नक्षत्रबाग - ७
#नक्षत्रबाग
२०) पूर्वाषाढा
२१) उत्तराषाढा
ही दोन नक्षत्र धनु राशीत येतात. पूर्वामध्ये चार आणि उत्तराषाढामध्ये चार असे दोन मोठे चौकोन मिळून एक मोठा तारकासमूह होतो, तो म्हणजे धनु रास. धनु रास म्हणजे पुरुष व पशू यांची आकृती. एका कल्पनेनुसार या धनुर्धारी पुरुषाने आपल्या बाणांचा नेम समोरच्या वृश्चिकावर रोखला आहे.
दुसऱ्या एका कथेनुसार या राशीला बैलांना मारणारा असंही म्हटलं आहे. आकाशात जेव्हा वृषभ रास मावळत असते तेव्हाच धनु रास उगवत असते.
ग्रीक दंतकथेनुसार हा चिरोन नावाचा धनुर्धारी आहे, ज्याला संगीत आणि ज्योतिषशास्त्र यांचीही आवड आहे. याने सूर्यदेव, अपोलो आणि हर्क्युलिस सारख्या महान योद्धयांना धनुर्विद्या शिकवली.
खगोलशास्त्रात धनु रास जिथं आहे त्या भागाला समृद्ध म्हटलं आहे. कारण इथं बरेच तारकागुच्छ आणि तेजोमेघांची गर्दी आहे.
पूर्वाषाढाचा आराध्यवृक्ष आहे वेत.
वेत - या झाडासंदर्भात एक गोष्ट आपल्याला माहीत आहे. नदीकाठी शमीचं एक झाड होतं. ते एक दिवस ताठ्यात पाण्यातल्या वेताला म्हणालं, असला कसला रे तू? छोट्या छोट्या लाटा आल्यातरी वाकतोस. मी बघ कसा ताठ उभा आहे. शमीचं झाड अशी त्याची सारखी चेष्टा करत असतं. वेत तेव्हा म्हणायचा, 'मी तर विनम्रतेवर विश्वास ठेवतो. अभिमानावर नाही. यावर शमी वृक्ष हसायचा. मग एक दिवस नदीला पूर आला आणि त्यात शमी वृक्ष मुळापासून उखडून पडला. पण वेत त्या लोंढ्यात वाकला आणि पाणी कमी झाल्यावर पुन्हा सरळ उभा राहिला. ही विनम्रतेची शक्ती वेतापासून शिकायला मिळते.
उत्तराषाढाचा आराध्यवृक्ष आहे फणस.
फणस - भारतात बऱ्याच वर्षांपासून फणस लावला जातोय. जगभरात त्याचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात.
पिकलेला फणस गोड आणि मस्त वासाचा असतो. यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. फणसाच्या बिया म्हणजेच आठळ पण उपयोगी असतात.
फणसाचे लाकूड वाद्य बनवण्यासाठी वापरतात. फर्निचर आणि बांधकामात पण याचा उपयोग होतो. युरोपमध्ये हे लाकूड मोठ्या प्रमाणात एक्स्पोर्ट होतं. याला वाळवी लागत नाही त्यामुळं त्याचा वापर खूप होतो.
फणस हे बांगलादेशचं राष्ट्रीय फळ आहे. श्रीलंका आणि व्हिएतनाम मध्ये फणसाचे वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्या फॅक्टरीज आहेत. न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप असणारं असं हे फळ.
२२) श्रवण - श्रावण महिन्याचं श्रवण नक्षत्र. या नक्षत्राचे तीन तारे एका ओळीत असतात. मधला खुद्द श्रवण आणि दोन्ही बाजूला त्याचे आईवडील. ४० मंद ताऱ्यांचा समूह इथं आहे. या तारकासमूहाचा आकार गरुडसारखा आहे म्हणून हा गरुड तारकासमूह. या गरुडाच्या मस्तकावरचा तारा म्हणजे हे श्रवण नक्षत्र. हा तारा स्वतः भोवती खूप वेगानं फिरतो. फक्त साडेसहा तासात तो स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करतो.
याचा आराध्यवृक्ष आहे मांदार.
मांदार - मांदार म्हणजे पांढरी रुई. आयुर्वेदात या झाडाची गणना विषारी झाडात केली आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य निगराणीखाली घेतलं तर मांदार बऱ्याच रोगांवर उपकारक आहे. मात्र अधिक प्रमाणात घेतलं तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो. या झाडाचा प्रत्येक भाग औषधी आहे. याची पानं दातदुखी, कानदुखी, सूज कमी करण्यासाठी वापरतात. मांदारच्या फुलांचे गुच्छ छान दिसतात. कीटक आणि फुलपाखरं यांचा या फुलांवर वावर असतो. या झाडाची फांदी किंवा पान तोडल्यावर पांढरा चीक येतो. पायात घुसलेला काटा काढायला याची मदत होते. याचे मूळ अल्सर,एक्झिमा या रोगांवर उपयुक्त असते. त्वचा रोगांवर सुद्धा मांदार उपयोगी आहे.
या झाडाला धार्मिक महत्त्व पण आहे. हनुमानाचे आवडते झाड. १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.
पाऱ्यासारखे रसायन यात असल्यामुळं याला 'पारद' असंही म्हणतात.
२३) धनिष्ठा - श्रवण नक्षत्रानंतरचे नक्षत्र म्हणजे धनिष्ठा. नुसत्या डोळ्यांनी आकाशात पाहिले तर हे नक्षत्र अगदी दुबळं दिसतं. पण त्याचा शब्दशः अर्थ आहे सर्वात धनवान. पाच ताऱ्यांचे मिळून हे नक्षत्र बनते.
पाश्चात्यांनी याला डेल्फिनियस म्हणजे डॉल्फिन असं नाव दिलंय. त्यामागची ग्रीक कथा अशी...ऍरिओन नावाचा एक प्रसिद्ध गायक आणि गीतकार होता. त्याच्या गाण्यानं लोक भारले होते. अनेक बक्षिसं त्यानं मिळवली होती. एकदा तो कोरंथ ते सिसिली प्रवास करत होता. त्याच्याबद्दल वाटणाऱ्या द्वेषातून खलाशांनी ते जहाज आडबाजूला नेले आणि ऍरिओनला ठार मारायचे ठरवले. त्याला अखेरची इच्छा विचारल्यावर ऍरिओनने गायची इच्छा व्यक्त केली. तो गाऊ लागताच डॉल्फिन माशांचा थवा जहाजाकडे आला आणि खलाशांना काही कळायच्या आत त्यांनी ऍरिओनला किनाऱ्यावर आणून सोडलं. त्याचे प्राण वाचवणाऱ्या डॉल्फिनना पाश्चात्यांनी आकाशात स्थान दिले.
भारतीय वैदिक काळापासून धनिष्ठाचा उल्लेख आहे. पण तेव्हा त्याला श्रविष्ठा म्हणत असत. म्हणजे 'सुप्रसिद्ध'.
ज्योतिषशास्त्रात हे धनिष्ठा पंचक अशुभ मानतात.
धनिष्ठाचा आराध्यवृक्ष आहे शमी.
शमी - धनिष्ठा नक्षत्रासाठी शमीचं झाड योजलं आहे. अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे या झाडाच्या ढोलीत ठेवली होती, म्हणून हे झाड आपल्याला माहीत आहे.
हे आयुर्वेदिक औषधी झाड प्रतिकूल हवामानातसुद्धा वाढतं. जमिनीत ओलावा असेल तर वाळूतसुद्धा हे चांगलं वाढू शकतं. हे काटेरी झाड आहे. याची फुलं लहान पिवळ्या रंगाची असतात.
शमीच्या लाकडाचा उपयोग इंधनासाठी होतो. यज्ञात शमीच्या समिधा असतात. दुष्काळात शमीची पानं गुरांना चारा म्हणून देतात. पूर नियंत्रणाचं काम हे झाड उत्तमरीतीने करतं असं म्हणतात.
शमीच्या झाडाची पानं, शेंगा औषधी आहेत. शरीरातली उष्णता घालवण्यासाठी शमीचा उपयोग होतो. तसंच जखमेचे व्रण शमीच्या सालीमुळं नाहीसे होतात.
राजस्थानचा हा राज्यवृक्ष आहे.
जस्मिन जोगळेकर.
(फोटो छंद आकाशदर्शनाचा पुस्तकातून साभार)
सुंदर ओघवती भाषा आहे.त्यामुळे माहिती वाचायला मजा येते.
उत्तर द्याहटवाथँक्यू 😊
हटवाजसमिन 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअशी माहिती वाचली नाही कधी...मस्तच ग
थँक्यू सो मच 😊
हटवा