पुस्तक परिचय



'जांभ रंगा आला दारी तळी गुलालाची रास

माघ मोहरला अंगी जरा बिलगुनी हास' 


'वास नाही ज्या फुलांना फक्त ती पाहून घे

धुंद आहे गंध ज्यांना तो तिथे जाऊन घे' 

कविवर्य बा.भ.बोरकरांच्या कवितांमधल्या या ओळी. त्या वाचल्यावर कदाचित असं वाटेल की, कोणत्या कविता संग्रहाचा परिचय करुन देतेय की काय. पण नाही.. आजचा परिचय आहे तो या आणि अशाच सुंदर काव्यपंक्तीचा उल्लेख असलेल्या 'फुलवा' या डॉ.श्रीश क्षीरसागर यांच्या वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचा. वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय रसिक, निसर्गप्रेमी असे हे डॉक्टर. २००४ साली लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत फुलांवर सदर लिहिण्याचे काम त्यांनी अत्यंत संपन्नतेने पूर्ण केले. त्याच लेखांचा थोडीफार भर घालून एकत्रितपणे निघालेला संग्रह म्हणजे फुलवा हे पुस्तक होय. डॉक्टरांचा वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास ही कौतुकाची गोष्ट आहे. शास्त्रीय माहितीचे पुस्तक म्हटले की, कधी कधी जर त्या विषयाशी काही संबंध नसला तर पुस्तक वाचन कंटाळवाणे होऊ शकते. पण इथे नेमके हेच टाळण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. जंगलातील किंवा आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या फुलझाडांची यात शास्त्रीय माहिती आहे.. पण ती कशी..तर सहज सोप्या भाषेने सजवलेली, शास्त्रीय नावामागची कहाणी, इतिहास सांगून खुलवलेली, वाल्मिकी, अष्टांगसंग्रह, कालिदास इथपासून संत ज्ञानेश्वर, तुकाराम ते बालकवी, शांता शेळके, बा.भ.बोरकर, संदीप खरे यांच्यापर्यंतच्या साहित्यिकांच्या काव्यपंक्ती विषयानुरुप वापरुन समृद्ध केलेली, स्वतः काढलेल्या छायाचित्रांनी नटलेली. यातल्या प्रत्येक लेखाचे नावही अगदी विचार करुन, आकर्षक वाटेल किंवा लेखात काय असेल याची उत्सुकता वाढवणारी आहेत हे अनुक्रमणिकेच्या पानावरुन हे आपल्या लक्षात येईल. तिथे 'अनुक्रमणिका' या नेहमीच्या शब्दाऐवजी त्यांनी वापरलेला 'आरास' शब्दाच्या प्रेमात पडूनच आपले पुढचे वाचन सुरु होते. एकूणच बऱ्याच विषयांची थोडक्यात माहिती यातून एकत्रितरित्या मिळू शकते असं मला वाटतं. मुख्य विषयाबरोबरीने येणारे इतरही विषय उत्कंठा वाढविणारे नक्कीच आहेत. एखादी काव्यपंक्ती वाचली की किंवा आयुर्वेदातले त्यासंबंधीचे उल्लेख वाचले की, हटकून असे वाटेल की..'अरेच्या हे ही खूप सुंदर वाटतंय. आणखी माहिती मिळवायला हवी याची.' असं वाटणं यातही मला पुस्तकाचं यश दिसतं. 

वर म्हटलं तसं यातल्या लेखांची नावं फार सुंदर आणि समर्पक आहेत. 'गिरीमल्लिका', 'देणं अधिकाचं', 'फसवणूक', 'दुर्गंधाचं देणं' अशी नावं वाचली की काय असेल बरं यात असं नक्कीच वाटून जाईल.. हो ना? ही उत्सुकता योग्यरितीने प्रत्येक लेखातून शमविली जातेय.  आता फसवणूक म्हटल्यावर झाडांवर पुस्तक असल्यामुळे झाड काही फसवणूक करत असेल असा अंदाज येऊ शकतो. पण कोणाची आणि कशाप्रकारे हे कळायला पुस्तकच वाचायला हवे. ते वाचल्यावर आपल्याला नक्कीच कळून येईल की ही वनस्पतिसृष्टी किती अद्भुत आहे.  

शास्त्रीय माहिती द्यायची म्हणजे पर्यायाने झाडांची शास्त्रीय नावेही आलीच. उच्चारायला तशी अवघड नावं. पण विशिष्ट झाडांचं बारसं विशिष्ट नावाने होण्यामागचा इतिहास तेवढाच रंजक. ती माहितीही या पुस्तकात लिहून लेखकाने शास्त्रीय माहितीचे रुप बदलले आहे. 'औजिनिया उजिनेन्सिस' हे शास्त्रीय नाव आहे काळा पळस किंवा तिवस या झाडाचं. आता हे शास्त्रीय नाव कसं पडलं? तर चक्क आपल्या मध्यप्रदेशातील उज्जैन शहरावरुन. क्षिप्रा नदीकाठच्या उज्जैन परिसरात ही झाडं खूप मोठ्या प्रमाणावर आढळतात. म्हणून त्या भागावरुन या झाडाला नाव मिळालं आहे. म्हणजे झाडाचे रंगरुप, त्याचे वैशिष्ट्य किंवा त्याचा संशोधक यावरुन फक्त नाव देतात असं नाही. आहे ना गंमत! 

लेखक आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे संस्कृत साहित्याचा त्यांचा अभ्यास आहेच. पण बरोबरीने मराठी साहित्याचा त्यांचा व्यासंगही मोठा आहे. वेगवेगळ्या ग्रंथातले किंवा कवितांमधले त्यांनी दिलेले दाखले पुस्तकाची शोभा, साहित्यिक मूल्य वाढविणारे आहेत. संस्कृतचा अभ्यास असल्यामुळे प्राचीन साहित्यातून उल्लेख केलेल्या झाडांची माहिती कळू शकते. हा ही एक खरंतर ज्यांना संस्कृतची आवड, जाण आहे त्यांच्यासाठी अभ्यासाचा विषय होऊ शकतो.(माझ्या अंदाजाप्रमाणे पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुरुची पांडे यांनी प्राचीन संस्कृत साहित्यातील पक्ष्यांचे उल्लेख यावर अभ्यास करुन प्रबंध लिहीला आहे.) 

हे पुस्तक अधिक देखणं होण्याचं कारण म्हणजे प्रत्येक लेखाबरोबर दिलेली रंगीत छायाचित्रे. स्वतः लेखकाने काढलेली छायाचित्रे यात समाविष्ट केली आहेत. चित्र किंवा छायाचित्र पाहिलं की, एखादा विषय पटकन समजून जातो. तसं आहे..छायाचित्र पाहिलं की लेखातली माहिती डोक्यात फिट बसते. या पुस्तकाच्या बाबतीत असं नक्कीच होतं. 

कधी कधी आपल्याला काही सांगायचं असतं पण योग्य शब्द सापडत नाहीत. पण तेच एखाद्या कवितेत किंवा साहित्यात सापडून जातं. लेखकाकडे शब्दसंपत्ती अर्थात भरपूर आहेच. पण पुस्तक पूर्ण होण्याचं श्रेय ते स्वतःकडे घेत नाहीत. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संत तुकारामांचा अभंग त्यांची मदत करतो. 

'आपुलिया बळें नाही मी बोलत। सखा भगवंत वाचा त्याची।।

साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी। शिकविता धणी वेगळाची।।

काय म्यां पामरें बोलावी उत्तरे। परि त्या विश्वंभरे बोलविले।।

तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा। चालवी पांगळा पायांविण।।' 

एकूणच पुस्तक प्रसिद्ध होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व या पुस्तकात पहायला मिळतात असं मला वाटतं. सर्वच दृष्टीने हे पुस्तक अतिशय देखणं आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांना वनस्पतीशास्त्राचे नावाजलेले प्राध्यापक श्री. श्री.द.महाजन सरांची कौतुकाची थापही मिळालेली आहे. पुस्तक वाचल्यावर नवीन वेगळ्या विषयाची आवड उत्पन्न होईल हे नक्कीच आणि सध्या  सगळ्यांच्याच मनात अशी आवड उत्पन्न होणे ही पर्यावरणाच्या दृष्टीने निकडीची गोष्ट आहे असं मला वाटतं. 


जस्मिन जोगळेकर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक