भृंगमिठी
हा फोटो पाहून काय वाटलं? एखाद्या नाजूक सुंदर फुलावर माशी बसलेय असं दिसतंय ना? पण ही तर शुद्ध फसवणूक आहे बरं का..😀 असे कितीतरी चमत्कार निसर्गात पहायला मिळतात. त्याची ओढ वाटण्याचं हे एक कारण. तर..हे फुल आहे 'बी ऑर्किड'..भुंग्यांना फसविण्यासाठी त्याच्या एका पाकळीचं रुपांतर त्याने माशीमध्ये करुन घेतलंय. अगदी हुबेहूब नक्कल! फक्त माशी बसल्याची नक्कल हे फूल करत नाही, तर ती उडतेय असा आभासही त्याच्याकडून निर्माण केला जातो. झाडावरच्या एका लांब लवचिक काडीवर ही फुलं उमलतात आणि वारा आला की त्यावर मस्त डोलतात. आता लांबून पाहिलं की, ती लवचिक, पातळ काडी दिसत नाही. असं वाटतं की फुलाभोवती माशाचं फिरत आहेत. याहूनही भारी म्हणजे या फुलांचा वास अगदी मादी माशीच्या अंगाच्या वासासारखा असतो. म या सगळ्याला भुलून नर माशी त्याच्या जवळ येणारच ना! सगळं किती आपल्या कल्पनेबाहेरचं आहे न! नर त्या फुलांच्या फसव्या पाकळीवर मादी समजून बसतो. पण कितीवेळ झाला तरी मादी तिथेच स्थिर राहते. म तो त्या पाकळीशी भरपूर झटापट करतो. या सगळ्यात नराचं डोकं परागकणांवर घासलं जातं. त्या फुलाचा नाद सोडून तो जवळच्याच वेगळ्या वासाच्या फुलावर माशी समजूनच जाऊन बसतो. म काय..त्या झाडाला जे अपेक्षित असतं ते मिळून जातं. नराच्या डोक्यावर चिकटलेले परागकण दुसऱ्या स्त्रीकेसरांवर पडून परागवहनाचा कार्यभाग उरकला जातो. आहे न गंमत!
निसर्गातल्या अशाच गमतीजमती आपल्याला त्याच्याकडे आकृष्ट करुन घेतात आणि मग त्याच्यात रमल्यावर तर काय! जे जे अनुभवू ते कधी फक्त नि फक्त आपल्याच मनाच्या कोंदणात जपून ठेवावं वाटतं तर कधी कधी व्यक्त व्हावं वाटतं. बी ऑर्किड करत असलेली ही फसवणूक वाचल्यावर खूप आश्चर्य वाटलं. किती दिवस विषय मनात घोळत होता. व्यक्त करावा वाटत होतं पण कशाची सोबत घ्यावी ते नीट कळत नव्हतं. मग कवितेच्या ग्रुप मध्ये 'मदिरा' वृत्त शिकल्यावर वाटलं या वृत्तात हा विषय मांडता येतोय का बघावं. म्हणून हा प्रयत्न केलाय. 😊
वृत्त – मदिरा
स्वागत वृक्षलता करती उतरे अलवार वसंत वनी
भृंग तिथे कुसुमी रमता प्रित मोहरली हलकेच मनी
ते फुल ही भलते फसवे भ्रमरास तिथे ललनाच दिसे
मोहवुनी भुलवी भ्रमरा मग मादक सोडत गंध ठसे
लाजत बावरले खुलले पडताच अचानक भृंग मिठी
मोहकसे हसले अधरी अन गुंफविली अनिवार दिठी
तो प्रणयोत्सुक भृंग अता मिलनास अधीर अधीर असा
प्रेमरसात पुरा भिजता सुखस्पर्श घडे मग नाजुकसा
चंचल भृंग जरी थकला परि आस तिथे न पुरी मिटली
मोहकशा कुसुमावरुनी प्रित ही दुसऱ्या कुसुमी जडली
गंध-रुपी सगळे फसवे रुसले अधिरे मन होत खुळे
दावत खास परागकुपी हलके नवख्या कुसुमास मिळे
रान वनी मग साज नवा नव सुंदर रंगछटा उधळे
हे घडले कळले न कुणा बघता बघता घडले सगळे
जस्मिन जोगळेकर
(फोटो गुगलवरुन साभार)
खूप सुंदर माहिती, निसर्गासारखा दुसरा शिक्षक नाही म्हणतात ते खरंय. तुमच्या लेखासोबत कवितेची साथ खूप सुंदर👏👏👏
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद!😊
हटवाअप्रतिम. नवीन माहिती मिळाली. काव्य पण सुंदर. त्यातून शब्दचित्र सुंदर पुणे साकारले गेले आहे.
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद!😊
हटवाललित लेखन आणि काव्य दोन्ही प्रकारात जस्मिन तुझी लेखणी हातात हात गुंफून विहरत आहे.साधेपणातल सौंदर्य निखळ आहे.खूप छान भृंगमिठी.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 🙏🙂
उत्तर द्याहटवा