चित्र कविता
गोदातीर्थच्या वारीत वारकरी म्हणून सहभागी झाल्यावर मिळणारा आनंद काही वेगळाच आहे. वेगवेगळी वृत्ते शिकणे, पडत-धडपडत ती हाताळणे, इतरांच्या रचना वाचणे असा इथला प्रवास सुरु आहे. कधी कधी एखाद्या वृत्तात कल्पना पटकन सुचून जाते, तर कधी ओढून ताणून लिहिलं जातंय का? असं वाटायला लागतं. अर्थात कल्पना जरी सुचली तरी योग्य शब्दांमध्ये तिची गुंफण करणं जमतंच असं नाही. मुक्तपणे लिहिताना योग्यरितीने आपण शब्द कोणतेही कोणत्याही जागी बसवू शकतो. पण वृत्तात बसवणं जरा जिकिरीचे काम..आणि तेच गोदातीर्थच्या वारीत शिकायला मिळतंय.
या वारीतला आता पुढचा टप्पा गाठलाय. चित्रकाव्य उपक्रमातली ही आजची कविता. चित्र/फोटो पाहून कविता करायची. अशी की, जी वाचून डोळ्यापुढे चित्र उभे राहिले पाहिजे. कविता तर केलेय..चित्र उभे राहतेय का वाचून सांगा. 😊
वृत्त - वनहरिणी
८+८+८+८
हेच ना सख्या? वळण हे जिथे पहिली झाली भेट आपली
पाहिलीस का? किती लाजते अजूनसुद्धा गर्द सावली
छळण्यासाठी आला आहे खट्याळ मोठा उनाड वारा
कुणी घातला सांग ना मला तिच्याभोवती ऊन पहारा?
पाहिलीस का? अजूनसुद्धा शहारते ही तांबुस माती
ऐकू येते इथवर कानी हृदयामधली धडधड नुसती
तप्त जाहली आता ती ही घुमू लागले उष्ण उसासे
कुणी आणले शांत कराया दवबिंदूंचे कलश जरासे?
पाहिलेस का? वेलींनाही कळते आहे प्रीती-भाषा
बघ आतुरल्या लता कोवळ्या मिठीत येण्या मग हलक्याशा
का वृक्षांचा वेलींवरती इतका आहे सक्त दरारा?
पानांमागे लपवित गेल्या थरथरणारा लुब्ध शहारा
चल ना आता करू साजऱ्या लालगुलाबी प्रेम भावना
झेलत जाऊ कवडशातल्या धुंद कोवळ्या नजाकतींना
चराचराच्या अंगांगावर कोरत जाऊ आपण नक्षी
तुझ्याचवरती लुब्ध जाहले मीच रे सख्या मी कमलाक्षी
जस्मिन जोगळेकर
(PC श्री. चिंतामणी जोगळेकर सर)
बेष्ट काम
उत्तर द्याहटवाथँक्यू उमा 😍
हटवा