वारी
आषाढ महिना जवळ यायला लागला की, आठवतात ते कवी कालिदास..आणि बरोबरीने पंढरीची वारीही. वारी म्हटलं की, डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते भक्तिभावाने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचं.. विठू माऊलीचा गजर कानात घुमायला लागतो लगेच. आषाढीला एका ओळीत घाट पार करणाऱ्या वारकऱ्यांचे पेपरमध्ये येणारे फोटो पटकन तरळून जातात. वारी म्हटलं की या गोष्टी आठवून जातात.
ही वारी मी कधी प्रत्यक्ष अनुभवली नाही. पण दुसरी एक वेगळीच आणि अचंबित करणारी वारी मात्र मी अनुभवली होती. त्याला वारी हा शब्द वापरतेय कारण तो जो काय प्रकार होता तो पाहून मला एकदम आषाढी वारी आठवली होती. तर मी सांगतेय ती वारी होती नाजूकशा फुलपाखरांची! 😍
एका सुट्टीत मी माझ्या ग्रुप बरोबर दांडेलीला गेले होते. जंगलातून मनसोक्त भटकणं सुरू होतं. त्यातच एक वेळ एका डांबरी रस्त्यावरून चक्कर मारायला म्हणून निघालो होतो. गप्पा गोष्टी, हसत खिदळत जाताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने विरुद्ध दिशेने जाणारी २/४ फुलपाखरं उडताना दिसली. पहिल्यांदा त्यांची संख्या कमी असल्यामुळं त्यांना नुसतं पाहिलं आणि आम्ही पुढं गेलो. जसं पलीकडून दोन चार अनोळखी माणसं जाताहेत हे डोळ्याच्या कोपऱ्यातून आपण पाहावं इतपत पाहिलं. थोडं पुढं गेल्यावर त्यांची संख्या वाढली. अरेच्या, परत ही फुलपाखरं कशी असं वाटून त्यांच्या जाण्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. दोन चारच्या समूहाने जाणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू वाढत जाऊन रांग च लागली की कशी उत्सुकता वाढेल..तसं झालं. बघता बघता त्या दोन चार ची अक्षरशः हजारो फुलपाखरं कधी झाली कळलंच नाही. मर्यादित संख्या असलेली ती रांग नंतर नंतर एवढी वाढत गेली की, कधी संपेल की नाही असं वाटायला लागलं. मी तर काही वेळ पुढं जायचं विसरून उलट्या दिशेने जाणारी ती फुलपाखरं बघत तिथेच उभी राहिले. किती वेळ झाला तरी त्यांची रांग संपतच नव्हती. इतकं आश्चर्य वाटत होतं त्यांचं! त्या प्रवासात समोरून येणाऱ्या गाड्यांना धडकून बरीचशी मरूनही पडत होती बिचारी. 😞 पण पुढं जाणारे जातच होते पुढं. शेवटी बऱ्याच वेळाने तो प्रकार बंद झाला. मोजणं अशक्य एवढी फुलपाखरं तेवढ्यात तिथून उडत गेली होती. ती संपल्यावरही त्यांच्या गेलेल्या दिशेने तोंड फिरवून अचंबित होऊन बघत बसले होते कितीतरी वेळ! नक्की हा काय प्रकार होता हे डोक्यातच शिरलं नव्हतं. याआधी असं काही पाहिलंच नव्हतं न! पण जे काय अनुभवलं होतं ते विसरणं अजिबातच शक्य नव्हतं.
नंतर आमच्यात जी काय चर्चा झाली त्यावरून कळलं की, फुलपाखरांचं स्थलांतर होतं ते. आतापर्यंत पक्षी असे स्थलांतर करतात माहीत होतं, पण हा प्रकार वेगळाच होता.
आज परत ते दृश्य डोळ्यासमोर यायचं कारण म्हणजे हेमंत ओगले यांचं फुलपाखरांवरचं पुस्तक वाचत होते आणि त्यात 'बटरफ्लाय मायग्रेशन'ची माहिती वाचनात आली. जगातल्या 250 आणि भारतातल्या ६० फुलपाखरांच्या जाती मायग्रेट होतात. एकाच दिशेने, खूप मोठ्या संख्येने, लांब अंतर पार करायला किती चिकाटी लागत असेल! ती फुलपाखरं खाणं आणि विश्रांती यासाठी जेवढा वेळ बसतात तेवढीच शांतता.. त्यापेक्षा जास्त काळ ते असं स्थलांतर करताना हवेत घालवतात. त्यांच्या जातीनुसार या प्रवासाची लांबी वेगवेगळी असते. काही फुलपाखरं दोन किलोमीटर जातात तर काही तब्बल ३००० किलोमीटर. काहीही अडथळे आले तरी त्यांचा हा हेतुपूर्वक प्रवास सुरुच राहतो. उन्हाळ्याच्या काळात फुलपाखरे प्रवासाला सुरुवात करतात. किती एनर्जी लागत असेल ना! केवढासा तो जीव आणि केवढा तो प्रवास!! स्थलांतराची कारणं काय तर..वातावरणातील बदल, अन्नाची कमतरता आणि पॉप्युलेशन मध्ये वाढ. पण तो प्रकार बघणं म्हणजे कमाल!! निसर्गात असं किती काय काय घडत असतं ना की, जे पाहिल्यावर यापुढं आपण किती छोटे आहोत असं वाटून जातं आणि आहोतही खरंच.
अंगणात एक जरी फुलपाखरू दिसलं तरी मला ही वारी आठवल्याशिवाय रहात नाही. आषाढी वारी आणि या वारीत फरक म्हणजे..वारीतले ते वारकरी काही दिवसांनी आपल्या घरी परततात. इथं ही फुलपाखरं मात्र..😞 त्यांची पुढची पिढी त्यांचा हा राहिलेला परतीचा प्रवास पूर्ण करत असेल कदाचित! 😊
माझ्या आठवणीप्रमाणे त्या फुलपाखरांचं नाव कॉमन एमिग्रंट्स...
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा