नक्षत्रबाग - ५

#नक्षत्रबाग

१४) चित्रा - आकाशातल्या रंभा उर्वशी म्हणजे चित्रा स्वाती ही नक्षत्र. चंद्र रोहिणी नक्षत्राशी जशी जवळीक करतो तशीच चित्रेशीही करतो. या नक्षत्राची एक आख्यायिका वैदिक वाङमयात आढळते. यज्ञ करून देवांनी स्वर्ग मिळवल्यावर असुरांना पण स्वर्ग मिळावा असं वाटू लागलं. मग त्यांनी सुद्धा यज्ञाची तयारी सुरू केली. ते पाहून इंद्र घाबरला. तो ब्राम्हणरूप घेऊन असुरांकडं गेला. बरोबर त्यानं सोन्याची वीट नेली होती. ती असुरांपुढं धरून तो म्हणाला, मी दुबळा ब्राम्हण. माझ्या हातून यज्ञ वगैरे काही होणार नाही. तर माझी ही वीट तुमच्या होमकुंडात मांडा. तेवढंच मला पुण्य लागेल. ब्राम्हणाची दया येऊन असुरांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि ती वीट ठेवली. पुढं प्रत्यक्ष यज्ञ सुरू झाल्यावर ब्राम्हणाचं काहीतरी बिनसलं आणि त्यानं ती वीट परत मागितली. असुरांना काही समजण्याच्या आतच त्यानं ती वीट काढून आकाशात भिरकावली. ती वीट म्हणजेच हे चित्रा नक्षत्र. हे नक्षत्र यज्ञसाधक मानलं आहे. पूर्वी अश्वमेधाचा संकल्प या नक्षत्रावरच करत असत.

याचा आराध्यवृक्ष आहे बेल.

बेल - शंकराच्या पूजेतील मानाचे पान. याचे महत्त्व पुराण उपनिषेदात सांगितले आहे. याचे धार्मिक महत्त्व आपल्याला माहीत आहेच. त्रिदळातले डावे पान म्हणजे ब्रम्हदेव, उजवे विष्णू आणि मधले शंकर पार्वती. बेलाचे त्रिदल हे त्रिकाल, त्रिशक्ती, ओंकाराच्या तीन मात्रा यांचे द्योतक आहे. 

कमी पाण्याच्या ठिकाणी हा वृक्ष वाढतो. बेल औषधी पण आहे. कफ वात पित्त हे तिन्ही दोष बेल दूर करतो. याशिवाय अनेक रोगात हा उपयुक्त ठरतो. या फळाचे सरबत प्यायल्याने रक्तशुद्ध तर होतेच पण त्याबरोबर भूकही वाढते. ठराविक मात्रेत घेतला तर हृदयाशी संबंधित आजार बरे होतात. याच्या नियमित सेवनाने ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता कमी होते.

बाह्य सौंदर्य खुलवण्यासाठीही बेल उपयोगी आहे.

१५) स्वाती - स्वाती हे पंधरावं नक्षत्र. हे नक्षत्र अगदी टपोऱ्या मोत्यासारखं दिसतं. या नक्षत्रावर पाऊस पडला तर जमिनीवर सुद्धा मोती उगवतात.

मुलीचं लग्न झाल्यावर ती पतीला प्रिय व्हावी असं वाटत असेल तर स्वाती नक्षत्रावर तिचं दान करावं असं पूर्वी म्हणत. ती आपल्या संसारात इतकी रमेल की, माहेरची तिला आठवणही व्हायची नाही. पण चित्रेच्या जवळ असूनही स्वातीला मात्र चंद्र कधी भेटत नाही. 

आदिवासी लोक याला 'स्वहाती' म्हणतात. त्यांच्यामते या नक्षत्राचा पाऊस पडला तर शिंपल्यात मोती तयार होतात. म्हणजे देव स्वतःच्या हाताने या नक्षत्रातले थेंब मोती तयार करण्यासाठी शिंपल्यात भरतो.

याचा आराध्यवृक्ष आहे अर्जुन.

अर्जुन - नदीकाठी या वृक्षाची वाढ चांगली होते म्हणून याला नदीसर्ज म्हणतात. त्याच्या वेगवेगळ्या गुणांवरुन याला वेगवेगळी नावं आहेत. मूळ नाव अर्जुन याचा अर्थ पांढराशुभ्र. या झाडाचं खोड पांढरं असतं म्हणून हा अर्जुन. अर्जुनाचा चीक सुंदर, पारदर्शक, स्वच्छ आणि पौष्टिक असतो म्हणून याला क्षीर स्वामी असंही म्हणतात. 

पावसाळ्यात हे झाड फुलतं. ताक करायची रवी जशी असते तसं याचं फळ असतं. हे अस्थिभंगावर, हृदयरोगावर औषधी आहे. 

बारा ज्योतिर्लिंगापैकी नागार्जुन हे ठिकाण या झाडाखाली वसलेलं आहे.

१६) विशाखा - वैशाख हे नाव ज्या नक्षत्रावरून आलं ते विशाखा नक्षत्र. याचे दोन तारे तुळ राशीत येतात. हे तारे मंद असल्यामुळं दाट अंधारात त्यांची जागा माहीत असेल तरच ते दिसतात. वैशाख पौर्णिमेला कधी कधी चंद्र या दोन ताऱ्यांच्यामध्ये दिसतो.

याचा आराध्यवृक्ष आहे कवठ.

कवठ - कवठ हे पानझडी, काटेरी झाड. फेब्रुवारी ते एप्रिल कवठाला फुलं येतात. त्यानंतर २/३ महिन्यांनी फळं धरतात. याचे कवच कठीण असते. आतला गर तुरट, आंबट गोड असतो. हे फळ पित्तशामक आहे. याच्या सेवनाने भूक वाढते. दमा, क्षयरोग, वातदोष, रक्तविकार यावर हे औषधी आहे. फळांचं कवच कातडी कमावण्यासाठी आणि रंगवण्यासाठी वापरतात. याच्या बियातून तेल निघतं, ते खाजेवर लावतात. 

कवठाची वाळलेली फुलं उकळल्यावर त्यापासून रंग मिळतो. याची पानं सुवासिक असतात. वायुनाशी आणि अंगावर पित्त उठलं तर पानांचा रस लावतात. 

कवठाच्या झाडापासून डिंक मिळतो. बाभळीच्या डिंकाला पर्याय म्हणून हा वापरतात. याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. घर बांधणी आणि शेतीची अवजारे बनवण्यासाठी हे लाकूड वापरतात.


जस्मिन जोगळेकर.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक