माळरान
पाऊस पडून गेल्यानंतरचा निसर्ग आपल्या सगळ्यांनाच भुरळ घालतो. कोकणातले सौंदर्य तर विशेषच..हिरव्या घनगर्द झाडांनी झाकलेल्या डोंगर दऱ्या, मधूनच दिसणारे फेसाळ धबधबे, धुक्याची दुलई...लगेच कवी कल्पना समोर तरळून जातात. हे असं सगळं दृश्य डोळ्यांना सुखावणारं असतंच. पण कधी कधी एखादं उजाड माळरानही आपल्याला खुणावून जातं. अशीच एक माझी आवडती जागा आहे. अजूनतरी ती मी सुरुवातीला पाहिली होती साधारण तशीच आहे. पण तिथे हळूहळू MIDC उभी राहणार आहे. त्यामुळे नंतर त्यात पूर्ण बदल होऊन जाणार..
पूर्वी पुण्याला जायला निघाले की, कराडवरुन हायवे गाठायला लागायचा. पण आता राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्यामुळे आम्ही मसूर मार्गे जायला लागलो. याच रस्त्यावर मी म्हणतेय ती जागा आहे. एकदमच उजाड..फक्त एखाद दुसरं झाड आहे त्या जागेवर आणि तेच मला आवडतं. सोबत नसली तरी एकटं मस्त रमलंय. फार काही सावली देणारं जरी नसलं तरी त्याचं तिथलं अस्तित्व बघायला मला आवडतं. कितीही रखरखीत ऊन असो वा पावसाळी ढगाळ हवा.. कधीही त्याच्याबद्दल का कोण जाणे पण आपुलकी वाटून जाते. पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ते मनात पक्कं बसलं होतं. आपल्या माणसांची जशी कधीतरी नकळत आठवण येते आपल्याला, तशीच त्याचीही येते. मग त्यावर हे काही लिहायचं सुचलं.
उजाड माळरान..
इतकं उजाड की,
वाऱ्याला अडवायलाही
कोणी नाही मधे..
नाही म्हणायला खुरटं गवत
होतं तिथं..
आणि दूssर क्षितिजावर डोंगररांग..
बाकी कोणी नाही..
फक्त उजाड माळरान..
त्या खुरट्या गवतातूनच
एक दिवस, अचानक
एक छोटसं रोपटं
डोकावू लागलं..
पाहून त्याला माळरान आनंदलं..
'चला, सोबतीला कोणी आलं'..
म्हणून त्याला हुश्श वाटलं..
त्या आनंदात..
'इथं कुठून हे उगवलं?'
या विचाराला त्यानं
मनातून काढून टाकलं..
रोपटं हळूहळू मोठं होत गेलं
माळरानाच्या गप्पांचं..
खत त्याला मिळालं..
जोमानं वाढलं आणि वाऱ्यालाही आता..
गप्पात सामील करून घेऊ लागलं..
आता ते झाड..हो..झाडच..
पाना फुला फळांनी बहरलं
पक्षी, भुंगे यांचं विसाव्याचं ठिकाण झालं..
या सगळ्यांची हालचाल पाहून
माळरानाला आकाश दोन बोटं उरलं..
एकट्याने आयुष्य ढकलताना
व्यथित झालेलं मन,
आता आनंदाने डोलू लागलं..
सगळ्यांची मस्त गट्टी जमली..
अंगावर बागडणाऱ्या,
या सगळ्यांची लगबग..
माळरानाला दिसली,
जेव्हा त्या झाडावरची
गोड फळं पिकली..
पोटभर फळं खाऊन,
उडून दूर जाणाऱ्या
पक्ष्यांना पाहून..
त्यांनी कायम इथंच रहावं..
अशी आस त्याला लागली..
पण या इच्छेचं हट्टात
रूपांतर होण्याआधीच..
ते शहाणं झालं..
भूतकाळातलं आयुष्य..
त्याला आठवून गेलं.
आणि त्याला पक्ष्यांचं ते,
उडून जाणं पटलं..
'जाताहेत उडून..
तर खुशाल जाऊ दे..
माझ्यासारखंच अजून कुठं
नंदनवन फुलवू दे..'
हेच त्यानं मनात म्हटलं..
अजून किती दिवस त्याचं तिथलं अस्तित्व टिकेल काय माहीत. पण आपल्या हातात काही नाही हेच खरं.
जस्मिन जोगळेकर
कवीमना येरे घना येरे घना न्हाउ घाल सार्या जना
उत्तर द्याहटवाथँक्स मामा 😊
उत्तर द्याहटवा