गाठीभेटी_२

माणसांच्या गाठीभेटी म्हटलं की कधी अशा भेटी हव्याहव्याशा वाटणाऱ्या असतात, तशाच काही नकोशा वाटणाऱ्याही असू शकतात. पण माणसं सोडून मी म्हणतेय तशा इतर गोष्टींच्या गाठीभेटी मात्र कधी नकोश्या वाटू शकत नाहीत. 😊

कालच्यासारखीच ही अजून एक गाठभेट....माझी आवडती दुसरी गोष्ट..

ज्योतिर्विद्या परिसंस्था.. नावावरुन ज्योतिष विषयक संस्था आहे असं वाटू शकेल. पण खगोलशास्त्र या विषयाशी संबंधित ही संस्था. 
    पुण्यात शिक्षणासाठी रहायला गेल्यावर एक दिवस मामाने सहज विचारलं..ही अशी एक संस्था आहे. त्यांचा आठ दिवसाचा बेसिक कोर्स उद्यापासून सुरू होतोय. इंटरेस्ट असेल तर जातेस का? तोवर नुसती मान वर करून आकाशातले चंद्र तारे बघत होते. म्हटलं बघूया तरी काय आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी टिळक स्मारकच्या आवारात ऑफिस मध्ये गेले. लगेच पैसे भरले आणि लगेच खाली लेक्चरला जाऊन बसले. सुरुवातीला मला वाटलं होतं की, आकाशदर्शन आणि फारतर त्या संदर्भातले स्लाईड शो असा कोर्स असेल. पण छे..ते शाळेतले नावडते विषय आठ दिवस का होईना सोबत आलेच. भौतिकशास्त्र आणि गणित. त्यात मी आर्ट्स वाली. लेक्चर मधलं बरंचस डोक्यावरून जात होतं. पण शेवटच्या दिवशी स्टार पार्टी होती. त्या उत्सुकतेपायी या दोघांना सहन केलं.  
   स्टार पार्टी म्हणजे काय कळत नव्हतं. पार्टी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं जे चित्र येतं त्याचा आणि याचा कुठं संबंध जुळेना. शेवटी गेले स्टार पार्टीला. एक रात्र पुण्याच्या लाईट पोल्यूशन पासून लांब..ती पूर्ण रात्र आकाशातल्या वेगवेगळ्या गोष्टींची गाठभेट घेत घालवायची होती ते तिथं गेल्यावर समजलं. मग काय जीव खुश! सुरुवातीला नुसत्या डोळ्यांनी दिसणारे काही ऑब्जेक्टस् दाखवले, मग दुर्बिणी जोडून त्यातून काही गोष्टी पाहिल्या. त्या पाहिल्यावर तर वेड लागणं बाकी होतं! 😍आपल्या दुनियेपुढं अजून एवढं असंही काही असू शकतं ही कल्पनाच कधी आपण केलेली नसते आणि समोर असं एकदम काही दिसलं तर किती खुश होतो आपण! कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होणार नाही अशा गोष्टी!  मग आकाशात नवीन काही उगवेपर्यंत स्लाईड शो, झोप घालवण्यासाठी अस्ट्रोनॉमिकल गेम्स अशी ती जंगी पार्टी त्या रात्री अनुभवली आणि मग तिथलीच झाले. दर महिन्याला साधारण अमावस्येच्या आसपास अशा पार्टीला जायचं.. जुन्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या..नवीन ओळखी करून घ्यायच्या यात मस्त दिवस जात होते. 
        मग संस्थेची मेम्बर झाले. मेम्बर्स साठी नंतर वेगळी स्टार पार्टी सुरू झाली. ज्यात नुसतं ऑब्झर्वेशन करायचं आणि सोडून द्यायचं असं नसायचं. तुम्ही जे काही पहाल त्याची प्रत्येकवेळी नोंद ठेवायची. थोडं अभ्यासपूर्ण निरीक्षण व्हावं हा उद्देश. मग यात कधी उल्का वर्षावाची नोंद, कधी एक रात्रीत दुर्बिणीतून जास्तीत  'एम ऑब्जेक्ट' कोण बघतोय अशी स्पर्धा असे वेगवेगळे प्रकार असायचे. 
    आता हे 'एम ऑब्जेक्ट' काय प्रकार? आकाशात ग्रह ताऱ्यांबरोबर अनेक तारकापुंज किंवा गॅलेक्सी आहेत. त्या ओळखू याव्यात म्हणून त्यांना नंबर दिलेत. फ्रेंच शास्त्रज्ञ चार्ल्स मेसीयरने असे ऑब्जेक्ट शोधले म्हणून त्याच्या नावाचा एम आणि पुढं नंबर. असा एक ११० ऑब्जेक्टस् असणारा कॅटलॉग त्याने तयार केला. ते हे एम ऑब्जेक्ट. जर आकाश निरभ्र असेल, तुमची दृष्टी चांगली असेल आणि त्या ऑब्जेक्ट ची जर जागा माहीत असेल तर यातले काही ऑब्जेक्ट आपण नुसत्या डोळ्यांनी बघू शकतो. पण दुर्बिणीतून त्यांना बघणं म्हणजे..आहाहा!! अक्षरशः छोट्या मोठ्या तारकांचा एका ठिकाणी खच! नजर हटणारच नाही असं दृश्य! 

त्या रात्री त्यांची झालेली भेट ही माझ्यासाठी खरंच ग्रेटभेट होती. मला कायम असं वाटतं की, या अशा गोष्टी पाहिल्या की, आपल्यालाच आपण कुठं आहोत, आपली जागा काय याची जाणीव होते आणि हीच जाणीव मिळालेल्या या आयुष्यात चांगलं वागण्याची प्रेरणा देते. 😊

(कोणाला या विषयात इंटरेस्ट असेल तर तुम्हीही या स्टार पार्टीत सहभागी होऊ शकता. त्यासाठी संस्थेचे मेम्बर व्हायला हवं असं नाही. लोकांसाठी दर महिन्याला एक पार्टी असतेच अर्थात पावसाळ्याचे दिवस सोडून)

जस्मिन जोगळेकर

PC अर्थात परत गुगल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक