नक्षत्रबाग - ६
#नक्षत्रबाग
१७) अनुराधा - या नक्षत्रापासून वृश्चिक रास सुरू होते. विंचवाच्या तोंडाशी जे तीन तारे आकाशात दिसतात ते अनुराधा नक्षत्र.
एकदा देव आपापसात बोलत होते की, आपल्याला असुरांवर विजय मिळवायचा आहे. तर आपण अनुकूल सामग्रीने समृद्ध होऊया. हा विचार ते ज्या नक्षत्रावर बोलले ते अनुराधा नक्षत्र. अनु म्हणजे अनुकूल आणि राध् म्हणजे समृद्धी. अशी या नक्षत्राची व्युत्पत्ती.
याचा आराध्यवृक्ष आहे बकुळ.
बकुळ - मध्यम उंचीच्या या झाडाची फुलं सर्वांनाच प्रिय असतात. हे झाड छान, दाट सावली आणि सुवासिक फुलं यामुळं लोकप्रिय आहे. या फुलातील सुगंधी द्रव अत्तर, तेल यात वापरतात.
शक्तीवर्धनाच्या औषधात, दंतरोग, अतिसार यावर बकुळ औषधी आहे.
बकुळीचे लाकूड रंधून, तासून गुळगुळीत, चकचकीत होतं. त्यामुळं याचा वापर बांधकाम, सजावट, होड्या, वल्ही, वाद्य तयार करण्यासाठी वापरतात.
बकुळीच्या फळांचा लोणचं किंवा मुरंबा करतात. बियातलं तेल खाद्यतेल म्हणून किंवा दिव्यात वापरता येतं.
बकुळीचं साल शक्तिवर्धक, तापनाशक असतं. या झाडापासून डिंक ही मिळतो. कोवळ्या फांद्या दात स्वच्छ करण्यासाठी वापरतात. फुलांची भुकटी डोकेदुखी कमी करते.
१८) जेष्ठा - वृश्चिक राशीतलं दुसरं नक्षत्र म्हणजे जेष्ठा. अनुराधा नक्षत्राखाली जे उभे तीन तारे दिसतात ते म्हणजे हे नक्षत्र. यातला मधला तारा तांबडा, ठसठशीत आहे. मंगळ जसा लाल दिसतो, तेवढाच लाल हा तारा आहे. लाल रंगामुळं या ताऱ्याला विंचवाचे हृदय म्हणतात. हा आपल्या सूर्यापेक्षा ७००पट मोठा आहे आणि ९००० पट प्रकाशमान आहे.
याचा आराध्यवृक्ष आहे काटेसावर.
काटेसावर - उन्हाळ्यात लाल फुलांनी बहरणारं हे झाड काटेसावर किंवा शेवरी. मे महिन्याच्या सुरुवातीला शेवरीचा कापूस वाऱ्यावर उडताना दिसतो.
हे झाड फुललेलं असतं तेव्हा याची फुलं वाळवून ठेवतात. ती वाळलेली फुलं मग सूप करण्यासाठी, चहात घालण्यासाठी वापरतात. याच्या कापसाचा वापर गाद्या, उशा यात करतात. अर्थात कमी किमतीत या तयार होतात.
शेवरीच्या लाकडाचा बांधकामासाठी उपयोग होतो. पण जास्त करून प्लायवूड काड्यापेट्या यासाठी हे लाकूड चांगलं असतं.
शेवरीच्या खोडावर काटे असतात. त्यामुळं प्राणी या झाडाकडे जायचं टाळतात.
याला हिंदीत 'शाल्मली' असं सुंदर नाव आहे.
१९) मूळ - वृश्चिक राशीची नांगी म्हणजे मूळ नक्षत्र. यात ११ तारे आहेत. पण त्यातले ९ स्पष्ट दिसतात.
हे नक्षत्र आपल्या आकाशगंगेच्या पट्टयात येतं. त्यामुळं याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे एक प्रकारचा जिवंतपणा, उल्हास.. इथूनच आकाशगंगा सुरू होते आणि विश्वाला वळसा घालून इथंच संपते. म्हणून हे 'मूळ' असंही मानतात.
या नक्षत्रावर मूल जन्मणं अशुभ मानतात.
याचा आराध्यवृक्ष आहे साल.
साल - साल वृक्षाला संस्कृतमध्ये अग्निवल्लभा, अश्वकर्ण किंवा अश्वकर्णिका म्हणतात. हिमालय, उ.प्रदेश, बंगाल, आसाम, बिहार इकडच्या जंगलात साल वृक्ष आढळतो. तिथल्या वातावरणात काही बदल झाला तरी हा वृक्ष त्या वातावरणाशी स्वतःला अनुकूल बनवून घेतो.
धूप आणि औषधात याचा उपयोग होतो. याचे बी दुष्काळाच्यावेळी खाण्यासाठी वापरतात.
या झाडाचे लाकूड मुख्य उपयुक्त आहे. मजबूत आणि कठीण लाकूड म्हणून हे दरवाजे, खिडक्या, होड्या बनवायला वापरतात. रुळातले स्लीपर्स सुद्धा याच्या लाकडापासून बनवायचे. मलेशियात तर याच्या लाकडापासून मोठमोठी जहाजं तयार करतात.
हिंदू धर्मात हा वृक्ष विष्णूला प्रिय असं मानतात. बौद्ध धर्मात पण हा पवित्र वृक्ष मानतात. माया राणीने या वृक्षाखालीच बुद्धाला जन्म दिला होता असं म्हणतात.
जस्मिन जोगळेकर
(फोटो छंद आकाशदर्शनाचा पुस्तकातून साभार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा