नक्षत्रबाग - ४
#नक्षत्रबाग
१०) मघा - आकाशातला छोटा राजा म्हणून ओळखला जाणारा तारा म्हणजे मघा नक्षत्राचा तारा. या तारकासमूहाचा आकार विळयासारखा आहे. या विळ्याची मूठ म्हणजे मघा नक्षत्राचा तारा. सूर्य मघा नक्षत्रात आला की, पाऊस पडतो असं म्हणतात. पण हा पाऊस बेभरवशी असतो.
मघा ताऱ्याचे रोमन नाव आहे रेग्युलस. रेग्युलस हा एक ग्रीक योद्धा. रोमन आणि कथेजिन्स यात एक महायुद्ध झालं होतं. हे युद्ध प्युनिक वॉर म्हणून प्रसिद्ध आहे. या युद्धात रेग्युलसने खूप शौर्य गाजवलं होतं. तेव्हा तो रोमन नौदलाचा प्रमुख होता. त्याच्या या शौर्याबद्दल मघाच्या ताऱ्याला रेग्युलसचं नाव दिलं गेलं.
मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे वड.
वड - सर्वांचा परिचित वृक्ष. या वृक्षाची एक कथा सांगतात ती अशी..भगवान शंकराचे भक्तगण, तपश्चर्या यामुळं संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळं चिडून पार्वतीने शंकराला शाप दिला की, तू वृक्ष होशील. त्याप्रमाणं शंकराचं वृक्षात रूपांतर झालं. हा वृक्ष म्हणजेच वड. त्या महाकाय वृक्षाच्या पारंब्या म्हणजे साक्षात शंकराच्या जटा.
आपल्याला जशी याची सावली मिळते, तसाच पक्षी-कीटकांना पण याचा आसरा मिळतो. याची फळं म्हणजेच वडांगळं. ही फळं खायला या झाडावर भरपूर पक्षी, किडे, मुंग्या येतात. यावर बरेच पक्षी घरटीही करतात. फुलपाखराच्या अळ्या म्हणजेच सुरवंट याची कोवळी पानं खातात.
हे झाड खूप औषधी आहे. पारंब्याचं तेल, वडाचा चीक, वडाच्या सालींचा काढा वेगवेगळ्या रोगांवर औषध म्हणून वापरतात.
अशा या बहुगुणी, उपयोगी झाडाला वाचवलं पाहिजे. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली याची वृक्षतोड जास्त प्रमाणात होतेय. हवेत ऑक्सिजन जास्त प्रमाणात सोडणाऱ्या या वृक्षाचं संवर्धन आणि संगोपन नीट होणं हे पर्यावरणाच्या दृष्टीनेही हितकारक आहे.
११) पूर्वा फाल्गुनी
१२) उत्तरा फाल्गुनी
सिंह राशीतली ही दोन नक्षत्र. फाल्गुनी ज्या महिन्यात उगवतात तो महिना फाल्गुन. याविषयी ग्रीक कथा अशी - हा सिंह चंद्रलोकातून आला. हर्क्युलिस या योद्धयानं त्याला जंगलात मारलं. नंतर ज्युपिटर या ग्रीक देवतेनं या सिंहाला आकाशात स्थान दिलं.
मघा नक्षत्र म्हणजे या सिंहाची मान-आयाळ, पूर्वा म्हणजे मधले अंग आणि उत्तरा म्हणजे शेपटीचा भाग.
यातल्या पूर्वा फाल्गुनीचा आराध्यवृक्ष आहे पळस.
पळस - पळस म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते वसंतात नखशिखान्त फुलणारं झाड. या इतक्या सुंदर झाडाचे संदर्भ वाल्मिकी, भवभूती, कालिदास यांच्यापासून बहिणाबाई, दुर्गा भागवत, राजा बढे यांच्या साहित्यात दिसून येतात. याच्या फुलांच्या लाल भडक रंगामुळं याला 'अग्निजिव्हा' असा शब्द रा.भि. जोशींनी योजला आहे. जंगलात ही लालभडक फुलं फुललेली पाहिली की, वणवा पेटलाय असं वाटतं. म्हणून याचं नाव 'flame of forest'. फुलांमध्ये मध असतो त्यामुळं यावर वेगवेगळे पक्षी येतात. दिसायला सुंदर तर आहेच पण हे झाड उपयोगी पण तितकेच आहे. पानांपासून पत्रावळी बनतात. किडनीच्या विकारावर फुलं, फ्रॅक्चर झाल्यावर हाडं नीट जुळण्यासाठी सालं उपयुक्त असतात.
उत्तरा फाल्गुनीचा आराध्यवृक्ष रुद्राक्ष.
रुद्राक्ष - हे झाड मध्यम उंचीचं असतं. हिमालय, नेपाळ, भूतान इथं रुद्राक्ष आढळतो. या झाडाच्या फळांचं कवच काढल्यावर आत जे बीज असतं ते म्हणजे रुद्राक्ष. अध्यात्म, आयुर्वेद यात याला महत्त्व आहे. या झाडाचे लाकूड हलके, मजबूत, चिवट असल्यानं फळ्या, खोकी, कपाटं बनवण्यासाठी वापरतात. खऱ्या रुद्राक्षाला आरपार भोक असतं. यात चुंबकीय गुणधर्म असतात. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्षाची माळ घालतात.
याचा गर आंबट चवीचा, पांढरा आणि चिकट असतो. मेंदूचे विकार आणि अपस्माराचे झटके यावर तो औषध म्हणून वापरतात.
१३) हस्त - हस्त हा सहा तारकांचा एक पुंजका आहे. यातला एक तारा मंद आहे त्यामुळं आकाशात दिसताना यातले पाच ठळक तारे हाताच्या बोटांसारखे दिसतात म्हणून हे हस्त. पण त्या सहाव्या ताऱ्यावाचून हे नक्षत्र पूर्णही होत नाही. हा पुंजका आग्नेयेला उगवतो आणि नैऋत्येला मावळतो.
भारतीय पुराणाप्रमाणं हस्त म्हणजे प्रजापतीचा हात. रंगात पाच बोटं बुडवून ती कागदावर उठवली तर जसा आकार होईल तसे हे नक्षत्र दिसते.
या नक्षत्रास पाऊस पडलाच तर शेतकऱ्याला तो हस्ताने दिलेला आशीर्वाद वाटतो. या पावसामुळं त्याच्या अपेक्षा उंचावतात. म्हणून आपल्याकडं म्हणतात न, 'पडला हस्त तर शेतकरी मगरमस्त'.
या हस्ताचा आराध्यवृक्ष आहे रिठा.
रिठा - ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती. सदाहरित जंगलात हा वृक्ष आढळतो. भारतात जवळजवळ सगळीकडं हा वृक्ष आहे. याच्या दोन प्रजाती आहेत. एक हिमालय, उ.प्रदेश, आसाम इकडं तर दुसरी द.भारतात दिसून येते.
रिठ्याच्या फळांपासून तेल काढतात, जे औषधात वापरतात. या झाडापासून गोंद पण मिळतो. रिठ्याच्या वापर शिकेकाईत करतात. फळं चोळली की फेस होत असल्यामुळं ही साबणासारखी पण वापरतात. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची सफाई रिठ्याने करतात.
अर्धशिशी, दंतरोग अशा आजारात रिठा गुणकारी ठरतो. केसांना मजबूत आणि दाट बनवण्यासाठी रिठा उपयोगी ठरतो.
जस्मिन जोगळेकर.
(फोटो छंद आकाशदर्शनाचा पुस्तकातून साभार)
नक्षत्रांची खुप छान माहिती दिली आहे 👌👍
उत्तर द्याहटवाथँक्यू 🙏
हटवा