वास

वास 


रोज संध्याकाळी वैष्णवी गल्लीतच फिरायला जायची. येता जाता कोणी शेजारणी भेटल्या तर उभ्या उभ्या गप्पा मारायच्या आणि परत घरी यायचं, हा तिचा रोजचा दिनक्रम. गल्लीच्या दुसऱ्या टोकाला तिच्या मैत्रिणीचं घर होतं. घराभोवती तिने मस्त बाग फुलविली होती. बरीच सुगंधी फुलझाडं आणि इतर शो च्या झाडांनी तिचं आवार सजलं होतं. 


त्यादिवशी वैष्णवी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडली. परत येताना मैत्रिणीच्या दारात ती उभीच होती, म्हणून त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. इकडचे तिकडचे विषय झाल्यावर गाडी बागेतल्या झाडांकडे वळली. बोलता बोलता मैत्रीण म्हणाली, 'ही जुई बघ किती बहरलेय वेलीवर. येतोय ना मस्त वास?' वैष्णवीच्या तोंडून पटकन 'वास येत नाहीये गं' जात होतं. पण तिने वेळीच वाक्याला ब्रेक मारला. अशाप्रकारच्या वाक्यांचे संदर्भ बदलले होते आता. ती जुईची फुलं अजून फुललीच नव्हती तर त्यांचा सुगंध कसा येणार ना! पण मैत्रिणीला वास येत नाही म्हटलं तर वेगळाच संशय यायचा, म्हणून ती गप्प बसली. वेलीकडे बघण्याऱ्या मैत्रिणीचा आनंदी चेहरा बघून वैष्णवीला 'नाही' पण म्हणता आले नाही. तेवढ्याच उत्साहाने 'मस्त वास येतोय' म्हणून ती सटकली. 

********************


वनिता एका मोठ्या शहरात एका चांगल्या कंपनीत नोकरी करणारी मुलगी. ऑफिस जवळ एक फ्लॅट भाड्याने घेऊन एकटी रहात होती. भरपूर उत्साही आणि खूप काही छंद असणारी..एकदा यू ट्यूबवर बघून घरच्या घरी कंपोस्ट खत बनवायचे तिने ठरविले. त्याप्रमाणे सुरुवातही केली. यू ट्यूबवरच्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे कुजवलेल्या साहित्याचा वास यायचा बंद झाला की, तुमचे खत उत्तम तयार झाले असे समजा.. हे वनिताने लक्षात ठेवले होते. 


एक दिवस गॅलरीत ती सगळा पसारा मांडून बसली होती. खताच्या समोर बसूनही तिला त्याचा वास आला नाही. त्यामुळे बाई जबरी खुश झाल्या. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्याच्या आनंदात ती होती. तेवढ्यात तिची कामवाली बाई दार उघडून आत आली. आली तीच नाकाला पदर लावून, तोंड वाकडं करत..'किती घाण वास पसरलाय घरभर ताई' हे तिचे वाक्य कानी पडताच वनिता हबकलीच. वाक्याचा संदर्भ बदलला होता न हल्ली.

***********************


डोकं बारीक जरी दुखायला लागलं तर सुरभीला लगेच अमृतांजन चोळायची सवय..डोक्याला चोळायचं आणि बाटलीतल्या अमृतांजनाचा वास घ्यायचा ही सवय अंगवळणी पडलेली. त्यादिवशी सुरभीने तसेच केले. पण वास काही केल्या आला नाही. साबणाचा घेऊन पाहिला, उदबत्तीचा घेऊन पाहिला.. पण कसलाच आला नाही. निष्कर्ष तोच निघाला. घरात नवरा बायको एका खोलीत वेगळे झाले. नंतर चार-पाच दिवसांनी नवऱ्याने प्रोटीन रिच आहार घेतला आणि रात्री दोघे गप्पा मारत बसले होते. जेवण जरा जड झाल्यावर अचानक वायूने तोंडातून उत्सर्जन केले आणि सुरभी अनवधानाने म्हणून गेली..मसाल्याचा वास येतोय तोंडाला. ते ऐकून नवरा खदखदून हसायला लागला. तो असं का हसतोय ते तिला पटकन कळलेच नाही. मग संदर्भ लक्षात आल्यावर कितीवेळ ती खुश होऊन आठवून आठवून हसत होती. 

*********************** 


शिंक, खोकला, चव, वास, ताप सगळ्यांचेच संदर्भ बदललेत हल्ली. वरचे किस्से वाचून जर हसायला आलं तर बिनधास्त हसा. पण वास येतोय ना याची मात्र खात्री करत रहा. त्यालाच हल्ली 'अच्छे दिन' आलेत. 😜😅 

काळजी घ्या नि जपून रहा. 


जस्मिन जोगळेकर


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक