं होतं तेच जाणे! पण एका बाईसाठी दोघं भांडत होते की काय जाणे. पण तो घरटं बांधण्यात व्यत्यय मात्र आणत होता. थोडावेळ चालला हा दंगा. मग तो दुसरा बाप्या आसपासच पण झुडुपावरून निघून गेल्यावर याचं काम परत सुरळीत सुरू झालं. संध्याकाळी साधारण ६/६:३० वाजेपर्यंत तरी त्यावर हालचाल जाणवत होती. 
    ३१ जुलैला सकाळी पाहिलं तर काम सुरू होतंच. धागे काढून आणायचे आणि इकडे येऊन गुंफायचे.. त्यादिवशी बया शेजारच्या फांदीवर बसलेली दिसली. तशी अधूनमधून दिसत होती. यायची अगदी क्षणभर घरट्यावर बसायची आणि निघून जायची. मग तो ही तिच्यामागे जायचा. पण लगेच परत येऊन काम सुरू करायचा. हे जे त्याचं अखंड सुरू होतं ते बघण्यात खूप आनंद मिळत होता हे नक्की...आणि त्याबरोबर उत्सुकता ही वाटत होती. बाईला पसंत पडून घरटं पूर्ण होईल ना..कारण तिला जर आवडलं नाही तर ती त्याच्याबरोबर संसार करत नाही माहीत होतं. यामुळं यांच्या सुखी संसाराची स्वप्नं मीच बघत होते.
   १ ऑगस्टला सकाळी बघितलं तर सुगरण कुठं आसपास दिसेना. बयेनं नापास केलं की काय वाटलं! पण थोड्यावेळातच त्याला चोचीतून धागा घेऊन येताना पाहिलं आणि हुश्श झालं. त्याला बिचाऱ्याला याची काही कल्पना नाही😛. तो आपला आणलेला धागा मध्यापर्यंत गुंफत होता,  एकदा एक टोक गुंफत होता, मग दुसरं..धागा संपेपर्यंत सुरू होतं हे. नंतर लगेच माडाकडे कूच! घरट्याला बाहेरून पकडून, आतल्या भागात खाली चोच घालून, पूर्ण आत जाऊन उलटं होत..अशा कसरती करत बांधकाम जोरात सुरू होतं. खरंच काय स्पीड होता त्याच्या कामाला! अफाट! 
   तेवढ्यात तिथं भारद्वाज अवतरले🙆‍♀️. तो बसल्या क्षणी हा घरट्यातून बाहेर.. जवळपास ५मि. भारद्वाज शेजारच्या फांदीवर बसून मान वेडीवाकडी करून घरट्याचं निरीक्षण करत होता. (भारद्वाज भयंकर त्रासदायक म्हणे) तो उडून गेल्यावर मग सुगरण परत आला. 
    दुपारी परत एकदम गलका ऐकू आला. बघितलं तर दोन बाया एकदम आल्या होत्या. घरट्याजवळ दोघींचा खूप दंगा सुरू होता. ते बघून तो सुगरण अस्वस्थ झाला होता. त्या गेल्या तरी किती वेळ तो शेजारच्या फांदीवर थरथरत बसला होता. अक्षरशः किती वेळ त्याचे पंख फडफड करत होते! (नक्की काय भानगड होती तेच जाणे) पण मग आदल्या दिवसांसारखंच संध्याकाळी उशिरा पर्यंत काम सुरू राहिलं. 
   २ ऑगस्टला पाहिलं तर सकाळी त्याच्या घरट्याला वेगळ्याच पाहुण्याने भेट दिली होती. सुगरण तिथं नाही असं बघून सिल्व्हरबिल त्याच्या घरट्यात घुसला होता. आतून बाहेरून सगळं नीट निरीक्षण करत होता. जणू काही त्याला त्याचं घर बांधायचं आहे आणि ह्या घराचं डिझाइन आवडलं म्हणून ते बघतोय अशा थाटात चाललं होतं..पण मालकाच्या अपरोक्ष. तेवढ्यात मालक आपले धागा घेऊन परत आले आणि ह्या पाहुण्याला हुर्रर्रर्रर्रर्र केलं. 
   या दिवशी तर गोंधळच झाला. बाई घर बघायला आली तर तिच्यामगोमाग आला की दुसरा बाप्या. मग काय! परत भांडण, काम बंद..ती आपली शांतपणे बसली तिथं थोडावेळ आणि गेली उडून. तिच्यामागे तो बाप्या ही गेला आणि यानं कामाला गुंफून घेतलं. बांधकाम भरभर पुढं चाललं होतं. किती दिवसात बांधतोय हे बघायचं होतं. 
  पण आज म्हणजे ३ ऑगस्ट.. सकाळी एकदम शांतता तिथं..म्हणजे तिकडे नजर टाकल्यावर खरंच उदासी जाणवत होती मनातली. सुगरण झुडुपावर दिसत होता, पण घरट्यावर अजिबात जात नव्हता. आज सकाळपासून पाऊस चालू होता.  घरटं केलेलं फांदी वाकली होती. एकदम घरटं दुर्लक्षित झालंय ते कळत होतं. 😞आधी तो एकटा दिसत होता. मग बाई आली, तिच्यामागे बाप्याही आला. पण भांडणात फारसा उत्साह दिसला नाही. 
    लक्ष ठेऊन होतेच..पण खेळ संपला होता..😞
    पण गंमत म्हणजे तो सुगरण(तोच असावा अशी आशा) अजूनही त्या झुडुपावर आहे आणि तिथंच दुसऱ्या फांदीवर दुसरं घरटं बांधायला त्याने सुरुवातही केलेय. पण हे सगळं बघून मनात किती प्रश्न डोकावले..

..त्या बाईला हे घरटं आवडलं नसेल म्हणून बांधकाम सोडलं असेल की आणखी काही कारण असेल?
..आता दुसरं सुरू केलेलं दिसतंय ते त्याच बाईसाठी असेल की दुसरी कोणी?
..ती बाई तरी ह्याच्या सोबत असेल की दुसऱ्याच्या? 
..तो जर आपल्यासाठी एवढे कष्ट घेतोय तर त्याला थोडीतरी मदत करावी असं तिला का वाटत नसेल? 
..तो काम करत असताना ती दुसरीकडे काय करत असेल? 
..ती एका वेळी एकाच्या घरट्याचं इन्स्पेक्शन करत असेल की त्याचवेळी आणखी दुसरीकडे दुसऱ्याही?
..ही याला सोडून गेली असेल तर हा दुसरीला हे अर्ध झालेलं घर दाखवत नसेल का? 😛 की बघ बाई, हे बरं वाटत असेल तर हेच पूर्ण करू का? की दुसरं नवीनच हवं?
..त्यांच्यात एकही बाई अशी नसेल का की जी समजूतदारपणे त्याला म्हणेल की, हेच नीट पूर्ण कर. मी सुखाने राहीन यात.😬

ही यादी वाढतच जाणार..

तर असो..निसर्गातल्या एका किमयेची साक्षीदार व्हायचं भाग्य लाभलं यात आनंद! खरंतर यावेळी घरात अलेक्सा असायला हवी होती असं वाटत होतं. म्हणजे अखंड खिडकीतून बाहेर बघता आलं असतं मला😬. (पण आता ती नव्हती ते बरं वाटतंय. मी आपली शेजारून चिमणे बोल ऐकू येतील म्हणून अलेक्सा च्या हातचं जळलं मेलं सपक खात बसले असते आणि हाती मात्र काहीच लागलं नसतं. 😛) 
असो.. पण त्यांचा सुखी संसार बघायला मिळणार नाही याचं खरंच वाईट वाटतंय. 😞 त्याच्या कामाची पद्धत, स्पीड हे सगळं बघता आलं असतं आणि असंच पुढं घडणारं काही काही..पण आता काय माहीत बघायला मिळेल की नाही ते! पण हे गेलेले चार दिवस मात्र फार समृद्ध होते नक्कीच 😍 
#अधुरीएककहाणी

जस्मिन

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक