नाईलाज

हल्ली सांगलीला जायला निघालं की बुधगाव माधवनगरच्या दरम्यान हमखास ट्रॅफिक जाम होतं. तसं व्हायचं कारण म्हणजे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या. सीझनमध्ये कधीही गेलं तरी या भागात बैलगाड्यांची माळ रस्त्यावर असतेच असते. अक्षरशः फार वाईट वाटतं त्या बैलांकडे पाहून. जवळपास दीड-दोन टन ऊस गाडीत भरलेला असतो. उन्हाची वेळ असली तर धापत असतात ते बैल. त्यात चालकाला काय घाई असते देव जाणे...बैलांनी जोरात जावं म्हणून किंवा कधी कधी उगीचच त्यांच्यावर चाबकाचे फटकारे ओढत असतो तो. बघवत नाही अगदी. 😓 बिचारं मुकं जनावर ते..काही बोलू शकत नसलं तरी काय झालं..भावना असतीलच की त्यालाही. त्रास होत असेलच की त्यालाही.लांबून येणारी गाडी असेल तर अजूनच हाल.  चालकाला अगदी बैलांना विश्रांती द्यावी असं वाटलं तरी रस्त्यावर इतरांना अडचण न होता थांबणं म्हणजे कसरतच. काय करत असतील आणि काय होत असेल अशावेळी…. अशी दृश्यं पाहिली की त्याचे विचार सारखे डोक्यात घोळत राहतात आणि मग कधीतरी शब्दांना सोबत घेऊन समोर येतात. पण त्या बैलांचे कष्ट, त्रास कमी व्हायला काही उपाय नाही..याला अपवाद असतीलही, पण त्या अपवादांची संख्या वाढून ही अशी वागणूक देणारे अपवाद व्हायला हवेत खरंतर. 


या घरात जेव्हा मी पहिल्यांदा आलो

मायेने इथल्या रुळून पटकन गेलो

मी खोंड पांढरा मऊ रेशमी अंगी

कसदार शिवारी धन्यासवे मग रमलो


हातात कासरा नाकी वेसण आली

अन औत ओढुनी कळ खांद्याला सलली

पण हात धन्याचा फिरता पाठीवरती

गणगोत जणू मी अशीच माया स्रवली


पण ह्याच सुखाला दृष्ट लागली कसली

त्या दुष्काळाने झोप धन्याची उडली

सावळ्या घनांचे येणे जाणे नुसते

कड नैराश्याची मनी भाबड्या दिसली


पाणवठे सुकले रख्ख पाऊलवाटा

संयमास फुटल्या मग तंट्याच्या वाटा

तो जिवापाड पण जपत मलाही होता

घरच्यांना हाही सले बोचरा काटा


मग बचत संपली सारी कणगीमधली

रेट्याला घरच्या बळी अपेक्षा पडली

डोळ्यात धन्याचा पाणी झाले गोळा

निसटून दावणी दुसऱ्या हाती गेली


मग सुरू जाहले भोग जीवनामधले

ते सोसुन कंठी प्राणच गोळा झाले

नालेची असह्य तिडीक माथी जाता

ना कुणास दिसले डोळे पाणवलेले


ना कधी सावली विश्रांतीही नाही

पोटास भुकेल्या मिळती आसुड काही

गाऱ्हाणे माझे कुणापुढे मी मांडू? 

मी मृत्यू माझा समोर माझ्या पाही 


बेवारस झालो थकली गात्रे जेव्हा

ना हिरवा चारा कचरा खाल्ला तेव्हा

पण मला त्यातही समाधान हो एक

चव स्वातंत्र्याची मस्त चाखली तेव्हा


भोगून यातना वळणावर या आलो

दुःखावर फुंकर माझ्या घालत गेलो

मी संध्याकाळी निवांत झालो थोडा

अंतीम क्षणी मी सौख्य स्मृतींवर तगलो 


(भूपती वृत्त)


जस्मिन जोगळेकर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक