पाऊस आणि तू

स्पष्ट आठवतेय ती संध्याकाळ..
दिवसभर विलंबित लयीत पडणारा पाऊस..मध्य लयीला टाळून द्रुत लयीत कधी पडू लागला कळलं देखील नव्हतं.. एखादा तराणा गात असल्यासारखा.
आणि त्याच कोसळणाऱ्या पावसात पूर्ण भिजलेला तू..समोर उभा दिसलास माझ्या दारात.
तुला तसा पाहताच हृदयानेही अचानक तीच लय पकडली, जी पावसाने पकडली होती. 

स्पष्ट आठवतेय ती संध्याकाळ..
वाफाळत्या चहाचे कप हाती घेऊन बसलो होतो आपण व्हरांड्यात..
सोबत चहातल्या आल्याचा घमघमता वास..
दोघांना जोडून घेत होती एक शांत शांतता..
अबोल म्हणणार नाही कारण तीच शांतता, खूप काही बोलून जात होती..
पावसाने पकडलेली लय, त्याने धरलेला ताल आता पागोळ्यांमधून जाणवत होता.
त्याच पडणाऱ्या पागोळ्या बघत आपण शांत बसलो होतो..शेजारी शेजारी..
पाऊसही शांत झाला होता, त्याचे काम करुन. 

स्पष्ट आठवतेय ती संध्याकाळ..
पावसाच्या सरींनीच छेडल्या होत्या आपल्या मनाच्या तारा..सतत..न थकता..न दमता.. 
अगदी ऋतू बदलला तरीही.
पावसानं किती हिरवं केलं होतं आपल्याला तेव्हा. 
पण..सगळे दिवस काही सारखे नसतात न..
कधी कळणार मला वेडीला काय जाणे! 
मला कळलंच नाही रे तुझं भृंगासारखं मन..आज या फुलावर तर उद्या दुसऱ्या फुलावर रमणारं.
तोच पाऊस तसाच पडतोय रे आजही..पण मनात मात्र श्रावणाऐवजी वैशाख घर करुन बसलाय आता.

स्पष्ट आठवतेय ती संध्याकाळ..
तो पाऊस..ती सरलेली वर्षं.. आणि तू ही..
निव्वळ आजही तसाच पाऊस पडतोय म्हणून हं! 
हो..हो..खरंच म्हणतेय..
निव्वळ हा पाऊस पडतोय न,
म्हणून येतेय तुझी आठवण..

जस्मिन जोगळेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक