पावसाला पत्र
प्रिय पावसा,
माझं हे पत्र बघून तुला आश्चर्य वाटलं ना? मला माहितेय तू मनात म्हणत असशील आज बरी हिला माझी आठवण आली. पण..आज एकदम तुला पत्र लिहावं वाटून गेलं. खरं सांगू..इथं आल्यापासून तुझी सवय मोडल्यासारखी झाली होती. आमच्या या भागावर तू रुसल्यासारखाच असतोस जणू. पावसाळा सुरू आहे याची आठवण रहावी म्हणून मधूनच हजेरी लावणार. एरवी कोरडा. पण यावेळी ५-६ दिवस झाले सलग पडतो आहेस. म्हणूनच म्हटलं, तुझ्या अशा संततधारेची सवय मोडलेय रे!
मला आठवतोयस तू..ते माझ्या माहेरचा. माझ्या लहानपणीचा तू. काय मजा असायची तेव्हा. ठरल्यावेळी बरोब्बर तू हजर व्हायचास. आधीच निसर्गसंपन्न असलेलं माझं माहेर तुझ्या येण्याने आणखी शृंगारुन जायचं. सृजनाचा तो रंग, त्याच्या वेगवेगळ्या छटा..आहा.. नुसतं बघत बसावं अशा. सगळं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जायचं तुझ्या येण्यामुळेच रे!
पण जोवर तुझा जोर कमी असायचा तेव्हा हे सगळं छान वाटायचं. पण तुला आठवतंय का? एकदा का जोरदार बरसायला लागलास की कोणाला ऐकायचा नाहीस तू. पडायला लागलास की अक्षरशः कोसळायचास. ते ही एखादा दिवस नाही, तर सलग ८-१० दिवस. तुझ्या मनात असेल तितके दिवस अखंड ओतत राहायचास. तेव्हा असं वाटायचं की, माझ्या गावावर ढगाला मोठं भोक पडलंय. ते जाऊन शिवून टाकावं. पण कसं शक्य होणार ना ते! तू आपला पूर्ण मोकळा होइपर्यंत पडतच रहायचास. घराचा उंबरा ओलांडून अंगणात पाय ठेवायची हिंमत व्हायची नाही. तिथं शाळेत जाणं, बाजारात जाणं या गोष्टी तर दूरच.. अर्थात तुझं असं रौद्ररूप बघून शाळेला सुट्टीच मिळायची. मला शाळेत जायला एक छोटीशी नदी ओलांडून जायला लागायचं आणि पुढचा रस्ता तर नदीला समांतर.. तू एवढा कोसळल्यावर काय! नदीचं पात्र पण फुगून रस्त्याशी हातमिळवणी करायचं. मग तर काय! रस्ताच बंद म्हटल्यावर काय घरातच रहाणं यायचं.
पण मजा होती रे तेव्हा. एवढा पडायचास तरी काही वाटायचं नाही. सगळं अगदी धुवून स्वच्छ होऊन जायचं. हिरवा निसर्ग भोवतीनं म्हटल्यावर आणखी काय पाहिजे. पण तू आलास की कपडे वाळत नाहीत म्हणून घरात मात्र तक्रार असायची हं! पण तो लटका रुसवा मात्र.
एक सांगू तुला! पाऊस, पाणी, धबधबे म्हटलं की, लोकांना त्यात चिंब भिजायला आवडतं. पण मला मात्र भिजणं कधीच आवडलं नाही. दंगा तर अजिबातच नाही. पाणी म्हटलं की मी एकदम शांत, अंतर्मुख होऊन जाते बघ. एका ठिकाणी शांत बसून, कानावर पडणारा तुझा आवाज ऐकणं यात मला खरी मजा वाटते. असं बसून तुझी रुपं डोळ्यात, मनात साठवून ठेवणं हा तर छंदच जणू माझा. अशा तुझ्या कितीतरी आठवणी आहेत माझ्याकडे. त्या मी तशाच जपून ठेवणार बघ अगदी मोरपिसासारख्या!
पण माहेर सोडून या भागात रहायला आले आणि तुझं माझं नातं संपलं की काय असं वाटायला लागलं. तिकडे अगदी रोज हक्काने, प्रेमाने माझ्या अंगणात येणारा तू..इकडे मात्र माझ्यासाठी परका, पाहुणा झालास. सुरुवातीला जड गेलं हे तुझं वागणं. पण नंतर तुझ्या नसण्याची सवय झाली. किंवा लावून घेतली म्हण. पण तीच सवय इतकी भिनली अंगात की, आता तू इथं सलग बरसतोयस तर तेही नको वाटतंय. नको वाटतंय म्हणजे तू हवा तर आहेसच. पण इथं माझ्या माहेरसारखं नाही रे! तुझी तिकडची सगळं स्वच्छ करून जायची सवय इथं मात्र कुठं जाते रे? अर्थात घरात बसून बघताना तो तूच माझा माहेरचा सखा आहेस याची खात्री पटते.
तिथं पडतोस, इथं पडत नाहीस म्हणून मी तक्रार करत नाहीये रे. मला माहितेय यात तुझा दोष काहीच नाहीये. सगळं आम्ही माणसांनीच बिघडवून टाकलं आहे. झाडं नकोत, मोठ्या बिल्डिंग हव्यात, मग जागा कमी पडतेय म्हणून निसर्गावर अतिक्रमण..अशा अनेक गोष्टी इथं चालतात. मग असं होणारच की. कुठं अतिवृष्टी होणार तर कुठं कोरडा दुष्काळ! एकूण काय...डोळ्यात अश्रू असणारच.
पण खरं सांगू! या भागात ना, जमिनीला जशा भेगा आहेत ना, तशाच मनाला आहेत. आणि जसा कोरडा दुष्काळ तसा डोळ्यातही कोरडा दुष्काळ. इतकं दमवलं आहेस की, लोकांच्या डोळ्यातले अश्रू ही कोरडे झालेत रे! मला विश्वास आहे कधीतरी आम्ही नक्की सुधारू. पण तू ही रे..नको ना इतकी परीक्षा बघू. वाईट वाटतं रे हे सगळं बघून. मग वाटायला लागतं.. माझ्या माहेरचा, मला हवाहवासा वाटणारा, प्रेमाची बरसात करणारा हा पाऊस इतका निष्ठुर पण कसा आहे.
असो..फार बोलले का रे मी. आज एकदम तुला इथं मुक्काम केलेलं बघून आठवणींचा पट उलगडत गेला बघ. पण आता थांबते इथंच. असाच मस्त मजेत रहा आणि आमच्या कृषिवलांना ही मजेत ठेव. एवढंच म्हणेन बघ. भेटत राहूच आता दरवर्षी.
😊
जस्मिन जोगळेकर
**********
अगदी रिमझिम शब्द !
उत्तर द्याहटवाछान !
अगदी रिमझिम शब्द !
उत्तर द्याहटवाछान !
मनःपूर्वक धन्यवाद
हटवा