अ ल क
अ ल क
१) त्या गावात ती व्यक्ती प्रसिद्ध होती. त्या व्यक्तीच्याभोवती कायम अनेक सामान्य माणसांचा घोळका असे. या माणसांमधलं कोणी वर वर चढू लागलं तर ती व्यक्ती तिचा आपल्या शक्तीच्या जोराने बिमोड करत असे.
त्या गावाशेजारच्या जंगलात एक भला मोठा वृक्ष दिमाखात उभा होता. एक दिवस त्याच्या मुळाशी इवलासा कोंब बाहेर आला. तो हळूहळू मोठा होताना वृक्ष बघत होता..आधार देत होता.
काही वर्षांनी गावातली ती व्यक्ती म्हातारी होऊन मरण पावली. गावात एका कडेला आता तिचा पुतळा धूळ खात कावळ्यांना आधार देत उभा आहे.
इकडं तो वृक्षसुद्धा आता बऱ्याच वर्षांनी वठला आहे. पण तरी त्या वेलाच्या हिरव्यागार पर्णसंभारामुळे तो अजूनही मोहक दिसतोय.
२) उच्चभ्रू वस्तीतल्या एका आलिशान इमारतीत त्याचा आलिशान फ्लॅट होता. सगळ्या सुखसोयी पायाशी लोळण घेत होत्या. घरातल्या माणसांपेक्षा नोकरांची संख्या जास्त होती. सगळ्या आज्ञा त्यांच्याकडून झेलल्या जात होत्या. पैशाने मिळणारं सगळं होतं त्या घरात. पण..बायकोशी होणाऱ्या सारख्या भांडणांना कंटाळून तो त्या रात्री घरातून बाहेर पडला.
बाहेर इमारतीच्या कोपऱ्यातल्या पत्र्याच्या छोट्याश्या शेडमध्ये इमारतीचा वॉचमन समाधानाने जेवत बायको-मुलांशी गप्पागोष्टी करत बसला होता.
३) तिच्या खिडकीत येणाऱ्या सोनचाफ्यावर तिचं खूप प्रेम होतं. खतपाणी देत ती त्याची छान निगा राखायची. छोट्या रोपट्याचं आता छान झाड झालं होतं. त्याच्याच फांद्या तिच्या खिडकीत आल्या होत्या, ज्यांच्याशी ती गुजगोष्टी करायची.
दुर्दैवाने एका दुर्धर रोगाने तिला गाठलं. चार-पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ ती बेडवर होती. तिकडे चाफाही हळूहळू सुकायला लागला होता. शेवटी काळाने तिच्यावर घाला घातला. रक्षाविसर्जन तिच्या आवडत्या चाफ्याच्या बुंध्यात केलं गेलं.
आता चाफा खूप बहरलाय.
४) तिच्या घरासमोर बाभळीच्या झुडुपावर सुगरण पक्षी घरटं विणायचं काम मनोभावे करत होता. अधूनमधून मिसेस सुगरण जातीने येऊन कामावर लक्ष देत होती. तिने आपल्याशी संसार थाटावा म्हणून तो अगदी निगुतीने, काळजीपूर्वक तिला आवडेल असं घरटं बांधायच्या प्रयत्नात होता.
हे सगळं ती तिच्या घराच्या खिडकीतून अनिमिष नजरेने बघत असतानाच दारुच्या भपकाऱ्यासह पाठीवर पडलेल्या चामड्याच्या पट्टयामुळे तिची तंद्री भंगली.
५) स्टेजवरती तिच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा मारा होत होता. विविधरंगी पुष्पगुच्छ आणि हारांनी तिच्याभोवती वेढा घातला होता. पुस्तकावर तिची सही घेण्यासाठी ज्याची त्याची धडपड सुरु होती. वयस्क महिला बोटं मोडून तिची दृष्ट काढत होत्या. चाहत्यांच्या या कौतुकाने, प्रेमाने ती भारावून गेली होती. तरीपण तिला आतून काहीतरी कमी जाणवत होती.
चाहत्यांच्या गराड्यातून ती बाहेर आली आणि जेव्हा इवले इवले हात तिच्या गळ्यात विसावले, लालचुटुक छोट्याश्या ओठांनी तिच्या गालाच्या पाप्या घेतल्या तेव्हा तिने तिच्या यशाचे समाधान खऱ्या अर्थाने अनुभवले.
६) रात्र झाल्यावर झोकांड्या खात तो येईल आणि समोर वाढलेलं ताट दिसलं नाही की तुडव तुडव तुडवेल हे तिला माहीत होतं. झालंही तसंच..घरी आल्या आल्या तिला आईबहिणीवरुन शिव्या घालत लाथाबुक्क्यांनी तुडवलं. पण रांधून त्याला खाऊ घालायला घरात शिल्लक तरी कुठे काय होतं. मार खाऊन ती ही एका कोपऱ्यात मुटकुळं करुन झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी वडाची पूजा करायला जाणाऱ्या गर्दीत ती सर्वात पुढे होती.
७) आज सकाळपासून तिचं मन सैरभैर होतं. तिचं लाडकं वासरु गोठ्यात दिसत नव्हतं. गावभर शोधूनही ते सापडलं नव्हतं आणि गोठ्यातल्या आईचा आकांत ऐकवत नव्हता. शेवटी वासराच्या प्रेमापोटी ती जंगलात शोधायला निघाली होती. जंगलात शिरताना किती विचार डोक्यात येत होते तिच्या. वाघाने वासराची शिकार केली असेल हे पक्के मानून आधीच वाघाच्या कुळाचा उद्धार चालू होता तिच्या मनात.
विचारांच्या या तंद्रीतच समोरचं दृश्य पाहून ती एकदम थबकली. समोर एक वाघीण आपल्या पिल्लांबरोबरच तिच्या वासरालाही दूध पाजत होती.
८) एका छोट्या खेड्यात राहणारी ती लग्नाळू मुलगी. सिनेमाचं वेड असणारी नि शहराची ओढ असणारी. केवळ शहरात रहायला मिळावं म्हणून आजूबाजूच्या खेड्यातून आलेली कितीतरी चांगली स्थळं तिने नाकारली.
शेवटी तिच्या मनासारखं शहरातलं स्थळ तिला मिळालं आणि ती शहरवासी झाली. पुढे शहरातली धावपळ, दगदग, प्रदूषण, जंकफूड या अशाच कारणांमुळे जेव्हा तब्येत बिघडत गेली तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. तब्येत तपासून तिला औषधं देताना डॉक्टरांनी सल्ला दिला.
शक्य असेल तर या शहराच्या विळख्यातून दूर कुठेतरी एखादया खेड्यात जाऊन रहा. तब्येत लवकर सुधारेल.
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा