नक्षत्रबाग - ८
#नक्षत्रबाग
२४) शततारका - २४ वे नक्षत्र म्हणजे शततारका. या नक्षत्रातल्या तारकासुद्धा खूप मंद आहेत. नाव जरी शततारका असलं तरी त्यातला एकच तारा जर आकाशातलं त्याचं स्थान माहीत असेल तरच दिसू शकतो. शततारका नक्षत्राला 'शतभिषा' असंही म्हणतात. दीर्घायुष्य देण्याचं सामर्थ्य या नक्षत्राकडं आहे असं मानलं जातं.
याचा आराध्यवृक्ष आहे कदंब.
कदंब - कदंब हा एक भव्य वृक्ष आहे. झाड मोठं असलं तरी याची फुलं आकारानं लहान आणि पिवळट सोनेरी रंगाची असतात. फुलांचा आकार चेंडूसारखा असतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात हे झाड जास्त प्रमाणात आढळतं.
संस्कृत वाङमयात या झाडाचा संबंध मोसमी पावसाशी जोडला आहे. ढगांचा गडगडाट झाला की, कदंब फुलू लागतो. त्याबरोबरीने येणारा वारा कदंबाचा सुगंध घेऊनच वाहतो. असे उल्लेख या ग्रंथातून सापडतात. स्कंदपुराणातसुद्धा कृष्ण कदंबाच्या चेंडूशी खेळतो, बासरी वाजवत कदंबाखाली उभा राहतो असे उल्लेख आहेत. या कदंब झाडाविषयी एक कथा सांगतात....अतिविषारी कालिया नागाच्या फुत्कारामुळं त्या परिसरातले प्राणी, वनस्पती जळून खाक झाले. पण डोहातला कदंब मात्र जिवंत राहिला. कारण स्वर्गातून अमृत प्राशन करून गरुड परतत असताना या वृक्षावर बसून त्यानं आपली चोच फांदीला घासली होती. चोचीचे अमृतकण या झाडाला लागले आणि त्यामुळं हे झाड अमर झाले.
कदंबामध्ये औषधी गुण पण बरेच आहेत. ताप, खाज, सूज येणे, जखम, तोंड येणे, मूत्रविकार हे आणि इतर अनेक आजार दूर करण्यासाठी या झाडाचे वेगवेगळे भाग गुणकारी ठरतात.
ध्यानधारणा करण्यासाठी या झाडाखालचे वातावरण शांत आणि सुगंधित असते.
वडासारखाच हा वृक्ष पण आता दुर्मिळ व्हायला लागलाय.
शततारका नक्षत्राच्या या वृक्षाला कदंबिका, राजकदंब या नावांनी पण ओळखलं जातं.
२५) पूर्वा भाद्रपदा
२६) उत्तरा भाद्रपदा
पूर्वा आणि उत्तरा भाद्रपदाचे दोन तारे आणि त्यांच्या शेजारचे अजून दोन तारे यांचा मिळून एक चौकोन तयार होतो. आकाशातला हा एक मोठा चौकोन आहे. मृग आणि सप्तर्षीचा चौकोन याच्यापुढे लहानच आहे. नुसत्या डोळ्यांनी या चौकोनात पाहिलं तर तो मोकळा दिसतो. पण जर दुर्बिणीतून पाहिलं तर यात शेकडो तारे दिसतात. परदेशी लोकांनी या चौकोनाला पेगॅसस म्हणजे उडणारा घोडा असं नाव दिलंय. वैदिक काळात यांना 'प्रोष्ठपदा' म्हणत असत. वाल्मिकी ऋषींनी दशरथ राजाच्या चारी मुलांना प्रोष्ठपदाची उपमा दिली होती.
यातल्या पूर्वा भाद्रपदाचा आराध्यवृक्ष आहे आंबा आणि उत्तरा भाद्रपदाचा आहे नीम.
आंबा - मंगलकार्य, सण-उत्सव, देवपूजा आणि आयुर्वेदाच्या दृष्टीनं आंब्याला खूप महत्त्व आहे. आंब्याच्या बऱ्याच जाती आहेत. आंब्याचा मोहोर, कैरी, पिकलेला आंबा, कोय, पाने, साल हे सगळे भाग आयुर्वेदाच्या दृष्टीनं उपयुक्त आहेत. आंब्याचा मोहोर थंड असून अतिसार, रक्तदोष, कफ, पित्त दूर करतो. कैरीमध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण जास्त असते. त्यामुळं उन्हाळ्यात जाणवणारा थकवा पन्ह्यामुळं कमी होतो. आंब्याची कोवळी पानं चावल्यावर त्या रसानं आवाज सुधारतो. खोकला कमी होतो. पानांचा चीक टाचेच्या भेगा कमी करतो. पिकलेला आंबा शक्तिवर्धक आणि रुचकर असतो. आंब्याने कांती सुधारून पोषणही उत्तम होते. यात अ आणि क जीवनसत्त्व जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळं आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे. अर्थात त्याचं अतिसेवनही हानिकारक आहे
आम्रवृक्ष हा सदाहरितआहे, कधीही निष्पर्ण होत नाही. दीर्घायु आहे. त्यामुळं त्याला मंगलकार्यात विशेष महत्त्व आहे.
आम्रवृक्षाचा उल्लेख पुराणात आणि प्राचीन साहित्यात बऱ्याच ठिकाणी आढळतो. आम्रमंजिरी म्हणजे मोहोर हा कामदेवाच्या पाच बाणांपैकी एक बाण आहे असं मानतात. या झाडाला प्रजापतीचे रुप मानतात.
नीम - भारतात सर्व ठिकाणी आढळणारा वृक्ष म्हणजे कडुलिंब. हे एक नैसर्गिकरित्या उगवणारे बहुउपयोगी झाड आहे. याची चव कडू असल्यामुळं जंतूंचा नाश करण्याचा याचा गुण पशु-पक्षी, पीकं, माणूस या सर्वांना उपयुक्त आहे.
कडुलिंबाच्या काड्या दात घासण्यासाठी वापरतात. तर लाकूड इमारतींसाठी. हे झाड जंतुनाशक असल्यामुळं अनेक रोगांवर इलाज म्हणून याचा वापर होतो. हवा शुद्धीकरणासाठी याची मदत होते.
आपल्याकडं गुढीपाडव्याला कडूलिंबाला विशेष महत्त्व आहे.
२७) रेवती - २७ नक्षत्रातले शेवटचे नक्षत्र म्हणजे रेवती. शततारकेप्रमाणे हीसुद्धा मंद लुकलुकणारी. रेवतीबद्दल पुराणात कथा सांगतात ती अशी...
ऋतवाक् नावाच्या एका ऋषींना एक उनाड, उपद्रवी मुलगा होता. त्याच्या उपद्व्यापामुळं ऋषींना बऱ्याचदा मान खाली घालावी लागत असे. ऋतवाक् ऋषींनी आपली ही व्यथा एकदा गर्ग मुनींना सांगितली. त्यावर मुनी म्हणाले, हा मुलगा असा आहे हा त्याच्या जन्मनक्षत्राचा दोष आहे. तो रेवतीच्या चौथ्या चरणावर जन्मला होता. झालं...ऋतवाक् ऋषींनी लगेच रेवतीला शाप दिला की, तू गगनमंडळातून स्थानभ्रष्ट होशील. ती बिचारी आकाशातून निखळली आणि सरोवर रुपानं पृथ्वीवर आली. पुढं तिथंच तिला मुलगी झाली. प्रमुच नावाच्या मुनींना ती मुलगी दिसल्यावर ते तिला आश्रमात घेऊन आले, तिचं संगोपन केलं. ती मोठी झाल्यावर तिच्या योग्य वर त्यांनी निवडला. मग उत्तरा भाद्रपदा नक्षत्रावर तिचं लग्न ठरवलं. पण ती मुलगी रेवती नक्षत्रावरच लग्न व्हावं असा हट्ट धरून बसली. अशुभ नक्षत्र असूनसुद्धा ती हट्ट मागे घेईना. यामागचं कारण विचारल्यावर ती मुलगी म्हणाली, रेवती माझी आई आहे आणि तिचा उद्धार व्हावा असं मला वाटतंय. रेवतीची कथा तिनं मुनींना सांगितली. मग प्रमुच मुनींनी रेवतीला उःशाप दिला की, माझ्या तप सामर्थ्याने तू परत स्वस्थानी जाशील. तेव्हा लगेच ते सरोवर मोडून त्यातून एक तेजाचा झोत वर जाऊन उत्तरा भाद्रपदाच्या शेजारी पूर्वपदावर विराजमान झाला. अशी ही रेवती.
रेवतीचा आराध्यवृक्ष आहे मोह.
मोह - मोह हा मोठा जंगली वृक्ष आहे. कमी पावसाच्या कोरड्या व उष्ण हवामानात मोह वाढतो. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मोहाची पानं झडून तो फुलू लागतो. मोहाची फुलं रात्री फुलतात. सकाळी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. फुलांचा बहर संपल्यावर मोहाला रसाळ फळं येतात.
आदिवासींच्या दृष्टीनं मोह म्हणजे कल्पवृक्ष आहे. याची फुलं फळं अन्न म्हणून वापरतात. याच्या फुलात साखर आणि अल्कोहोल चे प्रमाण खूप असते. त्यामुळं यापासून मद्य बनवतात. मोहाची फुलं हे उत्तम टॉनिक आहे. यात अनेक पोषकद्रव्ये असतात. मोहाच्या फळांची भाजी करतात.
मोहाच्या बियातून तेल काढलं जातं. स्वैपाकात, दिव्यात, धुण्याचा साबण बनवण्यात हे तेल वापरतात. तसंच चर्मरोग, डोकेदुखीवरील औषधातही याचा वापर करतात. हे तेल तुपासारखं दिसतं. त्यामुळं भेसळ करण्यासाठीही याचा उपयोग करतात. तेल काढल्यावर बियांची पेंड बनवतात. ही पेंड उत्तम सेंद्रिय खत आहे. सर्पदंशावर ही पेंड वापरतात.
मोहाची पाने पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे. ही खाल्ल्यावर दुभती जनावरं भरपूर दूध देतात. मोहाच्या सालीचा उपयोग रंग तयार करण्यासाठी होतो.
मोहाचे लाकूड सागापेक्षा कठीण असते. पण त्याला लगेच कीड लागते. त्यामुळं ते टिकत नाही. चहाची खोकी, कागद, छोटे लाकडी साकव, बैलगाड्यांची चाके यापासून बनवतात. पण मोहाचं झाड सहसा तोडलं जात नाही. कारण लाकडापेक्षा पानं, फुलं, फळं, बिया यापासून जास्त उत्पन्न मिळतं.
आदिवासी लोकं मोहाला पवित्र अन्नदाता मानतात. सुखी संसारासाठी याची पूजा करतात.
जस्मिन जोगळेकर.
(फोटो छंद आकाशदर्शनाचा पुस्तकातून साभार)
समाप्त…
ही मालिका आवडली असेल तर अवश्य लाईक, कमेंट करा.
२७-नक्षत्रफुलांची. सीमाला छान गुंफली आहे पौराणिक कथा दिलचस्प आहेत.मूळ वृक्ष आणि त्यांचे आयुर्वेदिक उपयोग दिल्याने ही नक्षत्र कामाला वाचनीय झाली आहे.आणि फोटो दिल्याने तिचे सौंदर्य अजून खुलले आहे.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!
हटवाkhupch chhan lekhmala ashich lihit raha tuzi shaily khup bhavali vat pahate pudhil lekhanchi
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 😊
हटवा