पुस्तक परिचय
आपले रोजचे आखीव रेखीव आयुष्य सोडून, कम्फर्ट झोन सोडून काही दिवस का होईना पण एका अनिश्चित आयुष्याच्या वाटेवर पाऊल टाकणे म्हणजे धाडसच म्हणावे लागेल. रोज घड्याळाबरोबर पळणारे आपण काळ वेळ विसरायला लावणाऱ्या आयुष्यात तग धरु शकू का अशी शंका मनात येते. ही अनिश्चितता तरी कशी..रात्री पाठ टेकायला जागा मिळेल का?..माहीत नाही, जेवायला काही मिळेल का? माहीत नाही..मूलभूत गरजांबद्दलच काही माहीत नाही तर बाकीच्या गोष्टी लांबच. अशा आयुष्यात प्रवेश करण्यासाठी मनाची किती तयारी करावी लागत असेल ना! पण हेच धाडस तीन स्त्रियांनी केलं, ज्यातल्या दोघींनी ते पूर्णत्वाला नेलं आणि तिसरीने त्यांना मधला काही काळ साथ दिली. कायम शहरी जीवनात राहिलेल्या तिघींनी नर्मदा परिक्रमा करण्याचे मनात योजले आणि ते सत्कर्म बरेच काही शिकत पूर्ण केले. त्या तीन स्त्रिया म्हणजे भारती ठाकूर, निवेदिता खांडेकर आणि उष:प्रभा पागे. पैकी भारती ठाकूर आणि निवेदिता खांडेकर यांनी परिक्रमा पूर्ण केली, तर उष:प्रभा पागे या काही काळ त्यांच्या सोबत होत्या. या परिक्रमेच्या संदर्भातल्या सगळ्या नोंदी, अनुभव भारती ठाकूर मॅडमनी दैनंदिनीत लिहून ठेवले होते. त्याचं पुनर्लेखन म्हणजे 'नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा' हे गौतमी प्रकाशनने काढलेले पुस्तक.
आत्तापर्यंत अनेक जणांनी परिक्रमा केली असेल. त्यातल्या काहींनी त्यावर पुस्तकंही लिहिली आहेत. प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाची श्रद्धा यानुसार ही पुस्तकं विषय एकच असला तरी वाचायला वेगळी आहेत. पण ठाकूर मॅडमच्या या पुस्तकाबद्दल मी असं म्हणेन की, त्यांचं हे पुस्तक अजून खूप वेगळं आहे. नावावरुनच आपल्या लक्षात येईल की ही नुसती परिक्रमा नाहीये, तर ती एक अंतर्यात्रा आहे. जी परिक्रमा संपली तरी अजून सुरुच आहे. ही फक्त परिक्रमा नाहीये. नर्मदा मैय्याबद्दल वाटणारी श्रद्धा तर यातून पदोपदी जाणवतेच पण त्याशिवायही आणखी काही कारणं ही परिक्रमा करण्यामागे आहेत. मैय्याचा परिसर, तिच्या खोऱ्यातील पर्यावरण, तिथलं लोकजीवन, संस्कृती आणि मुख्य म्हणजे स्वतःचा स्वतःशीच संवाद साधणे..पण परिक्रमा पूर्ण झाल्यावर लेखिकेच्या मतानुसार ही कारणं त्यांना सबबी वाटायला लागल्या. परिक्रमा करण्याची इच्छा होणं ही एक अंत:प्रेरणा होती आणि तो योग त्यांच्या भाग्यात होता.
आपल्याला माहितेय नर्मदा आणि तिच्या उपनद्यांवर धरणं बांधली जात आहेत. धरण म्हटलं की, बाकी अनेक गुंतागुंतीचे प्रश्न त्याच्याबरोबर हात धरुन येतातच. नर्मदा खोऱ्यातली जैविक संपदा आणि तिथले विस्थापित यांच्याबद्दल मॅडमच्या मनात कळकळ दिसून येते. तिथला भूगोल पाण्याखाली जाण्याआधी तो बघून घ्यायची त्यांची इच्छा होती. त्याचबरोबर तिथल्या विस्थापितांच्या भावनाही त्यांना जाणून घ्यायच्या होत्या. साधं एक घर सोडून दुसरीकडे जाताना आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. इथं तर त्या लोकांची नाळ मैय्याशी श्रद्धेने जोडलेली. तीच तोडून आपल्या श्रध्दास्थानापासून दूर जाताना त्यांना किती क्लेश झाले असतील. असे प्रश्न मॅडमना अस्वस्थ करत होते आणि त्यांची उत्तरं मिळविण्यासाठी त्या परिसरात त्यांना जायचे होते. या सगळ्या नोंदी त्यांनी आपल्या दैनंदिनीत नोंदवून ठेवल्या होत्या. फक्त त्या पुस्तकरुपाने आणताना त्याचे स्वरुप कसे असावे याबद्दल त्यांचा विचार चालला होता. तर या परिक्रमेत त्यांचा स्वतःशी जो संवाद चालला होता, त्या अंतर्मनाला त्यांनी सखी मानलं. त्यामुळे या सखीशी गप्पा मारत पुस्तकाचा प्रवास पुढे पुढे जातो. ही सखी त्यांना काही चुकलं तर त्या चुका दाखवून देते, कधी कौतुक करते, कधी सल्ले देते तर कधी चिडवतेही. त्यासाठी ती कधी कधी उपनिषदे, ऋग्वेदातले श्लोक, बहिणाबाई, कबिराचे दोहे यांची मदत घेते. मोजकंच बोलून अंतर्मुख करणं हे सखीचं काम. पण यावरुन लेखिकेचा किती वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास, त्यांची अध्यात्मिक बैठक याची जाणीव होते. मैय्याच्या किनाऱ्यावरुन जाताना येणाऱ्या अनुभवांचेच फक्त काही हे पुस्तक नव्हे. वेगळ्या दृष्टीने अनुभवलेलं आणि वेगळी दृष्टी देणारं पुस्तक म्हणून मला ते इतर पुस्तकांपेक्षा वेगळं वाटतं.
परिक्रमा करताना अनेक अनुभव त्यांनी घेतले. परिक्रमावासी म्हणून पूज्य भावाने बघणारी, आपल्या परीने सगळी काळजी घेणारी, ओळख नसली तरी आस्था दाखवणारी तिथली लोकं यांचा खूप चांगला अनुभव आला. वेळोवेळी तसे उल्लेख पुस्तकात वाचायला मिळतात. पण पायी प्रवास म्हटल्यावर अडचणीही येणारच. त्यांचेही अगदी योगायोगाने निवारण होत होते. घडणारं जे असतं ते काही चुकत नसतं, पण एक अदृश्य शक्ती तुमची काळजी घ्यायला तुमच्याबरोबर असते. याची प्रचिती त्यांना येत गेली. बरोबरीची मैत्रीण बरीच आजारी पडली. पण ती अशा जागी की, जिथे फोन, बस, डॉक्टरची सोय होती. परिक्रमा मार्गावर अशी कितीतरी ठिकाणं आहेत की जिथे या सोयी नाहीत. त्याचीही दखल लेखिकेने घेऊन ठेवली होती. मग आजारी पडलेल्या मैत्रिणीला बसने दुसऱ्या गावात न्यावे लागले. त्याआधीच लेखिकेला बसमध्ये बसल्याचा भास झाल्याचा त्या उल्लेख करतात. त्या भासाला काय म्हणायचे या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्यांना स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत घडलेली घटना आठवली. ते अमेरिकेत व्याख्यानं द्यायला गेले होते तेव्हा त्यांना दिवसभर बिलकुल उसंत मिळायची नाही. पण रात्री मात्र दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यान्यात काय बोलायचंय ते कानी ऐकू यायचं. याला स्वामींनी कधीही चमत्कार म्हटलं नाही. एखादया गोष्टीचा ध्यास घेतला की, आपलं मनच आपला गुरु होऊन जातं. तसं सततच्या चिंतनाच्या परिणामामुळे अडचणीसुद्धा आधी कळतात आणि मार्गही दिसतो. लेखिकेची ही दृष्टी मला आवडली.
आपल्यालाही बरेच काही शिकवणाऱ्या, चिंतन करायला लावणाऱ्या घटना विषय यांच्या सोबतीने ही परिक्रमा आपण अनुभवतो. त्या परिसरातील पक्षी, झाडे यांचीही माहिती मिळते. वाटेत लागलेल्या आश्रमातील स्वामींबरोबर झालेले संवाद आपल्या ज्ञानात भर घालतात. अशा बऱ्याच गोष्टींमुळे मला हे पुस्तक संग्रही असावं असं वाटतं. परिक्रमा करताना मी, माझी प्रतिष्ठा असे जे काही अहंभाव असतात ते गळून पडतात. 'वसुधैव कुटुंबकम्' चा सुंदर अनुभव मिळतो. परिक्रमा केली नाही तरी अशा अनुभवांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरु शकतं.
तीन वर्षे तीन महिने आणि तेरा दिवस असा परिक्रमेचा जरी नियम असला तरी इतरही काही गोष्टी असतात की ज्यामुळे नियम पाळता येत नाही. याठिकाणी लेखिकेने कर्मकांडापेक्षा भावनेला महत्त्व दिले आणि सहा महिन्यांच्या अवधीत परिक्रमा पूर्ण केली. यात त्यांचे त्यांनी काही नियम घालून घेतले. एकमेकींपासून अंतर ठेवून चालायचं, गप्पा नाहीत..फक्त 'आपुलाची संवाद आपणासी', रोज पहाटे प्रार्थना म्हणून दिवस सुरु करायचा तो प्रार्थना म्हणून संपवायचा. असे नियम पाळत परिक्रमा पूर्ण झाली. एक अगदी आवर्जून सांगावंसं वाटतंय की, परिक्रमा करताना लेखिकेने त्या त्या परिसरातल्या बऱ्याच गोष्टींची दखल घेतली होती. ती तेव्हढ्यापुरतीच नव्हती. मूलभूत गरजाही जिथे मिळत नव्हत्या अशा ठिकाणी जाऊन त्या आज मोलाचं कार्य करत आहेत. मंडलेश्वर परिसरात राहून, अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी मुलांसाठी शाळा उभ्या केल्या आहेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे व्यवसायाभिमुख शिक्षण त्यांना देताहेत. याबरोबरीनेच ठिकठिकाणी आरोग्यसेवाही पुरवत आहेत. ज्या ठिकाणी पावसाळ्यात जाणेही महामुश्किल होते अशा ठिकाणी लेखिकेच्या अफाट प्रयत्नांमुळे आता रुग्णवाहिका जाऊ लागल्या आहेत. तिथली संस्कृती जपत जपत त्यांचे हे सगळे काम अखंड चालू आहे. ही खरी कौतुकाची बाब आहे. हे सगळं करताना एकट्या बाईला काय काय सहन करावे लागले असेल. यामागे पण कारण असेल कदाचित मैय्याचा ध्यास..त्यांच्या सायंप्रार्थनेत त्या ऋग्वेदातला ऐक्य मंत्र म्हणायच्या..
'समानी व आकूति: समाना हृदयानी व: ।
समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति ।।'
(तुमचे संकल्प एक होवोत, तुमची हृदय एक होवोत जेणेकरुन तुम्ही संपूर्णपणे संघटित होऊन आदर्श सामुदायिक जीवन व्यतीत करु शकाल.)
हा मंत्र त्यांनी नुसता म्हटला नाही तर आचरणात आणला. सेवेचे अखंड व्रत घेतलेल्या भारती ठाकूर मॅडमना आणि त्यांच्या कार्याला सलाम!
जस्मिन जोगळेकर
ओघवती भाषा व रसाळपणे पुस्तक परिचय करुन दिला आहे.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!
उत्तर द्याहटवा