एक उनाड वॉक
सप्टेंबरमध्ये जागतिक चळवळीत दोघांनी सहभाग नोंदवला आणि त्या १४ दिवसांनंतर रुटीन जरा विस्कळीत झालं. औषधांचा मारा अजिबात झाला नव्हता तरी अशक्तपणा बराच जाणवत होता. जरा काही हालचाल केली की दमून बसावं वाटायचं. हळूहळू बरं वाटेल वाटत होतं, पण दिवस ढू ला पाय लावून पळत होते तरी हे प्रकरण मात्र बुदल्यासारखं बसकण मारुन बसलंच होतं. अशक्तपणा काही लवकर कमी होईना. म काट्याने काटा काढावा म्हटलं आणि रोज संध्याकाळी फिरायला जाणं सुरु केलं. सुरुवातीला थोडं थोडं करत आता हे चालणं साडेआठ किमीवर जाऊन पोहोचलं आहे. रोजचं चालणं सुरु केलं आणि खरंच दमायला जे होत होतं ते गायब झालं. आता चालण्याची इतकी सवय झालेय की कोणत्याही कारणाने ते बुडू नये वाटतं. जिकडे जातो तो परिसरच इतका जीव लावावा असा आहे की बस.. थोडा डांबरी रस्ता, थोडा मातीचा रस्ता आणि थोडा खडखडाटी रस्ता. पण खडखडाट जाणवायला कोणती वाहने येत जात नसल्याने त्रास असा काहीच नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाचे, द्राक्षाचे मळे, वाऱ्यावर नाजूकपणे डोलणारा गहू आणि भरगच्च कणसांचा भार सोसत उभा शाळू. सुरुवातीच्या डांबरी रस्त्यावर वॉकणाऱ्या लोकांची रोज आणि नवचालकांची कधीतरी वर्दळ असते. एका ठराविक अंतरानंतर मात्र शांतता...मग ठराविक ठिकाणी भेटणारी ठराविक माणसं तेवढी उरतात आणि रोज थोडी थोडी जागा बदलत आणि थोडी वेळ बदलत मावळत जाणारा केशरी गोळा…. क्षितीज स्वच्छ असेल तर शेतातल्या पिकांआडून लपत छपत मावळणारा सूर्य प्रेमात पडायला भाग पाडतो. तर कधी कधी अचानकच रुसल्यासारखा ढगांआड गायब होतो. पण कितीही रुसला तरी कधी कधी त्याचेच किरण त्याच्याशीच फितुरी करतात आणि जी काय नक्षी तयार होते आकाशात त्याला तोड नाही! ढगाआड असला तरी तिथेच त्याला स्टॅच्यू करावं आणि भान विसरुन बघत बसावं वाटतं 😍. तेव्हाच शेताकडून वैरण घेऊन घरी परतणाऱ्या बैलगाडीच्या बैलांच्या गळ्यातले घुंगुर आणि गाडीवान काकांचा नमस्कार सूर्याच्या विचारातून जागं करतात. पण पुढे अजून बरंच काही असतंच असं भान विसरायला लावणारं. त्यातली सध्याची मुख्य गोष्ट म्हणजे आंब्याच्या मोहोराचा सुगंध...आहाहा..वर्णन करताच येणार नाही आणि करुही नये. त्या अवखळ वाऱ्याचं सुगंधाशी भांडण नाहीये ते बरंय...रस्त्यापासून आंब्याची झाडं किती का लांब असेनात, स्वागताला सुगंध असतोच. मग मोहोराच्या धुंदीतून जागं करतात त्या द्राक्षाच्या बागेला लावलेल्या भडक हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाच्या साड्या. साड्या बांधलेल्या असल्या तरी त्या काय चापूनचोपून असणार थोडीच! वारा त्यांना थोडाफार आपल्या तालावर नाचवत असतो. मग त्यातून डोकावणारी द्राक्षं….पण ती बघून नुसतं कल्पनेतच झिंगायला परवानगी...खायला नाही.. द्राक्षावर कोणी किती औषधं मारली आहेत त्या सगळ्या खबऱ्या कपाळीच्या कुकवाला असतात न! मग काय...घोड्याला बांधतात तशा डोळ्याला पट्ट्या बांधून जायचं आपलं पुढं😕.
रस्त्यावर वस्ती तशी तुरळकच. अधूनमधून दोन-चार घरं.. दारात एखाद दुसरी गाय-म्हैस, शेळी बांधलेली आणि मोकळं सोडलेलं कुत्रं...त्याच्या सोबतीने दोन तीन भटकी कुत्री. सुरुवातीला अंगावर भुंकली, पायात घुटमळली.. मक्काय भीतीला सोबत नेलंच होतं मी..🤦समोर वाघ आला तरी भिणार नाही पण कुत्र्यांची लय भीती वाटते ब्वा..(वाघ येणार नाही माहितेय न..म म्हणायला काय जातंय 😜) विवेक बरोबर असतो त्यामुळं त्याला कुत्र्याच्या तोंडी देता येतं. परवा मात्र लय तंतरली. एकटीच गेले फिरायला आणि चौकात बरीच कुत्री निवांत भटकताना दिसली. अंग आकसून घेत कशीबशी पुढे गेले. परत येताना ही गायब झालेली असूदेत चा जप करत. पण कुठलं काय...तो दिवस कुत्र्यांचाच होता. त्या घोळक्यातून बाहेर पडतेय तोवर समोर आलं एक भुंकत भुंकत. त्या घोळक्यावर ते भुंकत होतं. कुठून फिरायला आले वाटायला लागलं. तोपर्यंत एक काका पट्टेधारी कुत्र्याला घेऊन येताना दिसले. मागच्या कुत्र्याचं भुंकणं ऐकून ते पट्टेधारी गप्प एका जागी उभं राहिलं. काका पट्टा ओढताहेत तरी महाराज हलायला तयार नाहीत. म शेवटी काका त्याला म्हणाले, 'अरे काही करत नाही ते. चल.. मी आहे न..' ते ऐकून मी एकदम शूरवीर झाले. 😁 भीतीने पडणारी पावलं एकदम दमदार पडायला लागली. ते हातावर शेला टाकून झोकात चालणारे राजे-महाराजे नाही का सिरियलमध्ये दाखवत..तसं वाटायला लागलं मला. गडगडाटी हसावसं वाटत होतं.. आवरलं स्वतःला😛. पण आता घरातल्या लोकांबरोबर जशी तोंड ओळख झालेय तशी या कुत्र्यांचीही झालेय. आता ढुंकूनही बघत नाहीत ती. यातल्या एका घरात एक २-३ वर्षाचा छोटा मुलगा आहे आणि एक छोटंसं शेळीचं पिल्लू आहे. संध्याकाळी ही दोन छोटी बाळं अंगणात एकमेकांशी खेळत असतात. बघताना इतकं छान वाटतं न ते.. खोटी खेळणी नकोत की चित्रविचित्र आवाज करणाऱ्या गाड्या नकोत. त्या छोट्याश्या अंगणात या छोट्यांचं एकमेकांमागे दुडूदुडू पळणं चालू असतं. चालता चालता एकमेकांना नमस्कार घालत पुढं जायचं हा आता शिरस्ता. इथून खडबडीत रस्ता सुरु होतो तो नदीपर्यंत. अजून नदीपर्यंत गेलो नाही पण एकदातरी जायची इच्छा आहे. सध्या तरी रस्ताच 'पुरे आता' म्हणत वळायला भाग पाडतोय.
या रोजच्या वाटेवर सध्या एके ठिकाणी ऊसतोड कामगारांचे पाल पडले आहे. जत, सांगोला, मंगळवेढा भागातून इकडे येऊन राहिलेत. छोट्या छोट्या झोपड्या, शेजारी पातळ साडीने तीन बाजू झाकलेल्या हवेशीर बाथरुम….काय आयुष्य असतं न! कष्ट, कष्ट आणि कष्ट...वय झालेलं असू दे नाहीतर पोटुशी असू दे...ऊस तोडायला जायचं, परत आल्यावर जवळपासच्या पाणवठ्यावर पाणी भरायला जायचं, थंडी-वाऱ्यात उघड्यावर रहायचं 😔…गायी, म्हशी, शेळ्यांसकट सगळा कुटुंब कबिला घेऊन आपलं गाव सोडून काही महिन्यांसाठी मुक्कामी यायचं आणि काम झालं की परत जायचं हे चक्र चालूच. पण एक पाहिलं वेगळं गाव, वेगळी जागा असली तरी ही लोकं आपलं छान छोटसं जग तयार करतात. प्रत्येक झोपडीसमोरची जागा स्वच्छ आणि मस्तपैकी शेणाने सारवलेली...जाऊन फतकल मारुन बसावं असं वाटेल इतकी स्वच्छ आणि नीटनेटकी. पालाच्या एका बाजूला व्यवस्थित गोवऱ्या थापलेल्या, एकीकडे शेणाचा ढीग रचलेला..बायकांची संध्याकाळच्या कामांची गडबड, पुरुषांच्यात जाणवणारा निवांतपणा आणि पोरा-टोरांची पळापळ, कुठला न कुठला पार्ट मोडलेल्या किंवा गायबच झालेल्या सायकलींवरची त्यांची सवारी..सोबत मधूनच गुरांचं हंबरणं आणि शेळ्यांच्या गळ्यातल्या घुंगरांचा जवळ-लांब येणारा-जाणारा नाजूक आवाज. कधी चुली पेटलेल्या असल्या तर धुराच्या वासाबरोबर येणारा खमंग, चमचमीत वास….काही वेगळंच वातावरण!
माणसांची वर्दळ कमी असली तरी वेगवेगळ्या पक्ष्यांची चाहूल मात्र पूर्ण रस्ताभर लागत असते. त्यांचंच तर ते राज्य! कधी वाटेतल्या विजेच्या उंच टॉवरवर १०-१२ आयबीस बसलेले दिसतात. शेतातून चित्तरचे मोठे आवाज ऐकू येतात. कधी शाळूच्या पात्यावर बुशचॅट बसलेला दिसतो तर कधी बुलबुल पकडापकडी खेळताना दिसतात. कोतवालाची लगबग सुरु असते तेव्हा तारेवर ब्लू जे समाधी लावून बसलेला असतो. 😍 पक्ष्यांच्या किलबिलाटाची सोबत बाकी आवाज विसरायला लावते. तसे इतर त्रासदायक आवाज काही नसतातच, पण कधीतरी मधूनच रस्त्याकडेच्या गवतातून खुसपुस ऐकू येते. कसली असते काय जाणे! आज तर समोरुन कोल्हा रस्ता क्रॉस करुन गेला. एका शेतातलं बकुळीचं झाड तर इतकं सुरेख आहे. मस्त आकार झालाय या झाडाचा. आता त्यावर फुलं कधी उमलतील याची वाट बघतेय. सध्या बकुळं लागलेत त्यावर. इतका मस्त रंग आहे त्यांचा. हिरव्या पानातून ती फळं भारीच दिसताहेत एकदम.👌
हे असं सगळं बघत बघत परत घरी यायला दीड-दोन तास लागतात. घरातून बाहेर पडतानाच रात्रीच्या पोटापाण्याची सोय करुन ठेवलेली असते त्यामुळे डोक्यातला स्वयंपाकघर हा विषय कुलूपबंद असतो. फोन तर घरीच ठेवलेला असतो त्यामुळे पूर्ण शांतता. बारीक होण्यासाठी व्यायाम म्हणून चालणं हा काही विषयच नसल्यामुळे दीड ऐवजी दोन तास लागले तरी काही फरक पडत नाही. मन फ्रेश तर सगळं फ्रेश..फ्रेश...फ्रेश. त्यामुळे जाताना पायांचे जसे ठसे उमटतात तसेच परत येतानाही असतात..जड होत नाहीत कधीच. 😍
जस्मिन जोगळेकर
वाह वा... छानच! डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं!
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद अभिजीत! 😊
उत्तर द्याहटवा्् छान लिहिलंय जस्मिन
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद प्राची
हटवा