नक्षत्रबाग - २
#नक्षत्रबाग
४) रोहिणी - कृत्तिकेनंतर येते ती रोहिणी. ही तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीची. आकाशात पाहिलं तर रोहिणीचा एक ठसठशीत तारा दिसून येतो. आपल्याकडं कशा मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स असतात तशी ही रोहिणी म्हणजे आकाशातली लावण्यसुंदरी. दिसण्यात थोडी लालसर झाक असलेली. सगळ्यांसमोर चंद्र तिला मिठी मारतो, कधी तिला दृष्ट लागू नये म्हणून आपल्यामागे लपवतो. रोहिणीशी त्याची विशेष गट्टी. कदाचित म्हणूनच लाजेनं चूर झालेल्या रोहिणीच्या गालावरची लाली म्हणून तिच्यात लालसर झाक दिसत असावी. पण रोहिणीच्या ताऱ्याचे तापमान जवळजवळ २०००° आहे त्यामुळं तो लाल रंगाचा दिसतो. वृषभ राशीत येणारे हे नक्षत्र बैलाच्या डोळ्याचे स्थान दर्शवते. या नक्षत्रावर जन्मलेल्या मुली गोऱ्या गोमट्या आणि कलाचतुर असतात असं म्हणतात.
रोहिणीचा आराध्यवृक्ष आहे जांभूळ.
जांभूळ - जांभूळ हे दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात येणारे आपल्या ओळखीचे झाड.
जांभूळ हे मधुमेहावर गुणकारी आहे. याचा रस आणि बी ची पावडर औषधी असते. जांभूळ रक्तशुद्ध करतं, पाचक आहे. जांभूळ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ नियमित खाल्ल्यास यकृत मजबूत होतं. मूत्रपिंडाचे आजार होत नाहीत. केस मजबूत, लांबसडक होतात. जांभळात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.
याचं पूर्वीचं नाव जम्बु किंवा राजजम्बु. पुराणात, रामायण, महाभारतात याचे उल्लेख आढळतात. या वृक्षामुळे या द्वीपकल्पाचे नाव जम्बुद्वीप पडले असावे. महाभारतात असा उल्लेख आहे म्हणे.
प्राणी-पक्ष्यांना हे झाड आवडत असल्यानं फुलांचं परागण, बियांचे पसरणे, पुनरुज्जीवन इथं सहज घडतं. याच्या पानावर टसर सिल्कचे किडे छान पोसले जातात.
५) मृगशीर्ष - मार्गशीर्ष महिन्यात मृग नक्षत्र आकाशात पूर्ण रात्र दिसतं. म्हणूनच या महिन्याचं नाव मार्गशीर्ष. मृग नक्षत्र आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे एकदम मनोहर भाग आहे. तो परिसर पाहून एखादा कवी मनाचा म्हणेल, 'एखाद्या अप्सरेच्या गळ्यातला रत्नहार तुटून त्यातल्या तन्मण्यासह सगळी रत्न विखरून पडली आहेत. ती वेचून गुंफण्यापेक्षा अशीच विखुरलेली रत्न पाहण्यात किती आनंद आहे.' तर असं हे मृग नक्षत्र. वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांनी आकाशातल्या तारकांविषयी वेगवेगळ्या कथा केल्या आहेत. त्यात मृगाचा नंबर पहिला. आपल्याला माहीत असलेली व्याध, त्यानं मारलेला बाण ही त्यातलीच एक कथा. प्रजापती आपलीच कन्या रोहिणीच्या रुपावर भाळला. त्याच्या या अयोग्य वागण्याने सगळे संतापले. रुद्र त्याच्यावर धावून गेला. रुद्राला घाबरून प्रजापतीने मृगाचे रूप घेतले आणि तो उंच आकाशात गेला. मग रुद्राने व्याधाचे रूप घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी धावताना मृग एकदम उत्तरेकडे वळला. तेव्हाच व्याधाने मारलेला बाण त्याला लागला. उन्हाळ्यात आकाशात हे नक्षत्र पाहिलं तर मृगाचं तोंड उत्तरेकडे दिसतं.
ग्रीक कथेत ओरायन नावाचा शिकारी आणि व्याध म्हणजे त्याचा कुत्रा असा उल्लेख आहे. ओरायनला कीर्तीचा गर्व झाल्यामुळं त्याला शिक्षा म्हणून देव त्याच्यावर विंचू सोडतो. त्याचा दंशाने ओरायनचा मृत्यू होतो. या विंचवाला ओरायनपासून दूर विरुद्ध दिशेला आकाशात स्थान दिलंय. तीच वृश्चिक रास.
मृगाच्या शेजारीच एक लहान-मोठ्या ताऱ्यांचा पुंजका आणि पांढऱ्या वायूने भरलेला भाग दिसतो. त्याला ओरायन नेब्युला म्हणतात. इथं ताऱ्यांचा जन्म होतो.
मृगाचा आराध्यवृक्ष आहे खैर.
खैर - हा पानझडी काटेरी वृक्ष. खैराचं लाकूड कठीण आणि टिकाऊ असतं. त्यामुळं याचा बऱ्याच ठिकाणी वापर करतात. लाकडी खांब, हत्यारे, होड्या यापासून बनवतात.
याचे औषधी उपयोग पण आहेत. कात खैरापासूनच बनवतात. या काताचा औषध म्हणून बऱ्याच आजारात उपयोग होतो. खैराच्या बियांत मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात.
६) आर्द्रा - सहावं नक्षत्र आर्द्रा. आर्द्रा म्हणजे ओली. सूर्य आर्द्रा नक्षत्रात आल्यावर पाऊस सुरू होतो. थोडं रौद्र नक्षत्र असं याला म्हणतात. रुद्राचे म्हणून रौद्र नक्षत्र म्हणत असावेत.
आकाशात याच्या आजूबाजूला बरेच तारे असल्यामुळं हे नक्षत्र सहज सापडत नाही.
आदिवासी लोक या नक्षत्राला 'आडदरा' म्हणतात. कारण उन्हाळ्यात उघडे पडलेले डोंगर दऱ्या आर्द्रा च्या पावसामुळं हिरव्यागार होतात. हिरव्या पालवीने ते नजरेआड होतात म्हणून बहुतेक ते आडदरा म्हणत असावेत.
याचा आराध्यवृक्ष आहे कृष्णगुरु.
कृष्णगुरु - दुर्मिळ होत चाललेला हा एक वृक्ष. कृष्णगुरु किंवा अगरुला इंग्रजीत ईगलवूड म्हणतात. हा वृक्ष भारतात पूर्व हिमालय, मेघालय, नागालँड, मणिपूर, आसाम, त्रिपुरा इथं आढळतो. आगार ऑइल किंवा आगरवूड हे याच्या खोडात आढळते. या वृक्षाचा उपयोग धूप, अगरबत्ती तयार करण्यासाठी होतो. आगरु शक्तिवर्धक, हृदयाला मजबुती देणाऱ्या औषधांमध्ये वापरलं जातं. त्वचारोग, कान नाक घसा विकार यावर पण वापरतात.
जस्मिन जोगळेकर
(फोटो छंद आकाशदर्शनाचा पुस्तकातून साभार)
जास्मिनखरोखर तू ग्रेट च
उत्तर द्याहटवालिखाणा ला सहज तेचा टच
कीप इट गोईंग अप अप आन दी स्वींग ग ग
मनापासून धन्यवाद मामा 🙏
हटवाNice information
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद
हटवाछान माहिती
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद
हटवाजस्मिन्, तू अफाट माहितीचा झरा आहेस. छान लिहीतेस.
उत्तर द्याहटवाथँक्यू सो मच 😊
हटवाकिती वेगळ्या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन केला आपण....माहितीसाठी खूप खूप धन्यवाद....निशा साळोखे
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद निशा मॅडम 🙏😊
हटवा