मणिमोहोर


गाठीभेटी_१

कोणाच्या? माणसांच्या? ना ना..याच जगातल्या माझ्या आवडत्या इतर काही गोष्टींशी..
एका ग्रुपवर मध्यंतरी गाठीभेटींबद्दल पोस्ट येत होत्या. त्या वाचून वाटलं गाठीभेटीबद्दल लिहायचं तर माणसामाणसांच्या व्यतिरिक्त आणखी काही वेगळं लिहूया म्हणून तेव्हा हे लिहिलं होतं. 

मनमोहक सोबत..

इकॉलॉजिकल सोसायटीच्या एका कोर्सला ऍडमिशन घेतली आणि तिथं महाजन सरांशी ओळख झाली. बॉटनी हा विषय सरांनी इतका सोपा करुन आणि सुंदर शिकवला की आम्ही सगळीजणं त्या विषयाच्या प्रेमातच पडलो. रस्त्यातून जाताना दिसणारी झाडं ओळखायची आणि लगेच त्याचं सायंटिफिक नाव सांगायचं हा आमचा एक खेळच होऊन गेला. 
    असंच एकदा वर्गात शिकवत असताना सरांनी काही दुर्मिळ झाडांची माहिती आम्हाला सांगितली. त्यांच्या स्लाईड्स दाखवल्या. त्यातलंच एक फुललेलं झाड मला आवडलं. 'मणिमोहोर' असं त्यांचं सुंदर नामकरण सरांनीच केलं होतं. पुण्यात काही ठिकाणी अजून हे झाड आहे असं त्यांच्या बोलण्यातून कळलं. आधीच झाडांच्या प्रेमात पडलेली मी हे झाड पाहायला उत्सुक झाले.लॉ कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, बंडगार्डन इथं जाऊन हे झाड त्याच्या वर्णनावरुन शोधलं. ते झाड, त्याची फुलं यांची आणि माझी आता प्रत्यक्ष ओळख झाली. याच्या मण्यांसारख्या टपोऱ्या कळ्या आणि त्याची मोहोरासारखी रचना पाहून त्याचं मणिमोहोर हे नाव किती समर्पक आहे असं वाटून गेलं. पहिल्यांदा जेव्हा हे झाड पाहिलं तेव्हा त्याला नुकत्याच कळ्या यायला लागल्या होत्या. तेव्हापासून मी त्यावर लक्ष ठेऊन होते. अखेर एक दिवस ते झाड संपूर्ण फुललं. सुंदर लाल केशरी फुलांनी सजलं. झाड ऊंच असल्यानं लांबूनच फुलं पहाण्यात समाधान मानत होते. पण नंतर हळूहळू फुलं गळून पडू लागली आणि मग ती हातात घेऊन पाहता आली.
    नंतर एकदा रविवारी आमच्या नेहमीच्या अड्डयावर म्हणजेच टिळक स्मारक मंदिरात JVP मध्ये गेले होते. JVP ने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची माहिती ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकांना सांगत उभी होते. सभोवती बरीच गर्दी होती. मधेच कधीतरी अगदी काही वेळासाठी माझ्यासमोरची गर्दी बाजूला झाली. त्यातून मला समोर फुलांचा सडा पडलेला दिसला. इतकी फुलं पडलेत आणि आपलं तिकडं आधी लक्ष कसं गेलं नाही असा विचार करत त्या झाडाकडे पाहिलं. झाड खूप ओळखीचं वाटलं. वाऱ्यानं त्याची पानं-फुलं हलत होती. जणू माझ्या गोंधळलेल्या अवस्थेकडे बघून मिस्कील हसत होती. भोवतीच्या गर्दीला एका मित्राकडे सोपवून ओढल्यासारखीच मी त्या झाडाकडे गेले. जवळून पाहिल्यावर खात्रीच पटली. हे तेच झाड होतं ज्यासाठी मी पुण्याभर फिरत होते. माझा आवडता मणिमोहोर इथं माझा सख्खा शेजारी होता आणि मला मात्र त्याचा काही पत्ताच नव्हता. माझ्या दृष्टीनं हा आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का होता. त्यादिवशी या सुंदर शेजाऱ्याशी मी ओळख वाढवून घेतली.
    असेच दिवस जात होते. पुणं सोडून मी तासगांवला आले. जुन्या दोस्तांना, शेजाऱ्यांना सोडून नवीन ठिकाणी रुळण्याचा प्रयत्न सुरु होता. इकडं आले तरी झाडांची ओढ कमी झाली नव्हती. सांगलीला जाता येता रस्त्यावरची झाडं बघण्यात, जुन्या माहितीच्या झाडांना ओळख दाखविण्यात, नवीन झाडांची ओळख करुन घेण्यात वेळ जात होता. असंच एका झाडानं लक्ष वेधून घेतलं. झाड उंच पण निष्पर्ण. बरेच दिवस तसंच बघत होते. वठलंय की काय असं वाटायला लागलं तोवर त्यावर छोटी , कोवळी पालवी दिसू लागली. पानं जून होऊन कळ्या दिसायला लागला. झाडाचं खोड, पानं पाहून आतून आवाज येतच होता की, झाड तुझ्या ओळखीचं आहे. पण खरं वाटत नव्हतं. आता कळ्या उमलल्यावर मग मात्र विश्वास ठेवावाच लागला. त्या झाडानं परत एकदा मला सुखद धक्का दिला होता. माझा लाडका मणिमोहोरच होता तो. माहेरचं कोणी अचानक समोर उभं ठाकल्यावर कसा आनंद, आश्चर्य वाटतो, अगदी तस्सं मला झालं. ते फुललेलं झाड, त्याची खाली पडलेली फुलं पाहून क्षणभर मला काही सुचेना. माझा आवडता शेजारी इथं पण भेटल्यानं मी किती वेळ त्याच्यापाशी रेंगाळत होते. जणू बरेच महिने मनात साठलेल्या गुजगोष्टी आम्ही करत होतो. 
    आता जाता येता प्रत्येकवेळी, त्याच्या प्रत्येक बहराला त्याच्याकडे माझी नजर जातेच. मला वाटतं, मला त्याच्या ऋणात राहिलं पाहिजे. मी पुणं सोडलं तरी त्यानं मात्र माझी साथ सोडली नव्हती.

जस्मिन जोगळेकर

फोटो सौजन्य---गुगल काका 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक