पुस्तक परिचय भ यंकरसुं दरम राठी भाषा


पुस्तक – भ यंकरसुं दरम राठी भाषा 

लेखक – द.दि.पुंडे

प्रकाशक – मॅजेस्टिक प्रकाशन 

पृष्ठसंख्या – १६० 

किंमत – १३० रु.

आपण पायात चप्पल घालतो की चपलेत पाय? अंगात सदरा घालतो की सदऱ्यात अंग? किती साधी गोष्ट आहे न. बोलताना सहजच उलटं बोललं जातं आपल्याकडून. त्याचा काही फार विचार करत नाही किंवा पटकन लक्षातही येत नाही उलटं बोलतोय ते. कुणीतरी जाणीव करुन दिली की मग..अरेच्या खरंच की..असं होतं आणि मग मराठी भाषेतल्या अशाच गमतीजमती शोधायचे वेड लागते हळूहळू. या अशा गोष्टी जाणवून देण्याचं खुसखुशीत काम द.दि.पुंडे यांनी लिहिलेलं 'भयंकर सुंदर मराठी भाषा' हे पुस्तक करतं. कदाचित बऱ्याच जणांनी वाचलंही असेल हे पुस्तक. अगदी एक-दोन पानांचे छोटे छोटे लेख मिळून हे छोटं पुस्तक तयार झालं आहे. मराठी भाषा, तिचं व्याकरण या तशा गंभीर गोष्टी. पण त्यातही कितीतरी गमती लपलेल्या असतात. कधीतरी हळूच शब्दाआडून त्या डोकावतात आणि मग त्यांना अजून शोधण्याचा खेळ मनात सुरु होतो. हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक वाचलं की चेहऱ्यावरच्या रेषा वाकड्या होत चेहऱ्यावर हास्य फुलवणार हे नक्की. पुस्तकातल्या एका लेखात पुंडे म्हणतात तसं, 'मला कधी कधी वाटतं की मराठी भाषा म्हणजे एक भयंकरच प्रकरण आहे. तर कधी वाटतं मराठी भाषेइतकी सुंदर भाषा अख्ख्या जगात नाही. म्हणजे थोडक्यात ती नंतर भयंकर सुंदर वाटायला लागते.' हल्लीच्या नव्या जनरेशनच्या तोंडी असे विचित्र शब्दप्रयोग ऐकू येतात. याबरोबरच एकच क्रियापद मराठीत कसं वेगवेगळ्या वाक्यात घातलं की त्या त्या वाक्याचा अर्थ बदलतो याचेही उदाहरण यात त्यांनी दिले आहे. "बसणे" या क्रियापदाबद्दल बोलायचे तर एखाद्याचा धंदा चालला नाही तर 'त्याचा धंदा बसला' म्हणतात आणि जोरात चालला तरी 'धंद्यात त्याचा जम बसला'च म्हणतात. 'बसणे'चा अर्थ सध्याच्या जगात अर्थ वेगळा घेतला जातो पण. मराठी भाषेचे वेगवेगळे पैलू दाखवणारे हे लेख विनोदी भाषेत मस्त लिहिले आहेत. 

पुलं म्हणतात तसं 'मुलगी अगदी सरळ वळणाची आहे'... आता वळण सरळ असेलच कसं? तसं मराठी भाषा वाटते तशी सरळ वळणाची नाही. पुंडे म्हणतात आडवळणाचीच भाषा आहे. आडून आडून बोलत समोरच्या व्यक्तीला काही सूचित करत राहतो आपण. सरळ सांगून मोकळे होत नाही. पूर्वीच्या बायका तर नवऱ्याबद्दल काही विषय निघाला तर असं बोलायच्या. यजमान घरी आहेत का विचारल्यावर सरळ 'नाही, बाहेर गेले आहेत' सांगायच्या नाहीत. 'चप्पल दारात दिसत नाही', 'कोपऱ्यात काठी दिसत नाही' अशी उत्तरं मिळायची. मग विचारणाऱ्याने काय ते समजून घ्यायचे आणि कलटी मारायची. पण आपल्या भाषेतल्या या अशा कितीतरी गमतीजमती असल्या तरी त्या जमायला भाषिक कौशल्य, भाषेची जाण ही असणे महत्त्वाचे ठरते. समोरुन बोललं गेलेलं कळायला तर पाहिजे. अशी कितीतरी उदाहरणे या छोट्या छोट्या ललित लेखांमधून वाचायला मिळतात आणि भाषेबद्दल विचार करायला भाग पाडतात. भाषेबरोबरच मराठी लोकांच्या विचित्र सवयी, लकबी इत्यादी गोष्टीही यातून त्यांनी सांगितल्या आहेत. 

फ्रॅंक मूर हे विनोदवीर म्हणतात की, 'लोक काय वाट्टेल ते कबूल करतील, ते जाळपोळ, खून केल्याचेही कबूल करतील, दात खोटे आणि केसांचा टोप आहे हेही कबूल करतील, पण आपल्याला विनोद कळला नाही हे मात्र कोणी कधी कबूल करणार नाही.' कारण मग त्यातून भाषेबद्दलचे अज्ञान प्रकट होऊ शकते. पण एकूणच मराठी भाषा म्हणजे……"भयंकर सुंदर"

जस्मिन जोगळेकर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक