नदीवरील घाट –प्रेमाचे बंधन
वर निळभोर आकाश आणि खालून संथ वाहणारी नदी.. संथ वाहणारी नदी म्हटलं की आठवते ती कृष्णामाई. याच कृष्णामाईला मिळणारी तिची प्रमुख उपनदी म्हणजे पंचगंगा. आता पंचगंगा म्हटल्यावर डोळ्यासमोर येतो तो या पट्टयात झालेला मुसळधार पाऊस आणि पंचगंगेला आलेला पूर. पण पंचगंगा म्हटले की दिसायला लागतात ते कोल्हापूरमध्ये या नदीवर बांधलेले सुंदर दगडी घाट. कोल्हापूरहून रत्नागिरीला जायला लागल्यावर ब्रिटिश कालीन शिवाजी पूल लागतो याच पुलावरून डावीकडे पाहिले असता पूर्वी पंचगंगा घाट नजरेस पडायचा. आता शिवाजी पुलाला समांतर दुसरा पूल बांधल्यामुळे हा घाट सहजासहजी दिसत नाही. पण नदीकाठाला जाऊन मुद्दाम पाहण्यासारखा हे ठिकाण आहे. पावसाळा सोडून इतरवेळी संथ वाहणाऱ्या पंचगंगेच्या पाण्यात तीरावरच्या झाडांनाही आपले प्रतिबिंब पाहण्याचा मोह होतो. वरचे निळे आकाश आणि खाली झाडांचे प्रतिबिंब मिरवत वळणदार वाहणारी संथ नदी...त्यात भर दुसऱ्या तीरावरच्या सुबक घाटांची! इथली संध्याकाळ तर विलोभनीय असणार!
एका प्रशस्त जागेच्या एका बाजूला सुंदर कोरीव काम असलेली मंदिरे आणि दुसऱ्या बाजूला नदीपात्रात उतरत जाणाऱ्या दगडी पायऱ्या. ही जागा म्हणजे कोल्हापूरमधील पंचगंगा घाट. या शाहू कालीन घाटाची आता थोडी दुर्दशा झाली आहे. पण घाट आणि तिथली मंदिरे पाहिली की, पूर्वीच्या त्याच्या वैभवाची जाणीव नक्कीच होते. नदी पात्रात पाण्यात ओळीने काही मंदिरे आहेत. यात देवदेवतांच्या मंदिरांबरोबरच राजघराण्यातील व्यक्तींची समाधीमंदिरेही आहेत. असं म्हणतात की, जेव्हा ही मंदिरे बांधली गेली तेव्हा ती नदीच्या काठावरच होती. कालांतराने नदीने आपला प्रवाह बदलल्यामुळे आता ती पाण्यात गेली आहेत. यया मंदिरांच्या सोबतीनेच उंच दीपमाळाही पाण्यात दिमाखात उभ्या आहेत. पण पायऱ्या उतरुन खाली गेलं की काठावर अजूनही काही मंदिरं आहेत. शिवलिंग, देवदेवतांची चित्रे त्यावर सुबकपणे कोरलेली आहेत.
नदीपात्रात उतरता यावे, स्नानसंध्या, इतर धार्मिक विधी, धुणी धुणे इ. गोष्टी सुलभतेने करता याव्यात म्हणून पूर्वी दगडी पायऱ्या बांधल्या जायच्या. त्यालाच आपण घाट म्हणतो. घाट ही संकल्पना पूर्णपणे खास भारतीय आहे. घाट बांधणे हे पुण्याचे काम मानले जायचे. पेशवे किंवा अहिल्याबाई होळकर यांनी कितीतरी घाट बांधल्याचे सर्वज्ञात आहेच. भारतात गंगा, नर्मदा, गोदावरी, कृष्णा अशा कितीतरी मोठ्या नद्यांवर घाट बांधलेले आहेत. पूर्वीच्या कारागिरांचे आणि त्यांच्या आश्रयदात्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! अशी कारागिरी पाहिल्यावर आश्चर्य वाटते आणि बरोबरीने अभिमानही वाटतो.
पंचगंगेचा घाट अगदी पाहण्यासारखा आहे. पण सध्या कदाचित दुर्लक्षित असल्यामुळे परिसर अस्वच्छ आहे. मात्र जर इथे विकासकामे केली तर अतिशय देखणा होऊन जाईल हा परिसर. या घाटाला भेट दिल्यावर फोटो काढायचा मोह तर होणारच..😊
जस्मिन जोगळेकर
खरं आहे.छान वर्णन केलंयस.
उत्तर द्याहटवाThanks 🙂
हटवा