नक्षत्रबाग - १
#नक्षत्रबाग
१) अश्विनी - २७ नक्षत्रांची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते. सूर्याचा या नक्षत्रात प्रवेश म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होय. या नक्षत्रासंबंधी एक कथा आहे. ती अशी.. मधुविद्या (मृताला जिवंत करणारी) अशी विद्या दधिची ऋषींना येत होती. अश्विनीकुमार यांना ही विद्या शिकून घ्यायची होती. पण इंद्राला ते मान्य नव्हतं. म्हणून त्याने दधिची ऋषींना सांगितलं की, जर त्यांनी ही विद्या अश्विनीकुमारांना शिकवली तर तुमचा शिरच्छेद करण्यात येईल. मग अश्विनीकुमारांनी अशी योजना केली की, दधिची ऋषींनी आधीच स्वतःचा शिरच्छेद करावा आणि तेथे घोड्याचे डोके बसवावे. विद्या शिकवल्यावर शिरच्छेद केला की मूळ डोके बसवावे. या योजनेप्रमाणे सर्व पार पडलं. अश्विनीकुमार ती विद्या शिकले. त्यांच्या नावावरुन या नक्षत्राला अश्विनी हे नाव पडले असावे असे मानतात.
ग्रीक पुराणात पण एक कथा आहे. त्यांनी या समूहाला एरिस म्हणजे मेंढा हे नाव दिलंय. ती कथा अशी.. थेबीसचा राजा अस्थमसला फ्रिक्सर आणि हेले अशी दोन मुलं होती.त्यांची सावत्र आई इनो त्यांचा छळ करायची. या मुलांना ती ठार मारणार आहे अशी खबर देवांचा दूत मर्क्युरीला मिळते. या मुलांना वाचवण्यासाठी तो एक सोनेरी केसांचा मेंढा पाठवतो. मुलांना घेऊन तो आकाशात उडतो. पण वाटेत समुद्रावरून येताना हेलेची पकड सैल होते आणि तो खाली पडतो. फ्रिक्सर काळ्या समुद्रकिनारी नीट उतरतो. सुटका केल्याबद्दल फ्रिक्सर देवांचे आभार म्हणून मेंढ्याचा बळी देतो आणि त्याची सोनेरी लोकर तिथल्या राजाला भेट देतो. त्या बळी गेलेल्या मेंढ्याची ही मेष रास.
अश्विनी नक्षत्रात तीन ठळक तारे येतात. या समुहातले बाकी तारे मंद आहेत.
अश्विनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे कुचला. (Strychnos nux-vomica)
कुचला - कुचला हे पहाडी क्षेत्रात येणारं झाड. याचं फळ नारिंगी रंगाचं, गोल आणि मऊ असतं. फळाचं बी फार विषारी असतं. त्यालाच कुचला म्हणतात. हे बी आधी शुद्ध करून घ्यावं लागतं. तुपावर हलकं तळून, त्याचं कवच काढून मग ते गायीच्या मूत्रात उकळायचं. उकळल्यावर ते शुद्ध होतं आणि मग त्याचा औषध म्हणून उपयोग होतो. दुसरी पद्धत म्हणजे ते सात दिवस गायीच्या मूत्रात भिजवून ठेवायचं. सकाळ-संध्याकाळ मूत्र बदलत रहायचं. ते बी मऊ झाल्यावर त्याचं कवच काढायचं. म्हणजे ते शुद्ध होतं. हे विषारी असल्यानं जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर अपायकारक असतं. पण योग्य प्रमाणात घेतलं तर बऱ्याच रोगांवर औषधी आहे. जसं की, विंचू ,कुत्रा चावला तर किंवा उंदीर मारायला हे औषध वापरतात. पचनशक्ती कमी असेल तर कुचल्याचं औषध वापरतात. प्रसववेदना कमी करणे, मधुमेह, ट्युमर यावर पण हे औषध गुणकारी आहे.
पॉइझन नट या नावानेच ते ओळखले जाते. पहाडी भागात धोबी कपड्यांवर खूण किंवा ओळख म्हणून कुचल्याच्या रसाचा उपयोग करतात. कपड्यावर हे इतकं पक्कं बसतं की, कशानेही धुतलं तरी जात नाही. पण याचा रस जर त्वचेला लागला किंवा रस उकळताना ती वाफ जरी अंगावर आली तरी तिथं पाण्याचे फोड येतात. होमियोपॅथीत पण याचा उपयोग करतात.
२) भरणी - अश्विनी नक्षत्रानंतर येणारं दुसरं नक्षत्र म्हणजे भरणी. अश्विनीप्रमाणेच भरणीचेसुद्धा तीन तारे आहेत. या तीन ताऱ्यांचा एक छोटा त्रिकोण आकाशात दिसून येतो. या त्रिकोणावरुनच पश्चिमात्यांनी भरणीला 'ट्रँग्युलम' हे नाव दिलंय.
मंडळी, या नक्षत्राबद्दल फार माहिती कुठं सापडत नाही. किंवा यांच्याबद्दल काही कथाही नाही.
पण भरणी नक्षत्र अशुभ असल्याचं आपल्याकडं मानलं जातं. या नक्षत्राचा यमाशी संबंध जोडला आहे. कारण काय ते माहीत नाही.
भरणीचा आराध्यवृक्ष आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचा आवळा.
आवळा - याबद्दल आपल्या सर्वांना माहिती असेलच. याचे औषधी उपयोग खूप आहेत.
आवळ्याची फळं तयार झाल्यानंतर ती औषधात वापरतात. कार्तिक शुद्ध नवमीला आवळीपूजन करून आवळा वापरतात. या महिन्यात काढलेल्या आवळ्यात 'क' जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते.
आवळा पोटात घेतलेला जसा चांगला तसेच त्याचे बाह्य उपयोग पण आहेत. आवळ्यानं कांती छान होते, त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत, केसांसाठी तर उत्तमच.
आवळ्याची लागवड करणं शेतकऱ्याला पण फायदेशीर ठरते. एकतर या झाडांना पाणी कमी लागतं आणि त्यामानानं संगोपन पण कमी. शिवाय पीक भरपूर येतं आणि बाजारपेठेतली मागणी तर न संपणारीच.
३) कृत्तिका - रात्रीच्या दाट अंधारात जर आकाशात पाहिलं तर कृत्तिकेचा एक छोटा पुंजका दिसतो. कार्तिक महिन्यात उगवून, पूर्ण रात्र जागवून सकाळी या कृत्तिका मावळतात. नुसत्या डोळ्यांनी पाहिलं तर यात सात तारे दिसतात. पूर्वीच्या काळी 'विश्वाचा गाभा' म्हणून हा पुंजका ओळखला जाई. वेगवेगळ्या देशात त्यांचा वेगवेगळा संदर्भ लावतात. वैदिक काळात आर्यांनी त्यांना 'सप्त मातृका' म्हटलं आहे. या सात ताऱ्यांना पण वेगवेगळी नावं आहेत. अंबा, दुला, निततनी, अभ्रयंती, मेधयंती, वर्षयंती आणि चुपुणीका अशा या सप्त मातृका.
पण हा पुंजका जर दुर्बिणीतून बघितला तर इथं असंख्य ताऱ्यांचा गोतावळा दिसतो. म्हणजे शेकडो सूर्यकुलांना सामावू शकतील एवढा त्यांचा पसारा आहे. आपला सूर्यसुद्धा छोटा असे तेजस्वी तारे यात आहेत.
कृत्तिकेचा आराध्यवृक्ष आहे उंबर.
उंबर - सर्वांच्या परिचयाचं हे झाड उंबर किंवा औदुंबर. हे झाड भारत, श्रीलंका, म्यानमार इथं आढळतं. उंबराचं फळ म्हणजे नर, मादी, नपुसंक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यावर ही फुलं दिसतात. इतर झाडांसारखं आधी फुल मग फळ असं उंबरात नसतं. उंबराचं दुर्मिळ फुल म्हणून सोशल मीडियावर फिरणारा फोटो सगळ्यांनी पाहिला असेल. पण याचं फळ हेच फुल आहे. वड, पिंपळ, अंजीर हीसुद्धा या वर्गातलीच. उंबराचं फळ नीट पाहिल्यास त्यात एक चिलटाएवढा कीटक दिसतो. हे फळ आणि कीटक परस्पर सामंजस्याने राहतात. यातूनच किटकाचे प्रजनन आणि उंबराचं परागीकरण होत असतं.
दत्ताचं स्थान म्हणून हे झाड आपण पवित्र मानतो. गार सावलीच्या या झाडापाशी जमिनीत पाणी लागतं असं म्हणतात. याचं लाकूड पाण्यात टिकतं. म्हणून दाराच्या चौकटीत याचा उंबरा बनवतात. झाड खरवडल्यावर जो चीक येतो तो शीतगुणांचा म्हणून औषधी असतो.
जस्मिन जोगळेकर
या नक्षत्रांचे फोटो पण दिले तर उत्तम
उत्तर द्याहटवाकल्पना छान आहे.👍 बघते मिळाले तर देईन नक्की 😊
हटवा