नक्षत्रबाग - ३

#नक्षत्रबाग

७) पुनर्वसू - आर्द्रा नक्षत्रावरून पुढं जाताना मध्ये आकाशगंगेचा सुंदर पांढरा पट्टा लागतो. यातून पुढं गेल्यावर पुनर्वसू नक्षत्र. कश आणि प्लक्ष या दोन ताऱ्यांनी हे नक्षत्र बनलं आहे. यातल्या कश ताऱ्याकडं दुर्बिणीतून पाहिलं तर तिथं दोन तारे दिसतात. हे दोन तारे स्वतंत्र नाहीत. तिथं परत जुळे आहेतच.पण हे आपल्यापासून खूपच लांब असल्यामुळं नुसत्या डोळ्यांनी एकच तारा दिसतो. या नक्षत्राविषयी पण काही कथा आहेत.

ग्रीक कथा अशी... ज्युपिटर हा लिडा नावाच्या राणीवर भाळला. त्यानं एका सुंदर हंसाचे रूप घेतलं. आपण संकटग्रस्त आहोत असं भासवून त्यानं लिडाची सहानुभूती आणि सहवास मिळवला. पुढं लिडाने जुळ्या मुलांना जन्म दिला. तेच हे कश आणि प्लक्ष शूर योद्धे झाले.

दुसरी कथा अशी की, अर्गो नावाच्या युद्ध नौकेतून कश आणि प्लक्ष प्रवास करत होते. या प्रवासात आलेल्या वादळातून त्यांनी सर्वांना वाचवले. ज्युपिटरने त्यांचे शौर्य पाहून त्यांना आकाशात स्थान दिले. पाश्चात्य नाविकांचे ते आवडते तारे होते असं म्हणतात. 

आपल्याकडं पुनर्वसू ना असुर मानलंय.

तर या पुनर्वसूचा आराध्यवृक्ष आहे बांबू.

बांबू - बांबूचे बेट असं जे आपण म्हणतो तो बांबू म्हणजे एक प्रकारचे गवतच आहे. याच्या जवळजवळ १४०० जाती आहेत. बांबूला खत आणि पाणी कमी प्रमाणात लागतं. तसंच याची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्यामुळं याला कीटकनाशक ही वापरावी लागत नाहीत.

 बांबूची कोवळी पानं, फांद्या, कोंब हे पांडा चं मुख्य अन्न आहे. कधी कधी उंदीर याची फळं खातात. आफ्रिकेत गोरिला बांबू खातात.

याचे कितीतरी उपयोग आहेत. पाळण्यापासून शवपेटीपर्यंत बांबू आपल्याला सोबत करतो. यापासून कागद बनवतात. हस्तकला, खाद्यपदार्थ, बांधकाम, वाद्य, आयुर्वेदिक औषधं यासाठी बांबूचा उपयोग होतो. 

बांबूला धार्मिक महत्त्व पण आहे. आसाममध्ये पौर्णिमेला रात्री, मंगळवार शनिवार बांबू तोडत नाहीत. भगवान बुद्ध बांबूच्या बनात ध्यान करायचे. जपानमध्ये झेन पंथाचे लोक याच्या बनात साधना करतात.

कफ आणि पित्तावर यातील औषधी द्रव्याचा उपयोग होतो. बांबूचे पेर, पाने, अंकुर, फुलं औषधी आहेत. 

८) पुष्य - २७ नक्षत्रांमध्ये ओळखायला सोपे नक्षत्र म्हणजे मृग आणि अंधुक आणि सहज न ओळखता येणारे नक्षत्र म्हणजे पुष्य. नक्षत्रांमधलं लाजाळू नक्षत्र.  त्रिकोणी आकाराचा तारकासमूह म्हणजे पुष्य. वेदकाळात याचं नाव तिष्य असं होतं. 

   रोमन लोकांनी हा तारकासमूह मर्क्युरी देवतेचा मानला. ग्रीकांची समजूत अशी की, मानवी शरीरात निवास करण्यासाठी अंतराळातून आत्मे येतात. या आत्म्यांचे पृथ्वीवर यायचे प्रवेशद्वार म्हणजे पुष्य नक्षत्र. त्यांना याचा आकार खेकड्यासारखा वाटला. त्यासंबंधी कथा अशी..हर्क्युलिस या महान योद्धयाचे हायड्रा नावाच्या पाणसापाशी युद्ध सुरू होतं. (हायड्रा म्हणजे आपला वासुकी. हा आकाशात पुष्य नक्षत्राजवळ दिसतो.) युद्धात हर्क्युलिसचे लक्ष विचलित करण्यासाठी या खेकड्याने त्याचा पाय धरला. पण हायड्राबरोबर हा पण मारला गेला. जुनो देवतेने त्याला आकाशात स्थान दिले.

  हा तारकासमूह पुसट दिसत असला तरी यात अक्षरशः हजारो सूर्याचं संमेलन भरलेलं आहे. 

पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे पिंपळ.

पिंपळ - पिंपळाचे झाड जागा मिळेल तिथं उगवून वाढतं. पिंपळाला भरपूर आयुष्य असतं म्हणून त्याला 'अक्षयवृक्ष' म्हणतात. 

  या झाडावर सतत पक्षी, कीटक बसलेले असतात. याची पिकलेली फळं पक्ष्यांना आवडतात. पण ही फळं पचायला जड असतात. न पचलेल्या फळांच्या बिया पक्ष्यांमार्फत सगळीकडं टाकल्या जातात आणि जिथं पडतील तिथं सहज उगवतात.

  पिंपळ जिथं असेल तिथलं वातावरण शुद्ध असतं. म्हणून याला पवित्र मानतात. पिंपळाचे औषधी उपयोग पण आहेत. पोटाचे विकार, व्रण या झाडाच्या औषधाने बरे होतात. पिंपळाच्या सालींचा काढा पौष्टिक आणि शक्तीवर्धक असतो. सालींपासून लाल रंग तयार करतात. बौद्ध भिक्षू त्यांचे वस्त्र या रंगानेच रंगवतात. हडप्पा मोहोंजेदडोच्या उत्खननात जी नाणी सापडली होती त्यावर पिंपळाच्या पानाच्या आकृती होत्या. 

९) आश्लेषा - आश्लेषा नक्षत्र पाच मंद लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी बनलं आहे. आकाशात पाहिलं तर हे पाच तारे एका वाडग्याच्या आकारात दिसतात. या पाच ताऱ्यांपैकी कोणाचंही व्यक्तिमत्त्व फार काही सांगण्यासारखं नाही. आश्लेषा नक्षत्राने कर्क रास पूर्ण होते.

आश्लेषाचा आकार सापाच्या फण्यासारखा दिसतो. म्हणून अनेक संस्कृतींमध्ये याचा सापाशी संबंध जोडला आहे. सर्प नक्षत्र असंही याला म्हणतात. हा सर्पाचा आकार आकाशात आश्लेषा नक्षत्रापासून सुरू होऊन हस्त नक्षत्राला संपतो. आपल्याकडं याला वासुकी म्हणतात तर ग्रीक पुराणात हायड्रा म्हणतात. इजिप्शियन लोकांना हा आकार नदीसारखा वाटला म्हणून ते याला 'स्वर्गीय नाईल' म्हणतात. 

आश्लेषा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे नागकेसर.

नागकेसर - दिसायला सुंदर, सदाबहार असा हा वृक्ष. उन्हाळ्यात याला छान सुवासिक फुलं येतात. याचं वाळलेलं फुल औषध म्हणून वापरतात. आपल्याला माहितेय की, हे फुल मसाल्यात वापरतात. नागकेसरच्या फुलापासून रंग पण बनवतात. रेशीम रंगवायला हा रंग उपयोगी पडतो. नागकेसरच्या बियांपासून तेल काढतात. हे तेल औषध म्हणून आणि दिव्यात घालायला उपयोगी असतं. नागकेसरची चव थोडी कडू असते. खोकला, खाज, ट्युमर सारख्या आजारात नागकेसर औषध म्हणून वापरतात. तसंच हे गर्भधारणेसाठीही उपयुक्त ठरतं.

नागकेसरचं लाकूड एकदम कडक आणि मजबूत असतं. म्हणून याला 'वज्रकाष्ठ' असंही म्हणतात. नागकेसरलाच 'नागचंपा'  पण म्हणतात.


जस्मिन जोगळेकर.

(फोटो छंद आकाशदर्शनाचा पुस्तकातून साभार)





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक