पुस्तक परिचय
आपल्या घरात जेव्हा कोणतंही मंगलकार्य असतं तेव्हा जसं आपण सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचं स्मरण करतो तसं काहीसं 'चौघीजणी' या पुस्तकाच्या बाबतीत माझं होतं. कुठेही पुस्तकं, वाचन असा विषय निघाला की, मला पहिल्यांदा मनात येतं ते हेच पुस्तक. काही पुस्तकं कशी असतात ना..जी आपल्या संग्रही असावीतच असं वाटतं, त्यातलं हे पुस्तक. मनात येईल तेव्हा कपाट उघडून पुस्तक बाहेर काढावं आणि मनात येईल ते पान उघडून वाचायला सुरुवात करावी..तसं हे पुस्तक. अनुवाद आहे असं कुठेही वाटणार नाही असं हे अनुवादित पुस्तक.
कवयित्री शांता शेळके यांचा उल्लेख कुठे वाचनात, ऐकण्यात आला की, आपल्या मनात त्यांच्या असंख्य सुमधुर गाण्यांचे सूर डोकवायला लागतात. कवयित्री, गीतकार म्हणून त्या श्रेष्ठ आहेतच..पण त्याबरोबरच मला पटकन आठवतो तो 'लिटल् वुइमेन' चा त्यांनी केलेला अनुवाद. १८६८ मध्ये प्रकाशित झालेली अमेरिकन लेखिका लुईसा मे अलकॉट यांची ही कादंबरी खूपच लोकप्रिय झाली होती. त्यावर पिक्चरही निघाले, बऱ्याच भाषांत अनुवाद केले गेले. या कादंबरीचाच मराठी अनुवाद शांता शेळके यांनी केला आहे..'चौघीजणी.'
अनुवादही तितकाच समर्थ असा. त्यातली प्रत्येक घटना आपल्या अवतीभवती घडतेय असं वाटावं इतका सजीव. मार्च कुटुंब, त्यांच्या छोट्या चार मुली, या कुटुंबाची विश्वासू मेड, शेजारचे लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा छोटा नातू यांच्याभोवती ही कथा फिरत राहते. त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर पात्रांचा वावरही यात छान मांडला आहे. मेग, ज्यो, बेथ आणि ऍमी या चौघी बहिणींचा स्वभाव एकमेकींपेक्षा खूप वेगळा, पण त्यांच्या एकमेकींवरच्या अतूट प्रेमाच्या आड काही स्वभाव येत नसतो. प्रत्येकीची स्वप्नं, त्यांच्या अडचणी, त्यांच्यातली भांडणे, एकमेकींची घेतलेली काळजी, सुख-दुःख यांचं यातलं अगदी साध्या शब्दातलं वर्णन वाचलं की, चौघीही एकदम आवडून जातात. यातले काही प्रसंग मनाला चटका लावून जातात, तर काही निखळ हास्य फुलवून जातात. पण एकूणच हृदयस्पर्शी प्रसंगांनी हे पुस्तक छान नटलं आहे.
पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात थोडी कुरकुरत होते. मार्च कुटुंब खरंतर खानदानी कुटुंब असतं. पण आता गरिबीचा अनुभव घेत असतं. या गरिबीवरच त्यातल्या मेग, ज्यो, ऍमी थोड्या कुरकुरत असतात. पण बेथ मात्र शांत समजूतदार असते. अर्थात या तिघीही जरी कुरकुरत असल्या तरी त्यांना परिस्थितीची पूर्ण जाणीव असते. कुटुंबासाठी, समाजासाठी आपले आई वडील काय करतात याची जाण त्यांना असते. आपल्या आई वडिलांवर त्यांचं खूप प्रेम असतं. वडील युद्धभूमीवर असल्यामुळे त्यांचा सहवास या मुलींना कमी मिळत असतो आणि पुढेही मिळेल की नाही अशा शंकेची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असतेच. आईच्या प्रेमात थोड्या धाकात त्या वाढत असतात. यातली आईची व्यक्तीरेखाही खूप छान आहे. मुलींना वडिलांचंही प्रेम ती देतेय, उत्तम संस्कारही करतेय, स्वतःच्या कृतीतून ती मुलींना बऱ्याच गोष्टीही शिकवतेय, त्यांच्या चांगल्या वागण्याचं जसं कौतुक करतेय तसंच त्यांच्या चुकाही अशा पध्दतीने त्यांच्या निदर्शनास आणून देतेय की, त्यां ती चूक परत कधीच करणार नाहीत. मुली आणि आई यांच्यातील प्रसंगांचे वर्णन खूपच सुंदर आहे. महत्त्वाचे म्हणजे घरातला प्रत्येक सभासद 'आपल्या' घरासाठी म्हणून आपापल्या परीने राबत, कष्ट करत असतो. गरिबीतही त्या आपलं आयुष्य मस्त एन्जॉय करतात. एका मऊ रेशमी नाजूक लडीने त्या सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलेले आहे.
चौघींमध्येही काही न काही कला आहे. तिच्या जोरावर त्यांना मोठं व्हायचं असतं. सुंदर दिसण्याचा थोडा गर्व असणारी अशी मेग कुटुंब वत्सल, सात्त्विक आणि पापभिरु..तिची काही फार मोठी ध्येय नाहीत. उत्तम संसार करायचं तिचं स्वप्न आहे. श्रीमंत नवरा मिळावा, इतर मैत्रिणींसारखं नटावं असं मनातून तिला वाटत असतं. ज्यो आहे ती एकदम बिनधास्त. मनात येईल तसं वागणारी, जरा अस्ताव्यस्त राहणारी, मुलींसारखं नटणं मुरडणं तिला आवडत नाही. थोडक्यात सांगायचं तर टॉम बॉय.. एखाद्या मुलावर जशी घराची जबाबदारी टाकू तसं तिचे वडील तिला मुलगा मानून तिच्यावर जबाबदारी टाकून गेलेले असतात आणि ती निभावायचा ज्यो आटोकाट प्रयत्न करत असते. लिखाणाची उत्तम कला तिच्याकडे असते. नाटक लिहून ती घरातल्या घरातच बसविणे आणि त्याचे प्रयोग करणे हे त्यांच्या आनंदाचे एक कारण असते. ती जबाबदारी ज्यो वर असते. तिला मोठी लेखिका व्हायची जबरदस्त इच्छा असते.
तीन नंबरची बेथ..स्वभावाने अतिशय प्रेमळ, लाघवी पण लाजाळू आणि तब्येतीने थोडी कमजोर. पण सर्वांची अत्यंत लाडकी. त्यामुळं ती मेड बरोबर घरातल्या कामांना हातभार लावत असते. पियानो हा तिचा विक पॉईंट. कसे काय जाणे पण तिला तिचे भवितव्य माहीत असते त्यामुळे ती काही भविष्यातली स्वप्न फार रंगवत नसते. सर्वात धाकटी ऍमी. ही सुद्धा दिसायला सुंदर, थोडी शिष्ठ. चित्रकला ही तिची आवड आणि मोठेपणी चित्रकार होऊन नाव कमवावं ही तिची इच्छा असते. अशा चार अतिशय प्रेमळ बहिणींची ही कथा. त्याबरोबरीने येणाऱ्या इतर पात्रांची साखर पेरणीही एकदम लाघवी. लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा नातू लॉरी ही सुद्धा यातली महत्त्वाची पात्र म्हणायला हरकत नाही. मुलींचे आणि मिश्किल लॉरीचे स्नेहपूर्ण संबंध, लहान असताना त्यांच्यात घडलेले प्रसंग आणि मोठेपणीचे प्रसंग खूप छान वर्णन केले आहेत. त्याच बरोबर आँट मार्च, जॉन, प्रो. भाअर या व्यक्तिरेखाही छान रंगवल्या आहेत. पुस्तक वाचायला सुरुवात केली की एका दमातच वाचावं असं हे पुस्तक आहे. या चार बहिणींची स्वप्न पूर्ण होतात का? त्या मार्गावर त्यांना कोणते अडथळे येतात, त्यांना त्या कशा सामोऱ्या जातात? काही आशादायी, आनंदी प्रसंग..ते त्या कसे साजरे करतात? बेथचं पुढे काय होतं? अशा प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर पुस्तक जरुर वाचायला हवं. मी खात्रीने सांगू शकते की, पुस्तक वाचलं आणि आवडलं नाही असं होणारच नाही.
लुईसा मे अलकॉट यांनी त्यांच्या अनुभवांवर हे पुस्तक लिहिले आहे. ज्यो हे लेखिकेचे प्रतिरुप. १८६८ साली हे प्रथम प्रसिद्ध झाले. जितक्या आत्मियतेने लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे, तितक्याच आत्मियतेने शांता शेळके यांनी अनुवाद केला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत या पुस्तकाच्या लोकप्रियतेचे श्रेय शांताबाई मूळ पुस्तकाच्या वाड्•मयीन आणि भावनिक संपन्नतेला देतात. हे बरोबर असलं तरी पण पुस्तक वाचल्यावर आपणाला नक्कीच जाणवतं की मराठीत हे एवढं लोकप्रिय होण्याचं कारण शांताबाईही आहेत.
चेहऱ्यावर कधी हसू आणणारे, कधी डोळ्यात नकळत पाणी आणणारे, कधी मन हेलावून टाकणारे, कधी मनात आनंदाच्या लहरी निर्माण करणारे, नकळत संस्कार करणारे असे हे नितांत सुंदर पुस्तक.. साधी, सोपी, सरळ भाषा..कुठेही बटबटीतपणा अजिबात नाही..कंटाळा विसरायला लावणारं हे पुस्तक जरुर वाचा आणि संग्रहीसुद्धा ठेवा.
पुस्तक परीक्षण वाचल्यावर ते पुस्तक मिळवून वाचण्याची उत्कंठा निर्माण होते, हे आपले यश वादातीत आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊
उत्तर द्याहटवा