भेट तुझी माझी...
गाठीभेटी_३
मागच्या दोन दिवसांसारखं आजही....गाठीभेटी पण माणसांच्या नव्हे..
माझ्या पुण्यातल्या एका ग्रुप बरोबर मी स्ट्रीम ऑफ जॉय म्हणून कर्नाटकात ठिकाण आहे तिथं गेले होते. त्या ठिकाणाबद्दल नाही..पण याठिकाणी भेटलेल्या आणि मला आवडून गेलेल्यांबद्दल..
स्ट्रीम ऑफ जॉय ला जायचं ठरलं आणि ग्रुप मधले तिथं आधी जाऊन आलेले तिघंजण अधून मधून तिथली माहिती आम्हाला देऊ लागले. त्यातच एक दिवस त्यांच्याकडून ट्रोगॉन चा उल्लेख ऐकला. तिथं दिसणारा हा एक पक्षी. हे सगळेजण त्याच्या प्रेमात होते. किती कौतुक करत होते त्याचं. तो तसा..त्याला आम्ही असं करताना पाहिलं..कसला भारीये..वगैरे वगैरे..आता एवढं काही एखाद्याबद्दल ऐकलं की त्याला कधी एकदा पाहतोय असं होणारच ना! आमचंही तसंच झालं. कधी एकदा SOJ ला जातोय आणि या ट्रोगॉन ला भेटतोय असं झालं.
ठरल्याप्रमाणे तिथं पोहोचलो. त्या परिसरात पोहोचल्यावर नजर उगाच आपलं ट्रोगॉन दिसतोय का शोधात होती. पण त्यावेळीच काय...पुढचे चार दिवस त्याने दर्शन दिलं नाही. तिथं पोहोचल्यावर खाण्याच्या तीन वेळा आणि झोपण्याची थोडी वेळ सोडली तर आम्ही अखंड त्या जंगलातून फिरत होतो. कधी मळलेल्या पायवाटेवरून तर कधी नवीन पायवाट करत. इतर पक्षी दिसत होते. पण ट्रोगॉन..छे! रुसून कुठंतरी कोपऱ्यात लपून बसलाय की काय वाटायला लागलं. सगळे नाराज.. पुण्यातून SOJ ला जाताना ट्रोगॉन पहायचाच यावर ठाम होतो. पण आता तिथून निघायची वेळ आली तरी दिसत नाही म्हटल्यावर, ठीक आहे दिसला तर दिसला नाहीतर असो..यावर येऊन पोहोचलो होतो. पण आशा काय पूर्ण सोडली नव्हती.
त्यादिवशी दुपारी तट्ट जेवण झालं होतं नेहमीप्रमाणेच. तिथंच गप्पा मारत बसलो होतो. त्यातच लवकर जंगलात भटकायला जायची टूम निघाली आणि त्याप्रमाणे गेलोही. दुपारची उन्हाची वेळ..पण जंगलात फिरताना मज्जा..ट्रोगॉन दिसावा अशी इच्छा होतीच मनात. पण आता दिसला नाही तर नाराज व्हायचं प्रमाण कमी झालं होतं. तर फिरत असताना थोड्यावेळाने एका मित्राने सगळ्यांना खूण केली. आम्ही सगळे चिडीचूप. रस्त्याच्या कडेने सगळे एका रांगेत हाताची घडी तोंडावर बोट स्थितीत. तो खूण करतोय त्या दिशेने बघत उभे. तर झालं काय होतं की, तिथं झाडांच्या गर्दीत त्याला ट्रोगॉन ची मिसेस दिसली होती. ती आहे म्हणजे मिस्टर ट्रोगॉन नक्कीच असणार अशी त्याची अपेक्षा. आत्ता नसले तरी ते इथं येणारच म्हणून आम्ही सगळे तिथेच स्टॅच्यू झालेले. आणि..आणि खरंच तो म्हणत होता तसं मिस्टर ट्रोगॉन आले की तिथं खरंच. एकदम दिमाखदार एन्ट्री..त्या हिरव्या गर्द झाडीत त्याचा रंग काय उठून दिसत होता. व्वा! त्याची तिथं एन्ट्री झाल्यावर तर काय! दोघं एकदम रंगात आले. म्हणजे तेव्हा ट्रोगॉन चं नुसतं दर्शन नाही तर त्यांचा रोमान्स पाहायला मिळाला. तिच्यामागे त्याचं धावणं..आपलं उडणं, प्रेमानं चोचीत चोच घालणं.. काय काय चाललं होतं. आम्ही स्तब्ध उभे त्यामुळं त्यांना काही डिस्टर्ब होत नव्हतं. किती वेळ हे सगळं चाललं होतं. मधेच गायब व्हायचे पण परत तिथेच यायचे. कंटाळायचं नावच घेत नव्हते दोघं. आत्तापर्यंत दिसला नव्हता आणि आता दिसला तर जायचं नाव घेत नव्हता. मनसोक्त बघून घेतलं त्याला आणि मग आम्हीच आता निघूया म्हणून तिथून निघालो. अनपेक्षितपणे झालेली आणि त्याच्या प्रेमात पाडणारी ही भेट.
याच दौऱ्यात तिथं जवळच श्रीशिला म्हणून भाग आहे ज्याला तिथली लोकं सिसिला म्हणतात तिथं गेलो. तिथली भेट तर...वाटलं नव्हतं मला असं कोणी तिथं भेटेल. तिथं नदीच्या काठी एक मंदिर आहे. तिथल्या इतर मंदिरांप्रमाणेच प्रसन्न. तर त्या नदीत हे भले मोठे इतके महाशीर होते की बस....महाशीर म्हणजे विष्णूचा मत्स्यावतार. त्यामुळं इथले लोक त्यांना मारत नाहीत. म्हणूनच त्यांची संख्या आणि त्यांचा आकार खूप वाढलेला. काठावर चुरमुऱ्याची पोती घेऊन लोकं उभी. चुरमुरे घातले की ते खायला हे महाशीर झुंडीने येतात. बाकी लोकं पुलावरून घालत होते. आम्ही पलीकडे जाऊन पाण्यात उतरलो. तिथून चुरमुरे घातल्यावर अगदी पायाशी सगळे हे भले मोठे आकार जमा झाले. सुरुवातीला ती झुंड पाहून थोडी भीती वाटली. पण ते महाशीर इतके गोड, प्रेमळ होते..पाय चाटायला लागले. गुदगुल्या होत होत्या तरी तशीच उभी राहिले. ते धाडसी तर मी का होऊ नये. म त्यांच्या पाठीवरून हळूहळू हात फिरवायला लागले. कसली मस्त मऊ गुळगुळीत पाठ होती. फार भारी वाटत होतं ते सगळं. पण पोत्यातले चुरमुरे संपले म त्यांनी पण आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. पण हा अनुभव खूपच अविस्मरणीय होता माझ्यासाठी.
आपण कोणाला त्रास दिला नाही तर निसर्गातलं कोणीही आपल्याला त्रास देत नाही. उलट मायाच देतील. नाही का..😊
ट्रोगॉन चा फोटो गुगल वरून घेतलाय. महाशीर...फोटोपेक्षा त्यांना भेटणं जास्त छान 😀
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा