पुस्तक परिचय इराण जागा होतोय
पुस्तक – इराण जागा होतोय
लेखिका – शिरीन इबादी
सहलेखिका – अझादेह मैवेनी
अनुवाद – प्रतिमा जोशी
प्रकाशक – कॉन्सेप्ट बुक्स
पृष्ठसंख्या – २२१
किंमत – १९५ रु.
'ठार मारली जाणारी पुढची व्यक्ती आहे शिरीन इबादी'... समोरच्या कागदपत्रांमध्ये आपल्याला ठार मारण्यात येण्याबद्दलचे वाक्य स्वतःच वाचताना काय अवस्था झाली असेल शिरीन इबादी यांची! नव्वदच्या दशकाच्या शेवटी शेवटी इराणमध्ये सुमारे डझनभर बुद्धिवादी लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यापैकी एका कुटुंबातील बळी गेलेल्या दोन जणांची केस शिरीन इबादी लढवत होत्या. त्यासंदर्भात फायलींचे ढीग तपासत असताना त्यांना कळले की, सरकारमधला एक मंत्री आणि डेथ स्क्वाड मधला एक मारेकरी यांच्यात जे संभाषण झाले होते त्याची ती प्रत होती. बळी गेलेल्यांच्या यादीत कदाचित त्यांचेही नाव आले असते. इराणमधल्या या घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी प्रस्तावनेत सांगत पुस्तकाची सुरुवात होते. शिरीन इबादी या इराणी राजकारणी, वकील, मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या. त्याआधी न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केले होते. नोबेल शांतता पुरस्काराच्या मानकरी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. १९७८-७९ ला इराणमध्ये क्रांती होऊन इस्लामी प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाल्यावर महिलांनी न्यायाधीश पदावर असणे नवीन सरकारला मान्य नव्हते. अशा महिला न्यायाधीशांना न्यायालयात क्लार्क म्हणून काम करण्यास भाग पाडले जाऊ लागले. त्याविरुद्ध या महिलांनी आवाज उठवल्यावर त्यांना न्याय विभागात थोडी वरची पदे दिली. पण हे मान्य नसल्याने शिरीन इबादी यांनी राजीनामा दिला आणि वकिलीचा अभ्यास सुरु केला. न्यायाधीश बनण्यासाठी आधी वकिली केलीच पाहिजे अशी सक्ती काही इराणच्या न्याय यंत्रणेत नव्हती. त्यामुळे वकील होण्याआधी त्या न्यायाधीश बनल्या होत्या. पण वकिलीचा अभ्यास करण्यासाठीही त्यांना सुरुवातीला लायसेन्स मिळवण्यासाठी धडपड करावी लागलीच. पण नंतर ते मिळून त्या एक प्रतिथयश वकील झाल्या. या पुस्तकात शिरीन इबादी यांनी त्यांचे बालपण, शिक्षण, कट्टर मुस्लिम राजनेते आणि त्याकाळात देशात होणारे बदल, राजकारण ते शेवट नोबेल पुरस्कारापर्यंतचा प्रवास मांडला आहे.
शिरीन इबादी यांच्या बालवयात सनातनी धर्मगुरुंच्या मते विद्यापीठ म्हणजे भ्रष्टाचार आणि शिक्षणाच्या नावाखाली स्त्री-पुरुषांची बजबजपुरी होती. रुढी परंपरा मानणाऱ्या कुटुंबात मुलींना शिक्षणापासून लांबच ठेवलं जात होतं. घरकामं करायची, बुरखा वापरायचा अशी सक्ती करणाऱ्या पुरुषांच्या दृष्टीने मुलींनी मिनिस्कर्ट्स वापरणे, हॉटेलिंग करणे, मुलं-मुली एकत्र ट्रीपला जाणे या गोष्टी म्हणजे भयंकर संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या होत्या. असे अनेक पुरुष तेव्हा इराणमध्ये होते. अशा काळात शिरीन यांच्या घरातील वातावरण फारच वेगळे होते. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण दिले जात होते. मौजमस्तीही करु दिली जात होती आणि मुख्य म्हणजे घरात मुलींपेक्षा मुलगा श्रेष्ठ, भावी कर्ता पुरुष म्हणून त्याचे लाड, मुलींना दुय्यम वागणूक असे प्रकार त्यांच्या घरात कधीच झाले नाहीत. मुलींनाही तेवढेच स्वातंत्र्य दिले जात होते. पण ६० साल जवळ यायला लागलं तसं तिथल्या वातावरणात बदल व्हायला लागले. अयातोल्ला खोमैनीना शाहने हद्दपार केले. शाहच्या विरोधी वारे वहायला सुरुवात झाली. निषेध, निदर्शने यांचा जोर वाढायला लागला. हळूहळू क्रांतीचा विजय होऊन सत्तापालट झाली याचा आनंद सगळे साजरा करत होते. खोमैनींनी तेहरानमध्ये इराणचे इस्लामी प्रजासत्ताक सरकार स्थापन केले. पण क्रांतीचा हा विजय म्हणजे पराजयाची नांदी होती हे लवकरच तिथल्या स्त्रियांच्या लक्षात येऊ लागले. जरा जास्तच वेगाने इराण देश बदलत होता. कट्टर इस्लामिक लोकांना खोमैनी म्हणजे देवदूतच वाटत होते. तेव्हा याचा फायदा घेत स्वतःला इराणचा सर्वेसर्वा राजकीय नेता आणि शिया मुस्लिम धर्मगुरु त्यांनी घोषित केले. हळूहळू इराणमध्ये प्रजासत्ताक जाऊन अति कट्टर इस्लामी शरीयत कायद्याचे राज्य आले. इराणमध्ये धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था अधिकाधिक हिंस्त्र होत गेली. त्या अनुषंगाने बंधनेही आली आणि या सगळ्या बदलांची झळ जनतेला लेखिकेला कशी सोसावी लागली याचे वर्णन या पुस्तकात आहे. इराणी स्त्रीला बंधनात इतकं जखडून ठेवलं गेलं की, स्त्रियांसाठी बाग असो व बस स्टॉप..सगळ्या सार्वजनिक जागा तिच्यासाठी असुरक्षित झाल्या. कोणते कारण काढून स्त्रीची सतावणूक केली जाईल काही सांगता येत नव्हते. कधीकधी अशी परिस्थिती धोकादायक वळणही घेत असे. सरकारने घालून दिलेल्या बंधनाविरुद्ध वागलं तर तुरुंगात डांबलं जाई. सरकारला सगळीकडे भयाचे वातावरण तयार करायचे जेणेकरून स्त्री घराबाहेरच पडणार नाही. परंपरावादी पुरुषांचे मतही तसेच तर होते. त्यातच नव्वद सालच्या अखेरच्या काळात काही वैचारिक विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या. इराणच्या कोठडीत अनेकजणांचे बळी घेतले होते पण त्यात झालेल्या एका मृत्यूने जगभर वादळ उठलं होतं. त्या केसचं वकीलपत्र शिरीन यांनी घेतलं होतं. इराणच्या तुरुंगात काय काय चालतं हे त्यांना जगापुढे ठेवायचं होतं आणि यापुढे असं क्रूर कृत्य घडू नये म्हणून प्रयत्न करायचे होते. त्यासाठी त्यांनी ते वकीलपत्र घेतले होते. शिरीन आणि अशाच लोकांच्या प्रयत्नांमुळे पुढे हळूहळू इराणमधल्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. त्यात लेखिकेचाही मोठा वाटा होता. सगळे जग शिरीन इबादी यांना ओळखू लागले होते. प्रसिद्धी, कीर्तीचे वलय त्यांच्याभोवती तयार झाले होते. त्यांचे बोलणे, मुलाखत अशा गोष्टींना लगेच देशविदेशात प्रसिद्धी मिळत असे. मानवी हक्कांची पायमल्ली आणि इराणमधील हिंसाचार याविरुद्ध हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या बाजूने शब्द हे हत्यार वापरुन लेखिकेने दिलेल्या लढ्याबद्दल या पुस्तकातून वाचायला मिळते. त्यासाठी त्यांना धमक्या, छळ, तुरुंगवास यांना सामोरे जायला लागले होतेच. इराणमध्ये होणारे बदल आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपले व्यावसायिक आणि राजकीय स्थान निर्माण करणाऱ्या स्त्रीचा दृष्टिकोन लेखिकेला सर्वांसमोर मांडायचा होता. याचबरोबरीने शिरीन इबादी म्हणतात तसं त्यांना इस्लाम विषयी आणि इराणी स्त्रिया निष्क्रिय, स्थितीवादी आहेत हे पाश्चात्य जगाचे मतही त्यांना बदलायचे होते. त्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.
मारेकऱ्यांच्या निशाण्यावर असलेल्या ते नोबेल पुरस्कार प्राप्त पहिली मुस्लिम आणि पहिली इराणी महिला इथपर्यंत शिरीन इबादी यांचा प्रवास वाचताना मनात वेगवेगळ्या भावना दाटून येतात. मधल्या सगळ्या खडतर काळावर मात करत , अडीअडचणीतून उभं राहतं त्यांनी महिलांसाठी, मुलांसाठी, शरण आलेल्या अधिकाऱ्यांसाठी असे महत्त्वपूर्ण काम केले की त्यासाठी त्यांना नोबेल शांततेचा पुरस्कार प्राप्त झाला. तरी अजूनही इराण धगधगत आहेच. नोबेल पुरस्कार मिळाल्यावर तर शिरीन यांच्या जीवाचा धोका वाढलाच. सरकारने त्यांना २४ तास सुरक्षारक्षक दिले. राजकीय तणाव वाढले की त्यांना त्यांचे हितचिंतक परदेशी जायचा सल्ला देतात. पण त्यांच्या कामाचे स्वरुप, इराणमध्ये त्या बजावत असलेली भूमिका यांचा विचार करता हा सल्ला त्यांना पटत नाही. मनातले भय हाच सर्वात मोठा धोका आहे आणि त्या भयामुळेच विरोधकांचे सामर्थ्य वाढत असते असे त्यांचे मत आहे. वेगवेगळ्या घटना आणि शिरीन यांनी लढवलेल्या केसेस यांचा त्यांच्या आयुष्यावर जो परिणाम झाला तो या पुस्तकातून मांडला आहे आणि वाचण्यासारखा आहे.
जस्मिन जोगळेकर
नक्की वाचायला हवे.
उत्तर द्याहटवाहो हो अगदी 👍😊
हटवा